बेहटा बुजुर्ग (उत्तरप्रदेश) येथे पाऊस चालू होण्याच्या ५-७ दिवस आधी मंदिराच्या छतातून पडतात थेंब !

यावरून लावला जातो मान्सूनचा अंदाज

याविषयी अंनिसवाल्यांना काय म्हणायचे आहे !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील बेहटा बुजूर्ग गावामध्ये भगवान श्री जगन्नाथाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात मान्सूनची भविष्यवाणी होते. अनुमाने १ सहस्र वर्षे जुने असलेल्या या मंदिराची बांधणी अशी आहे की, पाऊस चालू होण्याच्या ५-७ दिवस आधी मंदिराच्या गर्भागृहाच्या छतातून पाण्याचे थेंब पडायला लागतात. यावरून मान्सूनचा अंदाज लावला जातो. यावर संशोधनही झाले आहे.

याविषयी मंदिराचे पुजारी के.पी. शुक्ला यांनी सांगितले की, या मंदिराच्या छतावर मान्सूनची स्थिती दर्शवणारा एक दगड बसवलेला आहे. या दगडातून पडणार्‍या पाण्याच्या थेंबांपासून पाऊस कसा होईल, याचा अंदाज बांधता येतो. जर जास्त थेंब पडले, तर अधिक पाऊस होण्याची शक्यता असते.

लक्ष्मणपुरी येथील भारतीय पुरातत्व खात्याचे वरिष्ठ अधिकारी मनोज वर्मा यांनी सांगितले की, या मंदिराच्या भिंती आणि छत चुना-दगड यांपासून बनवण्यात आले आहे. पावसापूर्वी हवामानातील उष्णता वाढते. त्यामुळे चुना वातावरणातील आर्द्रता शोषून घेतो. ही आर्द्रता दगडामध्ये जाते आणि पाण्याचे थेंब बनून छतातून पडू लागतात. याच कारणाने या मंदिराला ‘मान्सून मंदिर’ असेही म्हटले जाते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात