अंध(श्रद्धा) निर्मूलनाच्या आडून हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचा अंनिसचा मूळ उद्देश उघड

मुलुंड येथे झालेल्या अंनिसच्या राज्यस्तरीय अधिवेशनात कार्यकर्त्यांनी उधळली मुक्ताफळे !

  • हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर वारंवार आघात करणार्‍या अंनिसवर पोलीस काय कारवाई करणार आहेत ?

मुंबई – अंध(श्रद्धा) निर्मूलन कायदा कोणताही देव, धर्म आणि श्रद्धा यांच्या विरोधात नाही. हा केवळ अघोरी आणि अनिष्ट कृतींच्या विरोधात आहे, असे लोकांना सांगणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा खोटारडेपणा अंनिसच्या त्रिदशकपूर्ती निमित्त आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात उघड झाला. अधिवेशनामध्ये पुरस्कार वितरण झाल्यावर मनोगत व्यक्त करतांना कार्यकर्त्यांनी हिंदु रूढी, परंपरा, देवता, तसेच सत्यनारायणाची पूजा यांच्यावर टीका केली. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आडून हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करणे, हाच मूळ उद्देश अंनिसचा असल्याचे संपूर्ण अधिवेशनातील भाषणे आणि परिसंवाद ऐकल्यावर लक्षात आली. मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृह येथे ९, १० आणि ११ ऑगस्ट या दिवशी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदुद्वेषापोटी तोंडाला येईल ते वाटेल तसे बरळणारे अंनिसचे कार्यकर्ते म्हणे अंधश्रद्धेचे निर्मूलन करणार !

 

(म्हणे) ‘धर्म, देव आणि अध्यात्म यांच्या नावाने जे काही
चालले आहे, ते ठोकून काढले पाहिजे !’ – कॉ. बाबा आरगडे, अंनिस कार्यकर्ते

हा देश कशाने चालवायचा घटनेने, संविधानाने कि परंपरांनी ? आसारामबापूंना न्यायालयाने विचारले, ‘तुम्ही स्त्रियांची छेडछाड आणि अत्याचार केलेत, तेे चांगले नाही केले.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘भगवान श्रीकृष्णाने बर्‍याच लीला केल्या होत्या. मी दोन-पाच केल्या, तर काय झाले.’’ न्यायाधीश म्हणाले, ‘‘हे कुठे लिहिले आहे ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझ्या धर्मग्रंथात.’’ यावर न्यायाधीश म्हणाले, ‘‘मला धर्मग्रंथ वाचून तुझा निकाल करायचा नाही, तर घटना वाचून करायचा आहे.’’ धर्म, देव आणि अध्यात्म यांच्या नावाने जे काही चालले आहे, ते ठोकून काढले पाहिजे.

 

(म्हणे) ‘वारकर्‍यांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या केलेल्या जागराचा
विजय म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होय !’ – ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर

कायद्याच्या विरोधात काही मोर्चे निघत होते, मीही त्यात सहभागी झालो होतो. यानंतर काही पत्रकारांनी माझी भेट डॉ. दाभोलकरांशी घालून दिली. ते मला म्हणाले, ‘‘यात काय आक्षेप घेण्यासारखे आहे, ते आम्ही काढून टाकतो.’’ यानंतर मला प्रत्येक कलमात अभंग लागू असल्याचे दिसले. मी पंढरपूरला जाऊन वारकर्‍यांच्या भेटी घेतल्या. त्यांना हा विषय पटवून सांगितला. ‘काही खोट्या लोकांना टोपी घालून आणि टिळा लावून ते वारकरी आहेत’, असे दाखवून त्यांच्या नावाने पत्रे काढून वारकर्‍यांच्या विचारांचा हा कायदा १० वर्षे रोखून धरण्यात आला, याचा मला खेद वाटला. वारकर्‍यांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा जो जागर केला, त्या जागराचा विजय म्हणजे हा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होय. (वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी हिंदूंवर आघात करणार्‍या जादूटोणा विरोधी कायद्याची भीषणता समाजासमोर आणल्यामुळेच आणि वैध मार्गाने आवाज उठवल्यामुळेच त्यातील २७ पैकी केवळ १२ कलमेच ठेवण्यात आली  आणि अन्य वगळण्यात आली. यातूनच हा कायदा हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आणि प्रथा-परंपरांवर कसा आघात करणारा होता, हे लक्षात येते ! त्यामुळे ह.भ.प. सोन्नर यांच्या विधानावर जनता कसा विश्‍वास ठेवेल ! – संपादक)

 

बौद्विक दिवाळखोरी दर्शवणारे विधान !

(म्हणे) ‘हा समाज इतका बदला की, डॉ. दाभोलकरांची
सनातन्यांनी माफी मागितली पाहिजे !’- निशा भोसले, अंनिसची कार्यकर्ती

ज्या सनातन्यांनी विज्ञानाची माहिती सांगणार्‍या माणसाला या जगातून नाहीसे केले, त्या सनातन्यांसह हा समाज इतका बदला, इतका विवेकी करा की, १०० वर्षांनी डॉ. दाभोलकरांची सनातन्यांनी माफी मागितली पाहिजे.

(म्हणे) ‘दाभोलकरांच्या हत्येच्या कटामागे
सनातनसारखी संस्था आहे !’ – अविनाश पाटील, कार्याध्यक्ष, अंनिस

कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने आजपर्यंत दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्था दोषी असल्याचे सिद्ध केलेले नाही, असे असतांना बिनबुडाचे आरोप करणारे सनातनद्वेष्टे अविनाश पाटील स्वतःला अन्वेषण यंत्रणांपेक्षा मोठे समजतात का ?  खोटे आरोप करणार्‍या अविनाश पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !

दाभोलकरांच्या हत्येच्या षड्यंत्रामागे एक विचारधारा आहे. या विचारधारेचे नेतृत्व करणार्‍या संघटनेच्या सूत्रधारांना बाहेर आणले जात नाही; म्हणून आपण डॉ. दाभोलकरांच्या ६ व्या स्मृतीदिनानिमित्त २० ऑगस्टला ‘सूत्रधार कोण ? जबाब दो’, असा प्रश्‍न मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना विचारणार आहोत, तसेच सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल. या सर्व कटामागे सनातनसारखी संस्था आहे. ‘इसिस संघटनेच्या कारवाईच्या धर्तीवर राष्ट्रद्रोही, संविधानविरोधी, अन्लॉफूल अ‍ॅक्टिव्हिटीज (बेकायदेशीर कृत्ये) करणारी संघटना म्हणून सनातन संस्थेेेवर कारवाई करावी’, अशी आमची मागणी आहे; मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे घडत नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात