सनातनच्या आश्रमातून होणारे धर्मकार्य संपूर्ण विश्‍वात पसरेल ! – श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामीजी

श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामीजी यांच्या माध्यमातून श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे आशीर्वचन

श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामीजी

रामनाथी (गोवा) – ‘सनातनचा रामनाथी आश्रम हे शिवक्षेत्र असून या स्थानाला भगवान शिवाचा आशीर्वाद आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे मानवरूपात भगवान शिवच आहेत. आश्रमात होणारे धर्मकार्य तेच करवून घेत आहेत. सनातन संस्थेच्या सर्व साधकांना माझा पूर्ण आशीर्वाद आहे. सनातनच्या आश्रमांची उत्तरोत्तर अन् शीघ्र प्रगती होणार असून तो काळ लवकरच येणार आहे. बघता बघता काही मासांतच सनातनच्या आश्रमातून होणारे धर्मकार्य संपूर्ण विश्‍वात पसरेल. या कार्याला माझा सदैव अनुग्रह आहे’, असे आशीर्वचन जगन्माता श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीने श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामीजी यांच्या माध्यमातून दिले. कार्तिक शुक्ल पक्ष नवमीच्या शुभदिनी (६ नोव्हेंबर) येथील सनातनच्या आश्रमात कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील हंगरहळ्ळी (तालुका कुणीगल) येथील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे मंगलमय वातावरणात आगमन झाले. त्या वेळी पूजनानंतर देवीने साधकांना वरील आशीर्वचन दिले. या वेळी सनातन संस्थेचे संत प.पू. दास महाराज, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, पू. संदीप आळशी, पू. पृथ्वीराज हजारे, पू. सीताराम देसाई, पू. (सौ.) मालिनी देसाई, पू. पद्माकर होनप, पू. (श्रीमती) सुमन नाईक, पू. (श्रीमती) माया गोखले आणि बालकसंत पू. भार्गवराम प्रभु अन् पू. वामन राजंदेकर यांसह अन्य संतांची वंदनीय उपस्थिती होती.

आश्रमात करण्यात आलेली श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीची पूजा

आश्रमात देवीचे पूजन सनातन संस्थेचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी केले. या वेळी सनातन संस्थेचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी दुर्गा सप्तशतीचे पठण केले.

श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे औक्षण करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
देवीला पुष्पहार अर्पण करतांना पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

 

१. श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामीजी यांनी सनातन संस्था,
सनातन आश्रम आणि सनातनचे साधक यांच्याविषयी काढलेले गौरवोद्धगार !

अ. देवी आश्रमात असो वा तिच्या स्थानी, तिच्या मनात सदैव सनातन संस्थेविषयीच विचार राहील !

देवीचे आगमन झाले, तेव्हा ‘गोधूलि लग्न’ (म्हणजे ज्या वेळी गायी घरी परततात, त्या वेळी त्यांच्या चालण्याने धूळ उडते. त्याला ‘गोधूलि बेला’, असे हिंदी भाषेत म्हणतात. येथे स्वामीजींनी ‘गोधूलि लग्न’ असा शब्द वापरला आहे.) होते. या वेळेत शास्त्रोक्त पूजा झाली, हा शुभसंकेत आहे. देवी या ठिकाणी (सनातनच्या आश्रमात) असो वा तिच्या स्थानी, तिच्या मनात सदैव सनातन संस्थेविषयीच विचार राहील. तिचा संस्थेला सदैव आशीर्वाद राहील. (साधकांना होणार्‍या) सर्व त्रासांचे देवी निवारण करील.

आ. येणार्‍या काळात सनातनचा रामनाथी आश्रम विश्‍वदीप होईल !

देवीपूजनाच्या वेळी तिच्या दोन्ही बाजूंना समया लावल्या होत्या. त्यातील एक समई लवकर शांत झाली. ‘यामागचे शास्त्र काय असावे ?’ याविषयी स्वामीजींना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘देवीचे आगमन सायंकाळी ५.५० वाजता झाले. देवीचे शुभागमन झाल्याच्या वेळेतील अंकांची बेरीज १ येते (५ + ५ = १० आणि १ + ० = १). देवीच्या आगमनाप्रीत्यर्थ ठेवलेल्या शुभकलशांची संख्याही १० असून त्याचीही बेरीज १ होते. १ समई शांत होऊन अन्य समईतील वाती तेवत राहिल्या, हा देवीचा आशीर्वाद आहे. येणार्‍या काळात सनातनचा रामनाथी आश्रम विश्‍वदीप होईल.

इ. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत देवी सनातनच्या आश्रमांचे रक्षण करील !

‘सनातनच्या आश्रमाची ओळख कशी झाली ?’, याविषयी सांगतांना स्वामीजी म्हणाले, ‘‘देवीच्या मंदिरात सनातनच्या आश्रमातील एक साधक त्यांचा प्रश्‍न घेऊन दर्शनासाठी आले होते.

त्या प्रश्‍नावर उपाय सांगतांना देवी म्हणाली, ‘‘जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत मी तुमच्या आश्रमाचे आणि आश्रमातील साधकांचे रक्षण करीन. माझा अनुग्रह (आशीर्वाद) सदैव तुमच्यावर असेल.’’

ई. आश्रमात आल्यावर देवीला पुष्कळ आनंद झाला !

सनातनच्या आश्रमाविषयी देवीने दिलेले उत्तर ऐकून ‘देवी सांगत असलेला हा कोणता आश्रम आहे ?’, असे कुतूहल स्वामीजींच्या मनात निर्माण झाले. प्रश्‍न घेऊन आलेल्या साधकांना त्यांनी याविषयी विचारले. काही काळानंतर ‘देवीने जसे सांगितले, तसे सर्व झाले’, असे साधकांनी स्वामीजींना सांगितले आणि ‘देवीचा आशीर्वाद लाभावा’, यासाठी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात येण्याचे निमंत्रण दिले. स्वामीजींनी देवीला ‘सनातनच्या आश्रमात जायचे का ?’ असे विचारल्यावर देवी म्हणाली, ‘‘मला अशा आश्रमात जाऊन आनंद होईल !’’ आश्रमात जाण्यासाठी देवीने कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील नवमीचा दिवस निवडला. देवीने सांगितल्यानुसार बुधवार, ६ नोव्हेंबर या दिवशी आश्रमात तिचे आगमन झाले. आश्रमात आल्यावर देवीला पुष्कळ आनंद झाला. विविध दैवी अनुभूती आणि संकेत यांद्वारे देवीने हा आनंद दर्शवला.

उ. संख्याशास्त्रानुसार देवीच्या आगमनाविषयी मिळालेले शुभसंकेत !

स्वामीजींनी देवीच्या आगमनाविषयी मिळालेल्या शुभसंकेतांविषयी अवगत केले. ते म्हणाले, ‘‘सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी देवीचे आश्रमात आगमन झाले. या क्षणावर आगमन झाल्याने वाईट शक्तींचे सर्व प्रकारचे त्रास दूर होणार आहेत. ५ आणि ५० मिळून ५५ होतात. ५५ मधील ५ आणि ५ हे अंक मिळून १० होतात. १० मधील ० ला सोडून दिल्यास १ उरतो. सूर्य एकमेव आहे. देश एकमेव आहे आणि सनातन संस्थाही एकमेव आहे. संख्याशास्त्रानुसारही देवीने ‘लवकरच सनातन संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होणार आहे’, असा अनुग्रह (आशीर्वाद) दिला आहे.’’

 

२. श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामीजी – सनातनच्या आश्रमात येऊन पुष्कळ आनंद मिळाला !

सनातनच्या आश्रमात देवीचे आगमन होणे, हे विशेष आहे; कारण (प्रत्यक्ष) देवीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मस्तकी तिचा मुकुट ठेवून आशीर्वाद दिला. या माध्यमातून देवीने ‘संस्थेच्या कार्याला सदैव अनुग्रह (आशीर्वाद) आहे’, असे सांगितले. येथील साधक दुधातील साखरेप्रमाणे मिळून-मिसळून राहत आहेत. त्यामुळे येथे येऊन मला पुष्कळ आनंद मिळाला. आपले आचार-विचार उत्तम असायला हवेत. येथील आश्रमात मी असा स्वभाव असलेले साधक पाहिले. देवीला धन, भूमी, सुवर्ण आदी अर्पण करून सेवा अनेक जण करतात; पण तन-मन-धन अर्पून, भक्तीभावपूर्ण नामजप करत भगवंताचे ध्यान करतो, ती मोठी आणि खरी सेवा आहे. या आश्रमात मी अशी सेवा पाहिली.

 

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री श्री श्री
बालमंजुनाथ स्वामीजी यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामीजी यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘देवीमध्ये जेवढे चैतन्य जाणवते, तेवढेच चैतन्य स्वामीजींकडे पाहिल्यावर जाणवते.’’

 

४. श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीची भावभक्तीमय मिरवणूक

श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे आश्रमात आगमन होण्यापूर्वी पारपतीवाडा (बांदोडा) येथून तिची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत प्रारंभी भगवे ध्वजधारी साधक, त्यानंतर डोक्यावर कलश घेतलेल्या १० सुवासिनी, त्यामागे नऊवारी नेसलेल्या सुवासिनी आणि भक्त, मध्यभागी छत्र-चामरासहित देवीची मूर्ती घेतलेले भक्त अन् स्वामीजी आणि नंतर भक्तगण अशी मिरवणुकीची रचना होती. मार्गात ग्रामस्थ सौ. ज्योती रामनाथकर यांनी देवीचे औक्षण केले. दुतर्फा भगवे ध्वज लावलेल्या मार्गावरून मिरवणूक जात असतांना ‘श्री विद्याचौडेश्‍वरीदेवी की जय’, ‘जय भवानी, जय अंबे’, असा देवीचा जयघोष भक्तगण उत्साहाने करत होते.

 

५. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ देवीचे औक्षण करत असतांना सूर्यदेवाचा आशीर्वाद !

श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे सूर्यास्तापूर्वी आश्रमात आगमन होणे अपेक्षित होते. सायंकाळची वेळ होऊ लागली, तसे आकाश ढगांनी भरून आले होते. मिरवणुकीच्या प्रारंभी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी देवीला हळद-कुंकू वाहून तिचे औक्षण केले. सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी देवीचे औक्षण केल्यावर ढग बाजूला होऊन सूर्यप्रकाश पडला. ‘सूर्यदेवही हे दृश्य ढगाआडून पाहत आहे’, असे वाटत होते. त्यानंतर मिरवणूक मार्गस्थ होऊन सूर्यास्तापूर्वी देवीने आश्रमात प्रवेश केला.

 

६. असे झाले श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे आश्रमात आगमन !

आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भक्तगण श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीची मूर्ती घेऊन आल्यावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. वैशाली राजहंस यांनी देवीची दृष्ट काढली. देवी आश्रमात प्रवेश करत असतांना सनातनचे पुरोहित श्री. ईशान जोशी यांनी शंखनाद केला. अत्यंत शारीरिक त्रास होत असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देवी आणि श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामीजी यांना नमस्कार केला. आश्रम परिसरात नमस्काराच्या मुद्रेत उभे असलेले साधक, संत आणि देवीचे वाहन असलेल्या गजप्रतिमा यांच्याकडे पाहत सुहास्य वदनाने स्वामीजी आणि त्यांचे शिष्य पायघड्यांवरून मार्गस्थ झाले. द्वाराजवळ सनातन संस्थेचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी श्री विद्याचौडेश्‍वरीदेवी, श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामीजी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे औक्षण करून त्यांची पाद्यपूजा केली. या वेळी सनातन संस्थेचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी आणि श्री. सिद्धेश करंदीकर यांनी वेदमंत्र अन् देवीच्या श्‍लोकांचे पठण केले. साधकांना आशीर्वाद देण्यासाठी साक्षात् श्री विद्याचौडेश्‍वरीदेवी आल्याने साधक भावविभोर झाले होते.

‘देवीचे आश्रमात शुभागमन झाल्यावर सूक्ष्मातून अप्सरांनी नृत्य केले. देवीने तिचा मुकुट परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मस्तकी ठेवल्यावर देवतांनी सूक्ष्मातून पुष्पवृष्टी केली’, असे प.पू. दास महाराज यांना जाणवले.

 

७. देवीच्या स्वागतासाठी आश्रमात करण्यात आलेली सजावट

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात येण्याविषयी श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीने श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामीजी यांना स्वत: सांगितले होते. त्यानुसार ६ नोव्हेंबर या दिवशी देवी आश्रमात आली. देवी स्वत: आश्रमात येणार असल्याने आश्रमात सजावट करण्यात आली होती. मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आश्रमात सर्वत्र दीप प्रज्वलित करण्यात आले होते, तसेच देवीशी संबंधित भक्तीगीतेही लावण्यात आली होती. यामुळे आश्रम देवीच्या चैतन्याने भारित झाला होता.

जी शक्ती चराचरात व्यापलेली आहे, ज्या शक्तीच्या योगे सारे विश्‍व संचलित होते, त्या आदिशक्तीच्या चरणी वंदन !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment