वर्ल्ड आयुष एक्सपो आणि आरोग्य -२०१९ या जागतिक प्रदर्शनात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सनातनच्या ग्रंथांची प्रसिद्धी करतांना १. डॉ. विष्णु बावणे, समवेत त्यांचे सहकारी आणि सनातनच्या साधिका

नवी मुंबई – केंद्र शासनाचे आयुष मंत्रालय, राज्य शासन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद, सिडको, नवी मुंबई महापालिका, डॉ. जी.डी. पोळ फाऊंडेशन, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ आदींच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये वर्ल्ड आयुष एक्सपो आणि आरोग्य -२०१९ या आयुर्वेद  विषयावरील जागतिक स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २२ ते २५ ऑगस्ट या कालावधीत हे प्रदर्शन पार पडले. या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने आयर्वेदासह अन्य उपचारपद्धतींची माहिती देणारे, तसेच धार्मिक ग्रंथांचे प्रदर्शन आणि विक्री केंद्र उभारण्यात आले होते. या प्रदर्शनाला राज्यातील १६ जिल्ह्यांसह नेपाळ आणि पश्‍चिम बंगाल येथील अनेक आधुनिक वैद्यांनी भेट दिली, तसेच प्रदर्शनाचा लाभ घेतला.

या संमेलनाला आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार आणि सिद्ध (आयुष) या चिकित्सापद्धतींद्वारे उपचार करणारे देशभरातील आधुनिक वैद्य, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर अन् विद्यार्थी उपस्थित होते. संमेलनात विविध उपचारपद्धतींची माहिती देणारे मोठे कक्ष उभारण्यात आले होते. मोठ्या १५ सभागृहांमध्ये या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. आयुर्वेदासह विविध उपचारपद्धतींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या तज्ञांना या वेळी जीवनगौरव आणि इंटरनॅशनल एक्सलन्स पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराघरात स्वास्थ्य या महत्त्वाकांशी उपक्रमांची प्रसिद्धी करण्यात आली.

 

विशेष सहकार्य

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे सदस्य, डी.आय. पाटील हॉस्पिटलचे स्त्रीरोगतज्ञ आणि संमेलनाच्या आयोजक समितीचे सदस्य डॉ. विष्णु बावणे यांनी  सनातनच्या ग्रंथप्रदर्शनासाठी सर्वोतोपरी साहाय्य केले. त्यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची माहिती देणारा ग्रंथ, तसेच त्यांच्या सहकार्‍यांनी अन्य ग्रंथ हातात घेऊन साधकांसह छायाचित्र काढून उपस्थितांना ग्रंथप्रदर्शनाला भेट देण्यासाठी प्रोत्साहन दिले.

 

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

१. आधुनिक वैद्य चारुशीला गिरी

सनातनच्या ग्रंथांमध्ये अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड आहे. अनेक समस्यांचे उपाय हे ग्रंथ वाचून मिळतात. मला हे ग्रंथ पुष्कळ आवडतात.

२. श्री. श्रीनिवासन

मी तुमचे अनेक ग्रंथ विकत घेऊन त्यांचा अभ्यास केला आणि ते ग्रंथ अनेक जणांना दिले. या ग्रंथात जी स्पष्टता आहे, ती अन्य कोणत्याही ग्रंथांत नाही. हे ग्रंथ आपला धर्म, संस्कृती यांच्या मुळाशी घेऊन जात आहेत.

३. आधुनिक वैद्य दिगंबर मोकाट, पुणे

येथे तुमचे ग्रंथप्रदर्शन पाहून मला पुष्कळच आनंद झाला आहे. तुमच्या औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयीच्या ग्रंथांच्या लिखाणासाठी मी सहकार्य केले आहे. मी आपल्या आश्रमात जाऊन आलो आहे. तेथे मला पुष्कळ चांगले वाटले आणि आनंद मिळाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात