व्हर्जिनिया (अमेरिका) येथे श्री स्वामीनारायण मंदिराचा उद्घाटन सोहळा साजरा

नेवाडा (अमेरिका) – अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील चेसापीक येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या श्री स्वामीनारायण मंदिराचा उद्घाटन सोहळा नुकताच विधीपूर्वक साजरा करण्यात आला. ही इमारत पूर्वी एका चर्चची इमारत होती. (चर्च किंवा अन्य कोणत्याही धर्मियांच्या प्रार्थनास्थळाचे रूपांतर करून मंदिर उभारणे अयोग्य आहे ! मंदिराची निर्मिती नव्याने करण्यासह शास्त्राच्या आधारे करणे आवश्यक असते आणि तेथेच पावित्र्य निर्माण होते. अन्यथा पूर्वीच्या प्रार्थनास्थळांमुळे मंदिरातही रज-तमाचे प्राबल्य अधिक रहाते. त्यामुळे भाविकांना मंदिराचा आध्यात्मिक लाभ होण्यात अडथळे येतात ! – संपादक) कर्णावती येथील श्री स्वामीनारायण गडी संस्थानने उत्तर अमेरिकेत उभारलेले भगवान श्री स्वामीनारायणाचे हे ८ वे मंदिर आहे. ३ दिवस चाललेल्या या उद्घाटन सोहळ्यात यज्ञविधी, मंत्रपठण, आरती, भजन, मूर्ती प्रतिष्ठापना, प्रार्थना, तुलाभार, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या वेळी रथयात्राही आयोजित करण्यात आली होती. पूज्य आचार्य स्वामीश्री पुरुषोत्तमप्रीयदासजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा पार पडला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात