‘सद्यःस्थितीतील तणाव आणि उपाय’ या विषयावरील ‘ऑनलाईन पत्रकार संवाद’ कार्यक्रमात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचे पत्रकारांना मार्गदर्शन

‘ऑनलाईन पत्रकार संवाद’ कार्यक्रमात ४ राज्यांतील १४९ पत्रकारांचा सहभाग !

साधनेने आत्मबळ जागृत करून नवीन भारताच्या स्थापनेसाठी
पत्रकारांनी योगदान द्यावे ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

मुंबई – पत्रकारांचा राष्ट्रजीवनाशी थेट संबंध येत असल्याने समाज आणि राष्ट्र यांच्या दृष्टीने पत्रकारांचे दायित्व महत्त्वाचे मानले जाते. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर समाजामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीत पत्रकारांनाही आर्थिक समस्या आणि मानसिक तणाव यांना सामोरे जावे लागत आहे. ईश्‍वराच्या स्मरणामुळे आत्मिक बळ जागृत होते आणि मन सकारात्मक होऊन तणावातून बाहेर पडता येते. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाने साधनेने आत्मबळ जागृत करून नवीन भारताच्या स्थापनेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २७ जून या दिवशी ‘सद्यःस्थितीतील तणाव आणि उपाय’ या विषयावर पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन पत्रकार संवादा’त ते बोलत होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांतून १४९ पत्रकार-संपादक सहभागी झाले होते.

या वेळी मार्गदर्शन करतांना श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले की,

१. अनुकूल परिस्थिती मन लगेच स्वीकारते; मात्र प्रतिकूल परिस्थिती त्वरित स्वीकारत नाही. परिस्थिती तणावयुक्त नसते, तर व्यक्तीच्या गुण-दोष यांनुसार आपण प्रसंगाकडे कोणत्या दृष्टीने पहातो, त्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण होते. स्वयंसूचनेचा उपयोग करून या तणावाच्या परिस्थितीतून बाहेर पडता येऊ शकते.

२. जीवनातील ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी प्रथम स्वत:मधील स्वभावदोष कोणते आहेत ?, हे जाणणे आवश्यक आहे. स्वभावदोषांमुळे शारीरिक आणि मानसिक रोगही निर्माण होतात. चिंता करण्याचा स्वभाव असेल, तर रक्तदाब, पित्त, निद्रानाश आदी शारीरिक, तर निराशा, व्यसन आदी मानसिक विकार उद्भवतात. स्वयंसूचना देऊन त्यातूनही बाहेर पडता येऊ शकते.

३. स्वयंसूचनेसह नामजपासारखे आध्यात्मिक उपाय केल्यास ईश्‍वराची कृपा आपल्यावर होते. संकटकाळात ईश्‍वराची कृपा महत्त्वाची आहे. ईश्‍वराच्या स्मरणाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपणाला संकटातून बाहेर पडता येते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली, तर सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी उत्तरे देऊन शंकानिरसन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment