वारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत करणारे संत

अनुक्रमणिका

संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम या प्रमुख संतांनी वारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत केली. हा वसा अगदी आजपर्यंतच्या पालखी आणि दिंडी सोहळ्यात पाहावयास मिळतो.

 

१. संत ज्ञानेश्‍वर

१ अ. सर्व जाती आणि पंथ यांच्या लोकांना भक्तीमार्ग कळावा; म्हणून
‘विठ्ठल’नामाचा गजर करत पंढरपूरला पायी जाण्याचा वारीरूपी प्रवाह वृद्धींगत करणारे संत ज्ञानेश्‍वर !

संत ज्ञानेश्‍वरांच्या आधी पंढरपूर हे देवस्थान प्रसिद्ध होते. ज्ञानेश्‍वरांचे आजोबा सिधोपंत हेही पंढरीचे वारकरी होते. पुढे ज्ञानेश्‍वरांनी या वारीला एक विशाल स्वरूप प्राप्त करून दिले. सर्व जाती आणि पंथ यांच्या लोकांना भक्तीमार्ग कळावा; म्हणून ‘विठ्ठल’नामाचा गजर करत पंढरपूरला पायी जाण्याचा वारीरूपी प्रवाह ज्ञानदेवांनी वृद्धींगत केला.

१ आ. समाजात भक्तीचा प्रवाह खळाळत राहावा आणि नामस्मरणाचे
सोपे तंत्र जनतेच्या मनी रुजावे; म्हणून वारीची परंपरा पुनरुज्जीवित करणारे संत ज्ञानेश्‍वर !

संत ज्ञानेश्‍वर स्वतः एक सिद्ध पुरुष असून त्यांनी केवळ समाजात भक्तीचा प्रवाह खळाळत राहावा आणि नामस्मरणाचे सोपे तंत्र जनतेच्या मनी रुजावे; म्हणून वारीची परंपरा पुनरुज्जीवित केली. ज्ञानप्राप्ती झाल्यावर सामान्य जनांप्रती असलेली कणव या साधु पुरुषांच्या आचरणाने स्पष्ट होते. त्यांच्या या विश्‍वात्मक जाणिवेमुळे त्यांना ‘माऊली’ हे बिरुद सार्थ वाटते. ते म्हणतात,

‘अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिही लोक ।
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥’

– संत ज्ञानेश्‍वर महाराज

अर्थ : हे जग आनंदाने भरून टाकून माझ्या माहेरी, म्हणजे पंढरपुरी जाईन.

१ इ. वारी म्हणजे आनंदाने ओसंडून वाहणारे स्नेहसंमेलन

संत ज्ञानेश्‍वरांच्या दृष्टीने वारी हे आनंदाने ओसंडून वाहणारे एक स्नेहसंमेलनच होय. केवळ पायी चालत, टाळ कुटत जाणारे लोक वारकरी नसून पदोपदी ज्यांना देवाची प्रचीती येते, ती वारी. वारीमुळे अहंकार विसरून एकमेकांच्या पायी लोटांगण घालणारे वैष्णव दिसतात. अध्यात्ममार्गावरील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भक्ती. श्रद्धा दृढ होण्यासाठी वारीचे प्रयोजन आहे.

 

२. संत नामदेव

अ. ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी’, ही वारकरी परंपरेची नामदेवांनी दिलेली हाक नंतर संत एकनाथांनी खर्‍या अर्थाने जागृत ठेवली.

नित्य हरिकथा नामसंकीर्तन । संतांचे दरूषन सर्वकाळ ।।
पंढरीची वारी आषाढी कार्तिकी । विठ्ठल एकाएकी सुखरूप ।।

– संत नामदेव महाराज

आ. संत नामदेव यांनी लिहिलेल्या आरतीतील वारीचा उल्लेख

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावें ओवाळिती ।।

इ. संत नामदेव यांच्या अभंगातील वारीचे महत्त्व !

‘आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी । शोभा पांडुरंगीं घनवटे ।।’
‘टाळ नृत्य घोष पताकांचे भार । गर्जे भीमातीर सर्वकाळ ।।’
‘कार्तिकी एकादशी । पोहा मिळाला पंढरीसी ।।’
‘पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ।।’
‘नामा म्हणे धन्य झाले ते संसारी । न सांडिती वारी पंढरीची ।।’

ई. संत नामदेव महाराज यांनी पंढरीची वारी करण्याचे सांगितलेले फळ

‘पंढरीची वारी करील जो कोणी । त्याच्या मागे पुढे चक्रपाणी ।।’
‘पंढरीसी जावे जीवन्मुक्त व्हावे । विठ्ठला भेटावे जीवलगा ।।’

(साभार : संत नामदेव महाराजांच्या अभंगातील निवडक ओळी)

 

३. संत एकनाथ महाराज

संत एकनाथ महाराजांनी वारीची परंपरा पुढे चालू ठेवली. इस्लामी आक्रमणांच्या धामधुमीत महाराष्ट्रात भक्तीपरंपरा वारीच्या माध्यमातून एकनाथांनी चालू ठेवली. यामुळे कठीण काळातही समाज धर्मप्रवण आणि ईश्‍वरार्पित चित्त राहिले. वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रावर या अर्थाने मोठे उपकार आहेत. संत एकनाथांनी ग्रंथातील वेदांत भारूडाच्या रूपाने लोकांपर्यंत पोचवला. भागवताच्या एकादश स्कंदावर त्यांनी लिहिलेली प्राकृत टीका ‘एकनाथी भागवत’ नावाने प्रसिद्ध आहे. श्‍लोकांना लोकांपर्यंत पोचवण्याचे हे महत्कार्य संत एकनाथांनी केले; म्हणूनच त्यांना वारकरी पंथाचा ‘खांब’ म्हणतात.

पंढरीची वारी आहे ज्याचे घरी । तोचि अधिकारी धन्य जगीं ।।

– संत एकनाथ गाथा, अभंग १६७९, ओवी १

धर्म अर्थ काम हे त्याचे अंकित । एका जनार्दनी मात धन्य त्याची ।।

– संत एकनाथ गाथा, अभंग १६७९, ओवी ३

‘वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ।।’

– संत एकनाथ महाराज

 

४. संत तुकाराम महाराज

नाथांची परंपरा पुढे संत तुकाराम महाराजांनी चालू ठेवली. वारकरी संप्रदायात तुकोबांचा हा अभंग नित्यपाठात आहे.

‘हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मी तुझा दास ।
पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरि ।
संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्लोळ ।
चंद्रभागे स्नान । तुका मागे हेचि दान ॥’

जसे ज्ञानदेवांचे ‘पसायदान’ प्रसिद्ध आहे, तसे तुकोबांनी मागितलेले हे एक दान आहे.

‘होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।।’
‘पंढरीचे वारकरी । हे अधिकारी मोक्षाचे ।।
पुंडलिका दिला वर । करूणाकर विठ्ठले ।।’

(साभार : संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील निवडक ओळी)

५. संत सखुबाई

कराडहून पंढरपूरला जाणार्‍या वारीत सहभागी व्हावे आणि पांडुरंगाचे दर्शन घ्यावे, असे संत सखुबाई यांना वाटत होते; परंतु त्यांच्या सासूने त्यांना वारीला जाऊ दिले नाही आणि घरातील खांबाला बांधून ठेवले. संत सखुबाई यांच्यामध्ये पंढरीनाथाच्या दर्शनाची इतकी तीव्र ओढ होती, की साक्षात् पांडुरंगाला त्यांना मुक्त करण्यासाठी धावत यावे लागले. पांडुरंगाने खर्‍या सखूला मायामोहाच्या बंधनातून मुक्त करून थेट पंढरपुरात पोहोचवले आणि त्यांचे रूप घेऊन स्वतःला खांबाला बांधून घेतले.

६. संत कान्होपात्रा

संत कान्होपात्रा यांच्यामध्ये भक्तीची ओढ जागृत करण्याचे श्रेय पंढरीच्या वारीलाच द्यावे लागेल.

७. संत जनाबाई

संत जनाबाई त्यांच्या आई-वडिलांसमवेत गंगाखेडहून वारीने पंढरपूरला आल्या आणि तिथेच संत नामदेवांच्या घरी थांबल्या.

संत जनाबाई म्हणतात,

‘आले वैष्णवांचे भार । झाले हरिनाम जागर ।।’
‘ऐसा आनंद सोहळा । दासी जनी पाहे डोळा ।।’

(साभार : संत जनाबाईंच्या अभंगांतील निवडक ओळी)

८. संत सावतामाळी

हे विठ्ठलाच्या मळ्यातच सेवा करत आहेत, या भावावस्थेत होते. त्यामुळे पांडुरंगाने नेमून दिलेली मळ्याची सेवा सोडून ते पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला कधी गेलेच नाहीत.

९. संत गोरा कुंभार आणि संत चोखामेळा

यांच्या जीवनचरित्रातही पांडुरंगाच्या भक्तीचे महत्त्व प्रकर्षाने दिसून येते.

‘टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ।।’
‘कोणी पंढरीसी जाती वारकरी । तयांचे पायावरी भाळ माझा ।।’

(संदर्भ : संत चोखामेळा यांच्या अभंगातील निवडक ओळी)

१०. संत कूर्मदास

यांच्या उत्कट भक्तीमुळे साक्षात् विठ्ठलच त्यांच्या भेटीसाठी पंढरपूरहून लहूल या त्यांच्या गावी जाणे

संत कूर्मदास पैठणचे निवासी होते. त्यांना जन्मतःच हात आणि पाय दोन्ही नव्हते. त्यांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशींचे महत्त्व जाणून पंढरपूरला जाण्याचा निश्‍चय केला. ते पोटाच्या साहाय्याने सरकत सरकत प्रतिदिन एक कोस अंतर पार करत होते. त्यांची स्थिती पाहून करुणेने कुणी त्यांना भाकरीचा तुकडा भरवी, तर कुणी त्यांना उचलून पुढे नेत असे. पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने ते पंढरपूरच्या दिशेने तसेच जाण्याचा प्रयत्न करत होते. असे ४ मास (महिने) झाले. आषाढी एकादशीला एक दिवस शिल्लक असतांना ते पंढरपूरपासून ७ कोस अंतर दूर असणार्‍या लहुल नावाच्या गावी येऊन पोहोचले. उद्या आषाढी एकादशी आहे आणि आता मला पांडुरंगाचे दर्शन होणार नाही, याची खंत त्यांच्या मनात होती. देवा, मी दीन-हीन, अपंग. मी तुझ्या दर्शनासाठी पोहोचू शकत नाही; पण तू तर मला भेटण्यासाठी येऊ शकतोस ना ? तुला काय अशक्य आहे ?, असा विचार करून संत कूर्मदास यांनी एका यात्रेकरूच्या माध्यमातून एका चिठ्ठीद्वारे विठ्ठलाला भेटण्यासाठी बोलावणे पाठवले. दुसर्‍या दिवशी एकादशीला तो यात्रेकरू पंढरपुरात पोचला. त्याने श्रीविठ्ठलाचे दर्शन घेऊन संत कूर्मदास यांनी पाठवलेली चिठ्ठी पांडुरंगाच्या चरणांवर अर्पण केली. भक्तवत्सल पांडुरंगाला एक क्षणही रहावेना. तो संत कूर्मदास यांच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव आणि संत सावतामाळी यांना समवेत घेऊन लहुल या गावी गेला. साक्षात् भगवंताचे दर्शन झाल्याने संत कूर्मदास यांच्या जन्माचे सार्थक झाले आणि ते पांडुरंगाच्या चरणांवर लोटले. संत कूर्मदास लहूल या गावी असेपर्यंत श्रीविठ्ठलही त्यांच्यासमवेत तेथेच राहिला. संत कूर्मदास यांना दर्शन दिलेल्या या ठिकाणी आज श्रीविठ्ठलाचे सुंदर मंदिर आहे.

 

११. संत नरहरी सोनार

संत नरहरी सोनार म्हणतात,

पंढरी नगरी दैवत श्रीहरि । जाती वारकरी व्रतनेमें ।। १ ।।

आषाढी कार्तिकी महापर्वे थोर । भजनाचा गजर करिती तेथें ।। २ ।।

– संत नरहरी सोनार

 

१२. संत सेनामहाराज

संत सेनामहाराज म्हणतात,

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार । ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठे ।। १ ।।

वाट धरता पंढरीची । चिंता हरे संसाराची ।। २ ।।

– संत सेनामहाराज

 संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

1 thought on “वारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत करणारे संत”

Leave a Comment