भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्यासाठी श्री काशी विद्वत परिषदेचे पूर्ण समर्थन ! – डॉ. रामनारायण द्विवेदी, मंत्री, श्री काशी विद्वत परिषद

वाराणसी येथे ९ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत
हिंदु जनजागृती समितीकडून ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’

१५२ संघटनांच्या ३५० प्रतिनिधींचा सहभाग

वाराणसी (उत्तरप्रदेश) – वेदांमध्ये भारतभूमीला परमपवित्र मानले गेले आहे; कारण येथे सनातन धर्म संस्कृती ही जीवनशैली आहे. जगातील अनेक देश त्यांचा पंथ आणि धर्म यांना अधिकृत मान्यता देतात, त्याचप्रमाणे भारतात त्याच्या परमपवित्र सनातन धर्माला राज्यघटनात्मक प्रतिष्ठा देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ‘श्री काशी विद्वत परिषद’चे मंत्री डॉ. रामनारायण द्विवेदी यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीकडून येथे ९ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. यात १२ राज्यांतील, तसेच नेपाळ येथून एकूण १५२ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. याविषयीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. द्विवेदी बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ, ‘इंडिया विथ विज्डम’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. चेतन राजहंस, पू. नीलेश सिंगबाळ, डॉ. रामनारायण द्विवेदी आणि अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी

१. पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘‘अयोध्येमध्ये प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर बनणे सुनिश्‍चित आहे. आता राममंदिराचे जनआंदोलन रामराज्य आणण्याच्या दिशेने पुढे जायला हवे. विश्‍वाच्या इतिहासामध्ये सर्व राज्यव्यवस्थांनी ‘रामराज्या’ला आदर्श मानले आहे. त्यामुळे रामराज्याची मुहुर्तमेढ रोवण्यासाठी राज्यघटनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याच्या उद्देशाने हिंदूंना कार्य करण्याची दिशा स्पष्ट होण्यासाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

२. अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी म्हणाले, ‘‘देशातील वाढत्या सामाजिक दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी राज्यघटनात्मक स्तरावर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी या अधिवेशनात ९ नोव्हेंबरला देशभक्त अधिवक्त्यांचे एक दिवसांचे ‘अधिवक्ता अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.’’

 

अधिवेशनात सहभागी होणारे मान्यवर

काशी येथील प.पू. श्रीमद्जगद्गुरु अनंतानंद द्वाराचार्य स्वामी डॉ. रामकलमदास वेदांती महाराज, धर्मसंघ शिक्षा मंडळाचे महामंत्री श्री. जगजीतन पांडेय, काशी-विश्‍वेश्‍वर मंदिराचे मुख्य अर्चक पंडित टेकनारायण, आंतरराष्ट्रीय ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष डॉ. लोकराज पौडेल, दक्षिण आशिया ज्योतिष महासंघाचे राष्ट्रीय महासचिव आचार्य अशोक कुमार मिश्र, वर्ल्ड हिंदु फेडरेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजय सिंह, फोरम फॉर नेपाली जर्नालिस्टचे संयोजक श्री. निरंजन ओझा, बंगाल येथील ऑल इंडिया लीगल एड फोरमचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. जॉयदीप मुखर्जी, अयोध्या संत समितीचे महामंत्री महंत पवन शास्त्री, गंगारक्षणासाठी अतुल्य योगदानासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाद्वारे न्यायमित्र घोषित केलेले अधिवक्ता श्री. अरुणकुमार गुप्ता, ओडिशा येथील विश्‍व गोरक्षा वाहिनीचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. सुरेश पांडा, कलिंग आश्रमाचे संस्थापक श्री. रमेश पांडा, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि झारखंड येथील उद्योगपती परिषदेचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. प्रदीप खेमका

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात