अग्निहोत्रामुळे वायूप्रदूषण अल्प होते ! – शास्त्रज्ञांचा निष्कर्ष

अग्निहोत्राचा वायूमंडलावर होणारा परिणाम लक्षावधी वर्षांपूर्वीच ऋषिमुनी यांना ठाऊक होता. त्यामुळे ते त्या काळापासून केेले जात आहे; मात्र हिंदु धर्म आणि संस्कृती यांना नावे ठेवणार्‍यांना त्याचे महत्त्व कसे कळणार ? आता शास्त्रज्ञ त्याच्यावर संशोधन करून सत्य माहिती लोकांना सांगत असले, तरी बुद्धीप्रामाण्यवादी त्यावर विश्‍वास ठेवणार नाहीत !

पुणे – देशात प्रदूषण नियंत्रित करण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरत आहेत. राजधानी देहलीसह देशातील काही शहरे जगातील सर्वांत अधिक प्रदूषित शहरांच्या सूचीमध्ये समाविष्ट झाली आहेत. सरकारने ही समस्या सोडवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत; परंतु त्याचा परिणाम होतांना दिसत नाही. वायूप्रदूषण दूर करण्यासाठी ‘अग्निहोत्र’ हवन फलदायी ठरतेे. अग्निहोत्रमुळे वायूप्रदूषण अल्प होते, असा निष्कर्ष  शास्त्रज्ञांनी काढला आहे.

१. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये संशोधक म्हणून कार्यरत असलेले प्रणय अभंग यांनी अग्निहोत्रवर काही प्रयोग केले आहेत. यामध्ये त्यांना अग्निहोत्रामुळे वायू, जल आणि माती येथील प्रदूषण अल्प होत असल्याचे आढळून आले.

२. प्रणय अभंग यांनी सांगितले की, आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून लोकांना अग्निहोत्राविषयी कळावे, यासाठी आम्ही अग्निहोत्रावर अनेक प्रयोग केले आहेत. या प्रयोगांच्या अंतर्गत आम्ही ३ दिवस सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळी अग्निहोत्र हवन केले. या हवनासाठी आम्ही पिरॅमिड आकाराचे पात्र घेतले. त्यामध्ये आम्ही गोवर्‍या (गायीच्या शेणापासून बनवलेल्या) आणि मंत्र यांसह सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळी गायीचे तूप आणि तांदूळ यांसह आहुती दिली. अग्निहोत्र हवनातून निघणार्‍या धुराचा परिणाम जाणण्यासाठी ३ अग्निहोत्राच्या पूर्वी, अग्निहोत्र चालू असतांना आणि अग्निहोत्राच्या नंतर अशा ३ टप्प्यांवर चाचणी करण्यात आली. यामध्ये अग्निहोत्राच्या नंतर केलेल्या चाचणीत घराजवळच्या वायूमंडळातील ८० ते ९० टक्के सूक्ष्म जीव अल्प झाले. या प्रयोगाच्या वेळी ‘एअर सॅम्पलर’चे साहाय्य घेण्यात आले होते. या चाचणीत ‘एअर पॉल्यूटंट्स’ अल्प झाल्याचे आढळून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अग्निहोत्र केल्यावर वायूप्रदूषण अल्प होईल.

३. अग्निहोत्र केल्यानंतर उरणार्‍या राखेचाही उपयोग केला जातो. त्याचा जैविक शेतीसाठी खत म्हणून याचा वापर होऊ शकतो. तसेच दंतमंजन बनवले जाऊ शकते.

 

भोपाळ वायूगळतीच्या वेळी दिसला होता अग्निहोत्राचा चमत्कारिक परिणाम !

वर्ष १९८४ मध्ये भोपाळ वायूगळतीच्या वेळी अग्निहोत्र हवनाचा चमत्कारिक परिणाम दिसून आला होता. वायूगळतीमुळे सहस्रो लोक मृत्यूमुखी पडत होते. त्याच वेळी भोपाळमधील कुशवाहा कुटुंबाने अग्निहोत्र हवन केले. त्यामुळे त्यांच्या घरातील विषारी वायूचा परिणाम अल्प झाला आणि त्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा जीव वाचला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात