वर्ष २०२० मधील शनि ग्रह पालट

‘पौष अमावास्या, शुक्रवार, २४.१.२०२० या दिवशी सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांनी शनि मकर राशीत प्रवेश करणार आहे. २४.१.२०२० या दिवसापासून कुंभ राशीला साडेसाती चालू होत आहे. धनु आणि मकर या राशींना साडेसाती आहे. या दिवशी वृश्‍चिक राशीची साडेसाती संपते.

 

१. शनि ग्रह पालटाचे ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व

१ अ. शनि ग्रह पालटानंतर लगेचच त्याची चांगली अथवा वाईट फळे
मिळत नसून शेवटच्या ६ मासांत त्याचे अनुभव प्रकर्षाने जाणवत असणे

‘पौष अमावास्या, शुक्रवार (२४.१.२०२०) या दिवशी सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांनी शनि मकर राशीत प्रवेश करतो. त्याचा पुण्यकाल शुक्रवारी सकाळी ६.५९ वाजल्यापासून दुपारी १२.४७ वाजेपर्यंत आहे. या पुण्यकालात जप, दान, पूजा करणे, हे पुण्यकारक आणि पीडापरिहारक आहे. शनि ग्रह एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्याचा हा संधीकाल आहे. संधीकाळात केलेल्या साधनेचे फळ अनेक पटींनी अधिक मिळते. शनी ग्रहाला ‘मंद ग्रह’ म्हणतात; कारण शनि एका राशीत अडीच वर्षे असतो. यामुळे शनि ग्रह पालटानंतर लगेचच त्याची चांगली अथवा वाईट फळे मिळत नाहीत, तर शेवटच्या सहा मासांत त्याचे अनुभव प्रकर्षाने जाणवतात.

१ आ. शनि ग्रहामुळे चिंतन योग्य प्रकारे होण्यास साहाय्य होणे

मकर ही शनीची स्वरास असल्याने मकर राशीत शनीचे आगमन शुभ असणार आहे. शनि हा ग्रह कर्माचा अधिपती असून तो अहंकार नाहीसा करतो. शनि हा संवेदनेचा कारक ग्रह आहे. शनि हा चिंतनशील ग्रह असल्याने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्नरत असणार्‍या साधकांना साधनेच्या प्रयत्नांत यश देतो. शनि ग्रहामुळे चिंतन योग्य प्रकारे होण्यास साहाय्य होते.

 

२. राशीपरत्वे शनीची स्थाने

मकर राशीत प्रवेश करणारा शनि मकर राशीस पहिला, धनु राशीस दुसरा, वृश्‍चिक राशीस तिसरा, तुळ राशीस चौथा, कन्या राशीस पाचवा, सिंह राशीस सहावा, कर्क राशीस सातवा, मिथुन राशीस आठवा, वृषभ राशीस नववा, मेष राशीस दहावा, मीन राशीस अकरावा आणि कुंभ राशीस बारावा आहे.

 

३. शनि पालट झाल्यावर शनि प्रत्येक राशीत कोणत्या पादाने प्रवेश करतो आणि त्याचे फल

राशी पाद फल
सिंह, मकर, मीन सुवर्ण चिंता
वृषभ, कन्या, धनु रौप्य शुभ
मेष, कर्क, वृश्‍चिक ताम्र श्रीप्राप्ति
मिथुन, तुळ, कुंभ लोह कष्ट

 

४. अशुभ स्थाने

स्वजन्मराशीपासून १, २, ४, ५, ७, ८, ९, १२ या स्थानी असलेला शनि ग्रह पीडाकारक आहे. पीडापरिहारार्थ पुण्यकालात जप, दान आणि पूजा करणे पुण्यकारक आणि पीडापरिहारक आहे.

 

५. शनि ग्रह पालटाच्या कालावधीत करावयाची साधना

५ अ. शनीची पीडापरिहारक दाने

सुवर्ण, लोखंड, नीलमणी, उडीद, म्हैस, तेल, काळे घोंगडे, काळी किंवा निळी फुले.

५ आ. जपसंख्या

तेवीस सहस्र

५ इ. पूजेसाठी शनीची लोखंडाची प्रतिमा वापरावी.

५ ई. शनीचा पौराण (पौराणिक) मंत्र

नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् ।
छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्‍चरम् ॥

– नवग्रहस्तोत्र, श्‍लोक ७

अर्थ : शनिदेव निळ्या अंजनाप्रमाणे भासतात. ते भगवान सूर्यनारायणाचे पुत्र असून साक्षात् यमदेवाचे ज्येष्ठ बंधू आहेत. देवी छाया आणि भगवान सूर्य यांपासून उत्पन्न शनिदेवांना मी नमस्कार करतो.

५ उ. शनीच्या लोखंडाच्या प्रतिमेचे पूजन आणि दान यांचा संकल्प

‘मम जन्मराशे: सकाशात् अनिष्टस्थानस्थितशने: पीडापरिहारार्थम् एकादशस्थानवत् शुभफलप्राप्त्यर्थं लोहप्रतिमायां शनैश्‍चरपूजनं तत्प्रीतिकरं (अमुक) (टीप) दानं च करिष्ये।

अर्थ : मी माझ्या जन्मपत्रिकेत अनिष्ट स्थानी असलेल्या शनीची पीडा दूर व्हावी आणि तो अकराव्या स्थानात असल्याप्रमाणे शुभ फल देणारा व्हावा, यासाठी लोखंडाच्या शनिमूर्तीची पूजा अन् शनिदेव प्रसन्न व्हावा, यासाठी ‘अमुक’ वस्तूचे दान करतो.

टीप – ‘अमुक’ या शब्दाच्या ठिकाणी ज्या वस्तूचे दान करायचे असेल, त्या वस्तूचे नाव घ्यावे.

ध्यान

अहो सौराष्ट्रसञ्जात छायापुत्र चतुर्भुज ।
कृष्णवर्णार्कगोत्रीय बाणहस्त धनुर्धर ॥

त्रिशूलिश्‍च समागच्छ वरदो गृध्रवाहन ।
प्रजापते तु संपूज्य: सरोजे पश्‍चिमे दले ॥

अर्थ : शनिदेवाने सौराष्ट्रदेशी अवतार घेतला. तो सूर्य आणि छायादेवी यांचा पुत्र होय. त्याला चार हात आहेत. तो रंगाने काळा आहे. त्याच्या एका हातात धनुष्य, एका हातात बाण आणि एका हातात त्रिशूळ आहे. चौथा हात वर देणारा आहे. ‘गिधाड’ हे त्याचे वाहन आहे. तो सर्व प्रजेचा पालनकर्ता आहे. नवग्रहांच्या कमळामध्ये त्याची स्थापना मागच्या पाकळीच्या ठिकाणी केली जाते. अशा या शनिदेवाची आराधना करावी.

५ ऊ. दानाचा श्‍लोक

शनैश्‍चरप्रीतिकरं दानं पीडानिवारकम् ।
सर्वापत्तिविनाशाय द्विजाग्र्याय ददाम्यहम् ॥

अर्थ : शनिदेवाला प्रिय असे दान दिल्यावर पिडांचे, तसेच सर्व आपत्तींचे निवारण होते. असे हे दान मी श्रेष्ठ अशा ब्राह्मणाला देत आहे.

५ ए. शनिस्तोत्र

कोणस्थ: पिङ्गलो बभ्रु: कृष्णो रौद्रोऽन्तको यमः ।
सौरिः शनैश्‍चरो मन्दः पिप्पलादेन संस्तुतः ॥

एतानि दश नामानि प्रातरुत्थाय य: पठेत् ।
शनैश्‍वरकृता पीडा न कदाचित् भविष्यति ॥

पिप्पलाद उवाच ।

नमस्ते कोणसंस्थाय पिङ्गलाय नमोऽस्तुते ।
नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोऽस्तुते ॥ १ ॥

नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चान्तकाय च ।
नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो ॥ २ ॥

नमस्ते मन्दसंज्ञाय शनैश्‍चर नमोऽस्तुते ।
प्रसादं कुरु देवेश दीनस्य प्रणतस्य च ॥ ३ ॥

अर्थ : कोणस्थ, पिंगल, बभ्रु, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरि, शनैश्‍चर आणि मंद या दहा नावांनी पिप्पलादऋषींनी शनिदेवाची स्तुती केली. ही दहा नावे सकाळी उठल्यावर जो म्हणील, त्याला कधीही शनिग्रहाची बाधा होणार नाही.

पिप्पलादऋषि म्हणतात, ‘‘हे कोनात राहणार्‍या कोणस्था, हे पिंगला, हे बभ्रु, हे कृष्णा, हे रौद्रदेहा, हे अंतका, हे यमा, हे सौरी, हे विभो, हे मंदा, हे शनिदेवा, मी तुला नमस्कार करतो. मी दीन तुला शरण आलो आहे. तू माझ्यावर प्रसन्न हो.’’

हे स्तोत्र नित्य प्रात:काळी पठण करावे.

 

६. साडेसाती असलेल्यांनी करावयाचे उपाय

अ. ज्यांना साडेसाती आहे, त्यांनी शनिस्तोत्र प्रतिदिन म्हणावे.

आ. शनीच्या साडेसातीप्रित्यर्थ जप, दान आणि पूजा अवश्य करावी.

इ. पीडापरिहारार्थ शनिवारी अभ्यंग स्नान करून नित्य शनिस्तोत्र पठण करावे.

ई. शनिवारी शनीचे दर्शन घेऊन उडीद आणि मीठ शनीस अर्पण करावे. तेलाभिषेक करावा. काळी फुले वाहिल्याने पिडेचा परिहार (उपाय) होईल. ती न मिळाल्यास निळ्या रंगाची, उदा. गोकर्ण, कृष्णकमळ, अस्टर इत्यादी फुले वाहावीत.

उ. शक्य असल्यास शनिवारी सायंकाळपर्यंत उपोषण करावे. निदान एकभुक्त असावे.

ऊ. नीलमण्याची अंगठी धारण करावी.’

(संदर्भ : दाते पंचांग)

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, ज्योतिष विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१२.२०१९)