(म्हणे) ‘दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्या सनातनच्या साधकांनी डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाने योजनाबद्धरित्या केल्या !’ – अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील

अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची बेताल विधाने !

मुंबई, ३१ जुलै (वार्ता.) – सनातन संस्थेचे डॉ. जयंत आठवले हे मानसोपचारतज्ञ आहेत. त्यांनी अशा प्रकारची कार्यपद्धत निर्माण केली आहे की, धार्मिक-उपासना यांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या लोकांना निवडून त्यांचा बुद्धीभेद करायचा आणि तालिबानी अतिरेक्यांप्रमाणे त्यांचा मानवी बॉम्ब म्हणून उपयोग करायचा. अशा प्रकारच्या हत्या आणि कारवाया यातूनच होत आहेत. देश आणि तरुणाई यांची अपकीर्ती करणारे हे आहे. डॉ. दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्या सनातनच्या साधकांनी डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाने योजनाबद्धरित्या केलेल्या हत्या आहेत, अशा प्रकारे धादांत खोटे वक्तव्य करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी अन्वेषण पूर्ण होण्याआधीच पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि साधक यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला. (ही सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट असतांनाही अविनाश पाटील कोणत्या आधारे स्वतःच निकाल घोषित करत आहेत ? न्यायालयाहून अंनिसवाले मोठे आहेत का ? – संपादक)

अंनिसच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने ३१ जुलै या दिवशी प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी पत्रकारांनी ‘अशा प्रकारे अन्वेषण यंत्रणांनी प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलेले नाही’, असे अविनाश पाटील यांना विचारले. त्या वेळी ही माहिती अन्वेषण अधिकार्‍यांनी मला खासगीत दिल्याचे सांगून पोलीस अधिकार्‍यांच्या नावावर ती खपवण्याचा प्रयत्न केला. (कुठल्या पोलीस अधिकार्‍याने ही माहिती सांगितली हे पाटील यांनी उघड करावे ! – संपादक)

 

(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घालून साधकांची संपत्ती जप्त करावी !’

पाटील या वेळी म्हणाले,
अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील

१. सनातन संस्थेच्या कारवाया तालिबानी संघटनेप्रमाणे आतंकवादी कारवाया आहेत.(सनातन आतंकवादी असते, तर पाटील असे बोलू  शकले असते का ? तालिबान काय आहे, हे तरी पाटील यांना माहिती आहे का ? – संपादक)

२. शासनाने सनातन संस्थेवर बंदी घालून संस्थेच्या साधकांची संपत्ती जप्त करावी. (अंनिसचे कार्यकर्ते नक्षलवादी चळवळीत पकडले गेले, तर शासनाने अंनिसच्या कार्यकर्त्यांचीही संपत्ती जप्त करावी काय ? दाभोलकर यांच्यावरही गैरव्यवहाराचे आरोप झालेले असतांना त्यांच्या संपत्तीविषयी कोणी असे म्हटले, तर पाटील यांना चालणार आहे का ? – संपादक)

३. सनातन संस्थेच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ समिती आणखीही काही संघटना यांचे जे साधक आहेत, जे जीवनदायी कार्यकर्ते आहेत, त्यांच्यातील काही लोकांना शस्त्र चालवण्याचे आणि बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण घेणारे २५, ५०, १०० आहेत, असे अन्वेषण यंत्रणांच्या अधिकार्‍यांनी मला खासगीत सांगितले आहे. त्यातले केवळ ५-६ जण पकडण्यात आले आहेत. (कपोलकल्पित कहाण्या सांगणारे अविनाश पाटील ! त्यांना जर कोणी अन्वेषण यंत्रणांचे अधिकारी खासगीत अशी माहिती देत असतील, तर अन्वेषण यंत्रणा आणि अंनिस यांचे काही साटेलोटे आहे का, हेही न्यायालयाने तपासावे ! उद्या अंनिसच्या भ्रष्टाचाराविषयीची एखाद्या पोलीस अधिकार्‍याने सनातन संस्थेला खासगीत माहिती दिली, तर त्यावर पाटील विश्‍वास ठेवणार आहेत का ?- संपादक)

४. हे प्रशिक्षण कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर देण्यात आले आहे. ज्यांच्या विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही, अशा लोकांची हत्या करण्यासाठी त्यांच्या नावाची सूची सिद्ध करण्यात आली होती. वीरेंद्र तावडे, समीर गायकवाड, शरद कळस्कर यांना पकडल्यानंतर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती प्राप्त झाली आहे. (समाजाने सनातन संस्थेची शिकवण अंगीकारली आहे. अनेक संकटांतूनही सनातन संस्थेचे कार्य भारतभर वाढत आहे ! अंनिसवाले हिंदु धर्माविषयीच्या आकसातून सनातन संस्थेवर आरोप करत आहेत, हे आता समाजानेही जाणले आहे ! त्यामुळेच पाटील यांनी कितीही बेताल वक्तव्ये केली, तरी त्याचा समाजावर परिणाम होत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक)

या वेळी अविनाश पाटील यांनी सनातन संस्थेसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संस्थांनाही अतिरेकी संघटना ठरवण्याचा प्रयत्न केला. (हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आतंकवादी ठरवणारे अंनिसवाले कधी जिहादी आतंकवाद्यांविषयी एकतरी शब्द बोलतात का ? हिंदुत्वनिष्ठांवर आरोप करणारी अंनिस जिहादी आतंकवाद्यांच्या ताटाखालची संघटना आहे, असा कोणी आरोप केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात