महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या गुरुपरंपरेचे पूजन करून भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात व्यक्त केली कृतज्ञता !

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य
आध्यात्मिक संस्था यांच्या वतीने भारतात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !

गुरु माता गुरु पिता ॥ गुरु अमुची कुलदेवता ॥१॥
घोर पडता संकटे ॥ गुरु रक्षी मागे पुढे ॥२॥
काया, वाचा आणि मन ॥ गुरु चरणी अर्पण ॥३॥
एका जनार्दनी शरण ॥ गुरु एक जनार्दन ॥४॥

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात गुरुपूजन करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पौरोहित्य करतांना श्री. दामोदर वझेगुरुजी

मुंबई – गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपाशीर्वादाने लावलेल्या सनातन संस्थारूपी इवल्याशा रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद यांच्यापासून चालू झालेली ही गुरुपरंपरा पुढे मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. गुरुकृपायोगानुसार साधना करून सनातन संस्थेचे साधक हे संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु पदापर्यंत पोचले आहेत. श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद महाराज, श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरुबंधू प.पू. रामानंद महाराज, प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य डॉ. जयंत बाळाजी आठवले ही सनातनची गुरुपरंपरा आहे. प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेला प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले जायचे. यावर्षी मात्र महर्षींच्या आज्ञेने या गुरुपरंपरेचे पूजन करण्यात आले. हे या वेळेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या सहभागाने या वर्षी एकूण ११० गुरुपौर्णिमा महोत्सव देशभरात साजरे करण्यात आले.

या गुरुपौर्णिमा महोत्सवांना सनातनचे सद्गुरु, संत, साधक, धर्मप्रेमी, तसेच मान्यवर यांची उपस्थिती लाभली. भावभक्तीचा हा सोहळा आध्यात्मिक प्रगतीचे नवीन ध्येय आणि ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी परिणामकारक प्रयत्न करण्याचा संकल्प मनाशी बाळगून साजरा झाला !

गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रारंभी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत हिंदु जनजागृती समितीचे हिंदूसंघटनाचे अद्वितीय कार्य !’ आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक कार्य !’ या विषयावरील दृश्यपट दाखवण्यात आला. हिंदु धर्मासाठी विशेष योगदान देणार्‍या हितचिंतकांचे सत्कारही या वेळी करण्यात आले. ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान !’ या विषयावर मार्गदर्शन झाले.

देशभरात झालेल्या गुरुपौर्णिमांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, नवी देहली, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तरप्रदेश, हरियाणा, बिहार, आसाम, ओडिशा, बंगाल, आंध्रप्रदेश, केरळ आणि चेन्नई येथे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला.

विशेष

१. गुरुपौर्णिमा महोत्सवांच्या ठिकाणी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनावर काही ठिकाणी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची माहिती देणारे, तसेच प्रथमोपचाराचे महत्त्व आणि आवश्यकता या विषयांची माहिती सांगणारे फ्लेक्स लावण्यात आले होते.

२. आगामी भीषण आपत्काळामध्ये औषधे अथवा डॉक्टर उपलब्ध होऊ शकणार नाहीत. हे लक्षात घेऊन याविषयी जनजागृती व्हावी; म्हणून गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये औषधी वनस्पतींचा कक्ष लावण्यात आला होता. या कक्षावर तुळस, कोरफड, दुर्वा, गवती चहा, अडुळसा इत्यादी सहज उपलब्ध होणार्‍या औषधी वनस्पतींच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या.

सनातन संस्थेच्या गुरुपरंपरेचे झालेले पूजन

भृगु महर्षींनी चेन्नई येथील श्री. सेल्वम् गुरुजी यांच्या माध्यमातून सांगितल्यानुसार भारतातील सर्व गुरुपौर्णिमा महोत्सवांच्या ठिकाणी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत सनातन संस्थेच्या गुरुपरंपरेचे पूजन करण्यात आले. यामध्ये प्रथम श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद महाराज, श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे गुरुबंधू प.पू. रामानंद महाराज, तसेच प.पू. भक्तराज महाराज शिष्य डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

भृगु महर्षि म्हणतात, ‘‘या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिनी गुरुपरंपरेच्या पूजनाने सर्व साधकांना विशेष तृप्ती आणि आंतरिक समाधान मिळणार आहे. गुरुपूजनाच्या वेळी आकाशमंडळात सप्तर्षींचे मंडल सिद्ध होऊन सनातन संस्थेला सप्तर्षींचा आशीर्वाद मिळणार आहे.’’ सर्व साधकांनी भावपूर्णपणे गुरुपरंपरेचे पूजन करून गुरुपरंपरेचा आणि सप्तर्षींचा आशीर्वाद घेतला.

 

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात झालेल्या
गुरुपौर्णिमा महोत्सवात या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अलौकिक कार्य या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथाच्या तिसर्‍या भागाच्या मराठी भाषेतील गोवा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या आवृत्तीचे प्रकाशन करतांना सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात