रक्षाबंधन सणाचे महत्त्व

रक्षाबंधन या सणाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम व्यक्त केले जाते, त्याचप्रमाणे त्यांच्यातील देवाण-घेवाणही न्यून होत असतो. त्यामुळे हा सण भाऊ आणि बहीण या दोघांना ईश्वराकडे घेऊन जाणारा ठरतो. या सणाचे महत्त्व या लेखाच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया.

 

सात्विक राखी

सात्विक राखी

१. बहीण आणि भाऊ यांच्यातील देवाण-घेवाण हिशोब संपण्यास साहाय्य होणे

बहीण आणि भाऊ यांचा एकमेकांत साधारण ३० प्रतिशत देवाण-घेवाण हिशोब असतो. देवाण-घेवाण हिशोब राखी पौर्णिमेसारख्या सणांच्या माध्यमातून न्यून होतो, म्हणजे ते स्थुलातून एकमेकांच्या बंधनात अडकतात; पण सूक्ष्म-रूपाने एकमेकांत असणारा देवाण-घेवाण हिशोब संपवत असतात.

प्रत्येक वर्षाला बहीण आणि भाऊ यांच्या भावाच्या आधारे त्यांचे देवाण-घेवाण हिशोब न्यून होत असल्याचे प्रतीक म्हणून राखी बांधली जाते. बहीण आणि भाऊ यांना स्वतःतील देवाण-घेवाण हिशोब न्यून करण्यासाठी ही एक संधी असल्याने या संधीचा दोन्ही जिवांनी लाभ करून घेतला पाहिजे.

२. बहिणीच्या भक्तीभावानुसार भावाला लाभ होणे

अ. या दिवशी श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांचे तत्त्व पृथ्वीतलावर अधिक प्रमाणात येते आणि त्याचा दोन्ही जिवांना अधिक प्रमाणात लाभ होतो.

आ. राखी बांधतांना स्त्री जिवातील शक्तीचे तत्त्व प्रगट होऊन पुरुष जिवाला हातातून मिळते आणि त्याला ५ घंट्यापर्यंत २ प्रतिशत लाभ होतो.

इ. बहिणीचा भक्तीभाव, तिची ईश्वराप्रती तळमळ आणि तिच्यावर असलेली गुरुकृपा जितकी अधिक, तितका तिने भावासाठी मारलेल्या हाकेवर परिणाम होऊन भावाची अधिक प्रमाणात प्रगती होते.

३. बहिणीने भावाला राखी बांधतांना द्रौपदीप्रमाणे भाव ठेवावा

श्रीकृष्णाच्या बोटातून वाहणार्‍या रक्तप्रवाहाला थांबवण्यासाठी द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून त्याच्या बोटाला बांधला. बहीण भावाला होणारा त्रास कदापी सहन करू शकत नाही. त्याच्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी ती काहीही करू शकते. राखी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधतांना हाच भाव ठेवला पाहिजे.

४. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने कोणतीही अपेक्षा न बाळगता राखी बांधण्याचे महत्त्व

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाकडून वस्तूच्या रूपात कोणतीही अपेक्षा मनात बाळगल्यास ती त्या दिवशी मिळणार्‍या आध्यात्मिक लाभापासून वंचित रहाते. हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या देवाण-घेवाण हिशोब न्यून करण्यासाठी असतो. अपेक्षा ठेवून वस्तूची प्राप्ती केल्यास देवाण-घेवाण हिशोब ३ पटीने वाढतात.

अ. अपेक्षेमुळे वातावरणातील प्रेमभाव आणि आनंद यांच्या लहरींचा लाभ करून घेता येत नाही.

आ. आध्यात्मिकदृष्ट्या १२ प्रतिशत हानी होते. त्यामुळे प्रत्येक बहिणीने आपल्या भावास निःस्वार्थीपणाने राखी बांधल्यास आणि त्याचे आशीर्वाद घेतल्यास देवाण-घेवाण हिशोब न्यून होण्याचे प्रमाण वाढते.

५. रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देण्याचे महत्त्व

भाऊ आपल्या बहिणीस ओवाळणी देतांना

भाऊ आपल्या बहिणीस ओवाळणी देतांना

रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीस ओवाळणीच्या रूपात भेटवस्तू देत असतो. त्याची स्थूल आणि सूक्ष्म कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. एकमेकांकडे असणार्‍या स्थूल गोष्टींमुळे एकमेकांची सातत्याने आठवण रहाते.

आ. भावाप्रती बहिणीच्या सातत्याने असणार्‍या मायेचे मोल भाऊ करू शकत नाही; पण काही प्रमाणात प्रेमाने प्रेम देऊन ते न्यून करू शकतो. हे स्थूल माध्यमाद्वारे करण्याचा तो प्रयत्न करतो़

इ. ओवाळणी देतांना भावाच्या मनात असणार्‍या ईश्वराप्रती भावाचा बहिणीवर परिणाम होत असतो. त्यामुळे भावाला ओवाळणी न मागता त्याने स्वेच्छेने दिल्यास ती स्वीकारावी, अन्यथा ती टाळणे हेच सोयीस्कर आणि उपयुक्त ठरते.

६. भावाने सात्त्विक ओवाळणी देण्याचे महत्त्व

भावाने सात्त्विक ओवाळणी देणे

भावाने सात्त्विक ओवाळणी देणे

अ. सात्त्विक वस्तूंचा जिवांवर व्यावहारिक परिणाम होत नाही.

आ. सात्त्विक वस्तू देणार्‍या जिवाला २० प्रतिशत आणि घेणार्‍या जिवाला १८ प्रतिशत लाभ होतो.

इ. सात्त्विक कृती केल्याने देवाण-घेवाण हिशोब न्यून होऊन त्यातून नवीन देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही.

– श्रीकृष्ण (कु. मेघा नकाते (आताच्या सौ. प्रार्थना बुवा) यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )

७. भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमापुढे काम आणि क्रोध निष्प्रभ होऊन समतेच्या विचारांचा उदय होणे

‘रक्षाबंधन हे विकारांमध्ये पडणार्‍या तरुण-तरुणींसाठी एक व्रत आहे. एक मुलगी शेजारच्या मुलाकडे वाईट दृष्टीने पाहात होती. ती मुलगी बुद्धीमान होती. तिच्या मनात विचार आला, ‘माझे मन मला धोका तर देणार नाही ना !’ ती एक राखी घेऊन आली आणि तिने त्याला राखी बांधली. त्या वेळी मुलाच्याही मनात विचार आला, ‘अरे, मीही तिच्याकडे वाईट दृष्टीने पाहात होतो. ताईने माझे कल्याण केले.’

भावा-बहिणीचे हे पवित्र बंधन तरुण-तरुणींना विकारांच्या गर्तेत पडण्यापासून वाचवण्यास समर्थ आहे. भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमापुढे काम शांत होतो. क्रोधाचेही शमन होते आणि समतायुक्त विचारांचा उदय होऊ लागतो.

रक्षाबंधन हे पर्व समाजातील तुटलेल्या मनांना जोडण्याची एक सुसंधी आहे. याच्या आगमनाने कुटुंबातील आपापसातील कलह शांत होऊ लागतात. दुरावा दूर होऊ लागतो आणि सामूहिक संकल्पशक्ती साकार होऊ लागते.

– पू. आसाराम बापू (ऋषी प्रसाद, ऑगस्ट २००९)

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment