‘स्मार्टफोन’वर ‘इंटरनेट’ चालवल्याने पृथ्वीच्या उष्णतेत वाढ

  • विज्ञानामुळे होत असलेली अधोगती ! 
  • १० वर्षांत तापमानात ३.५ टक्क्यांनी वृद्धी

नवी देहली – लॅपटॉप, भ्रमणभाष (स्मार्टफोन), टॅब्लेट इत्यादी ‘इंटरनेट’चा वापर करणार्‍या उपकरणामुळे पाणी आणि हवा यांवर परिणाम होतो. संपूर्ण जगात गेल्या १० वर्षांमध्ये अशा प्रकारच्या अब्जावधी उपकरणांचा वापर केला गेल्याने पृथ्वीच्या उष्णतेत ३.५ टक्क्यांनी वृद्धी झाली आहे, असे ‘क्लाइमेट होम न्यूज’ ने २०१६ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात म्हटले आहे. २०४० पर्यंत ही वृद्धी १४ टक्क्यांवर पोचणार आहे.  ‘ग्लोबल वॉर्मिंग’विषयी वाहने आणि कारखाने यांना दोषी ठरवले जात असे. वातानुकूलित यंत्रांच्या वापरामध्ये होणारी वृद्धीही पृथ्वीचे तापमान वाढण्याला कारणीभूत असल्याचे मानले जायचे; परंतु सध्या ‘ग्लोबल वॉर्मिंग’मध्ये इंटरनेटचा वापर होणार्‍या उपकरणांची मोठी भर पडली आहे.

१. वर्ष २०२५ पर्यंत संपूर्ण जगात वापरल्या जाणार्‍या विजेचा २० टक्के भाग केवळ  ‘इंटरनेट’ आणि ‘स्मार्टफोन’ यांवर वापरला जाणार आहे. ‘इंटरनेट’चा वापर जसा वाढत जाईल, तसे नवीन डाटा सेंटर उभारले जाणार. हे डाटा सेंटर चालवण्यासाठी विजेचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागणार आहे.

२. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाणे वर्ष २००७ मध्ये २१५ मेगाटन होते ते स्मार्टफोनमुळे वर्ष २०२० पर्यंत वाढून ७६४ मेगाटन होण्याची शक्यता आहे आणि यात डाटा सेंटर्सचा भाग दोन तृतियांश असेल.

३. जगात स्मार्टफोन वापरणार्‍यांची संख्या वाढत आहे. भारतातच वर्ष २०२२ पर्यंत ही संख्या ८६ कोटीपर्यंत पोचण्याची शक्यता आहे

.

‘ग्लोबल वॉर्मिंग’ला ‘स्मार्टफोन’चे उत्पादन कारणीभूत

‘ग्लोबल वॉर्मिंग’ला ‘स्मार्टफोन’चा वापर नव्हे, तर उत्पादन अधिक कारणीभूत आहे. ‘स्मार्टफोन’च्या उत्पादनासाठी ऊर्जेचा वापर होतोच; परंतु त्याबरोबरच या उपकरणांमध्ये सोने आणि येट्रियम, लॅथेनियम यांसारखे दुर्लभ धातू वापरले जातात. ‘स्मार्टफोन’च्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या उत्पादनासाठी आस्थापनेही उत्तरदायी आहेत. काही मासांच्या कालांतराने ही आस्थापने नवीन ‘स्मार्टफोन’ बाजारात आणतात. त्यामुळे ग्राहक जुना टाकून नवीन ‘स्मार्टफोन’ विकत घेतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात