भावी महाभीषण आपत्काळाच्या दृष्टीने आयुर्वेदीय आणि ‘होमिओपॅथिक’ औषधे, तसेच योगासने आणि प्राणायाम यांचे महत्त्व लक्षात घ्या !

‘सध्या बरेच जण मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, तीव्र आम्लपित्त (हायपर अ‍ॅसिडीटी), गुडघेदुखी यांसारख्या कित्येक विकारांवर वर्षानुवर्षे ‘अ‍ॅलोपॅथिक’ औषधे घेत आहेत. त्यांना ‘अ‍ॅलोपॅथिक’ औषधांची इतकी सवय झाली आहे की, त्या औषधांविना ते जीवनाचा विचारच करू शकत नाहीत. भावी काळात उद्भवणार्‍या महायुद्ध, पूर, भूकंप यांसारख्या भीषण आपत्तींमध्ये दळणवळण ठप्प झाल्याने अन्य सामुग्रींसह औषधेही मिळणे कठीण होईल. युद्धाच्या काळात औषधांचा साठा प्राधान्याने सैन्यासाठी वापरला जातो. यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण होतो. या दृष्टीने कुटुंबाला लागू शकणार्‍या औषधांची आपत्काळापूर्वीच पुरेशी खरेदी करून ठेवणे आवश्यक आहे.

पू. संदीप आळशी

 

१. ‘अ‍ॅलोपॅथिक’ औषधांची मर्यादा आणि आयुर्वेदीय अन् ‘होमिओपॅथिक’ औषधांचे लाभ

‘अ‍ॅलोपॅथिक’ औषधे एका वेळी ३ मासांपेक्षा अधिक काळासाठी विकत मिळत नाहीत. याउलट आयुर्वेदीय आणि ‘होमिओपॅथिक’ औषधे आपण आधीच कुटुंबासाठी पुरेशी खरेदी करून ठेवू शकतो. ही औषधे व्यवस्थित साठवून ठेवली, तर ४ – ५ वर्षांपेक्षाही अधिक काळ टिकतात. काही आयुर्वेदीय औषधे कायमस्वरूपी टिकणारी असतात, म्हणजे त्यांना ‘समाप्ती तिथी’ (एक्सपायरी डेट) नसते. आपण अनेक विकारांवर उपयुक्त ठरणार्‍या आयुर्वेदीय औषधी वनस्पतींची लागवडही आपल्या घराची आगाशी, अंगण इत्यादी ठिकाणी करू शकतो. सनातन संस्थेने ‘औषधी वनस्पतींची लागवड’ या विषयावर ग्रंथही प्रसिद्ध केले आहेत.

 

२. ‘अ‍ॅलोपॅथिक’ औषधांच्या जोडीला
आयुर्वेदीय आणि ‘होमिओपॅथिक’ औषधे घेण्यास आरंभ करा !

वरील सर्व लक्षात घेऊन जे निवळ ‘अ‍ॅलोपॅथिक’ औषधांवरच अवलंबून आहेत, अशांनी आतापासूनच आयुर्वेदीय आणि ‘होमिओपॅथिक’ औषधांकडे वळायला हवे. आयुर्वेदीय वैद्य किंवा ‘होमिओपॅथिक’ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनानुसार ‘अ‍ॅलोपॅथिक’ औषधांच्या जोडीलाच हळूहळू आयुर्वेदीय किंवा ‘होमिओपॅथिक’ औषधे चालू करायला हवीत. या औषधांचा गुण दिसायला लागल्यावर हळूहळू ‘अ‍ॅलोपॅथिक’ औषधांचे प्रमाण अल्प करून पुढे त्यांची आवश्यकताच भासणार नाही, अशी स्थिती निर्माण करावी लागेल.

 

३. औषधांविना विकारमुक्त होण्याची गुरुकिल्ली !

आयुर्वेदातील तत्त्वांप्रमाणे नियमित आचरण केले, तर आपण सदैव विकारमुक्त राहू शकतो. यासंबंधी सनातन संस्थेने ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.

‘तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने आणि प्राणायाम शिकून घेऊन ते नियमितपणे योग्यरित्या केले, तर कित्येक विकार औषधांविनाही बरे होतात’, असा अनेकांचा अनुभव आहे. वरील गोष्टींसाठीही आतापासूनच आरंभ करायला हवा.

मनुष्यजन्म हा लाख मोलाचा आहे. औषधांविना जीवन गमावण्यापेक्षा वरील दृष्टीकोनांनुसार कृती करून आपत्काळात मनुष्यजन्म टिकवा आणि त्याचा उपयोग साधनेसाठी करून मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्या !’

– (पू.) श्री. संदीप आळशी
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात