१. श्री क्षेत्र जांबमाहात्म्य
‘श्री समर्थ रामदासस्वामी यांचे जन्मस्थान श्री क्षेत्र जांब, ता. घणसवंगी, जि. जालना हे आहे. येथे समर्थांच्या घराण्यातील रामपंचायतन आणि ज्या मारुति मंदिरात समर्थांना अनुग्रह झाला, ते मारुति मंदिर आहे. श्री समर्थांनी लग्न लागतांना बोहल्यावरून पलायन केले. ते ठिकाण येथून ५ किलोमीटरवर असलेल्या आसनगाव या गावी पहाता येते. जांब येथे निवासासाठी विनामूल्य भक्तनिवास आणि प्रसाद यांची व्यवस्था आहे.
२. समर्थांचा चमत्कार – भव्य-दिव्य प्रमाणात साजरा होत असलेला श्रीरामाचा भंडारा
श्रीक्षेत्र जांब येथे श्रीरामनवमीच्या आदल्या दिवशी, म्हणजे चैत्र शुक्ल अष्टमीला श्रीरामाचा भंडारा असतो. त्या वेळी गावात ५ – ६ लक्ष भक्त जमतात. ते भगवान श्रीराम आणि श्री समर्थ यांचे मूर्तीरूपातील दर्शन घेऊन पावन होतात. गावकरीही ५ – ६ लक्ष लोकांच्या सेवेला तत्पर असतात. गावकरी यात्रेकरूंची निवास, स्नान आणि भोजन यांची व्यवस्था अतिशय उत्तमपणे आणि विनामूल्य करतात. यात कुठेही काहीच उणीव दिसत नाही. हा समर्थांचा चमत्कारच आहे.

३. कधीही रिकामी न होणारी आणि जिच्यातून
आजही तूप निघते, अशी विस्मयकारक तुपाची घागर !
समर्थ रामदासस्वामी यांच्या चरित्रात उल्लेख असलेली तुपाची घागर श्री क्षेत्र जांब येथील श्रीराम मंदिरात आपल्याला पहायला मिळते. तिच्यातून आजही तूप निघते. ही घागर कधीच रिकामी होत नाही. या घागरीविषयी पुढील सत्यकथा ऐकायला मिळाली.
एकदा समर्थ रामदासस्वामींनी श्रीरामनवमीच्या निमित्ताने भंडार्याचे आयोजन केले होते. श्री समर्थांच्या कृपेने कुठेच काही अल्प नव्हते. अकस्मात् वरणभातावर वाढण्यासाठी लोणकढे साजूक तूप संपले.
रामदासस्वामी महान योगी आणि तपस्वी असल्याने ते योगसाधनेने सर्व काही साध्य करणारे होते. त्यांनी एका घागरीला दोर बांधून बाजूच्या विहिरीत सोडली आणि घागरभर पाणी काढले. त्यांनी सेवेकर्यांना सांगितले, ‘‘यातून पंगतीतील लोकांना तूप वाढा.’’ सेवेकर्यांना ‘पाणी तूप म्हणून कसे वाढायचे ?’, हे कोडे पडले. तेव्हा समर्थांनी सेवेकर्यांना सांगितले, ‘‘माझा श्रीराम बघून घेईल. तुम्ही तूप वाढायला जा.’’ सेवेकर्यांनी पंगतीतील लोकांना पाणी, म्हणजेच तूप वाढायला घेतले. तेव्हा त्या घागरीतील पाणी तुपात परिवर्तित झाले आणि सगळ्या यात्रेकरूंचे भोजन होईपर्यंत त्या घागरीतले तूप संपलेच नाही. सर्व पंगती उठल्यावर समर्थांनी ती घागर बाजूच्या विहिरीत रिकामी केली, म्हणजे विहिरीचे पाणीही समर्थांनी विहिरीला परत केले.
आजही रामनवमीच्या आदल्या दिवशी चैत्र शुक्ल पक्ष अष्टमीला श्री क्षेत्र जांब येथे राममंदिरात भंडारा असतो. त्या वेळी प्रत्येक यात्रेकरूला संस्थानाकडून याच घागरीतून अनुमाने १०० ग्रॅम तूप विनामूल्य दिले जाते आणि आश्चर्य म्हणजे या घागरीतले तूप संपतच नाही. हा चमत्कार आपण तेथे अष्टमीच्या दिवशी उपस्थित राहून पाहू शकता. अवर्णनीय आणि नेत्रदीपक असा हा सोहळा असतो.’
जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुविर समर्थ