भावभक्तीची अनुभूती देणारी पंढरपूरची वारी !

संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा : चालता-फिरता हरिपाठच !

 

भावभक्तीची अनुभूती देणारा पालखी सोहळा !

वैयक्तिक जीवनातील अभिनिवेष बाजूला ठेवून ईश्‍वराच्या नामस्मरणात देहभान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी ! श्रीक्षेत्र आळंदी आणि देहू येथून निघणार्‍या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव ! ऊन-पावसाची तमा न बाळगता भगवी पताका खांद्यावर घेऊन टाळ-मृदुंगाचा गजर करत चालणारे वारकरी म्हणजे भावभक्तीचेच प्रतीक ! कोणाच्याही तोंडवळ्यावर चिंता नाही कि मुक्कामाच्या ठिकाणी सोयीसुविधांची अपेक्षा नाही. वारकर्‍यांना प्रतिदिन १० ते २० किलोमीटरचा टप्पा चालत पार करावा लागतो. सकाळी लवकर मार्गस्थ व्हावे लागते. अल्पाहार आणि महाप्रसादही वाटेतच घ्यावा लागतो. सायंकाळी विलंबाने मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यानंतर भजन-कीर्तन होऊन दिवसाची समाप्ती होते.

 

शिस्तबद्धतेचे दर्शन

शिस्तीचे दर्शन हे पालख्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्रत्येक दिंडीची रचना ठरलेली आहे. प्रारंभी भगवे ध्वजधारी वारकरी, मग तुळशी-वृंदावन घेतलेल्या महिला, त्यामागे टाळकरी, नंतर विणेकरी अशीच सर्व दिंड्यांची रचना असते. टाळ वाजवणार्‍या वारकर्‍यांचा पदन्यासही लयबद्ध असतो. भले टाळकरी-वारकरी शेकडोंच्या संख्येने का असेना ! गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस-प्रशासनाचाही पालखी व्यवस्थापनामध्ये चांगला सहभाग असतोे; पण तो जेव्हा अल्प होता, तेव्हाही शिस्तीचे दर्शन होतच होते. असे असले, तरी स्वच्छताविषयीच्या काही सवयींच्या संदर्भाने वारकर्‍यांचे प्रबोधनही आज आवश्यक आहे.

 

वारकर्‍यांनी साधलेला मुक्त संवाद !

पालख्या पुणे मुक्कामी असतांना काही वारकर्‍यांशी संवाद साधला. पालखी प्रस्थानापासून पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन होईपर्यंत ‘माऊली’ कशी काळजी घेतात’, असाच भाव वारकर्‍यांच्या बोलण्यातून जाणवत होता. ‘वारी हे अमृत आहे. हिंदु धर्मात आणि संतभूमी असलेल्या महाराष्ट्रात जन्म मिळणे, हे मोठे भाग्य आहे’, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. रिमझिम पावसातही डोक्यावरील तुळशी वृंदावन सांभाळत ‘माऊली-माऊली’ असा जयघोष करत चालणार्‍या महिला वारकरी पाहिल्या की, आपल्यातील देह अहंकाराची जाणीव होते. ‘सहज संवाद साधणे आणि भरभरून बोलणे’, हे वारकर्‍यांचे अजून एक वैशिष्ट्य ! बहुतांश भक्तीमार्गी वारकरी हे इतरांशी सहज संवाद साधत त्यांच्याकडचे अनुभव ‘हातचे न राखता’ सांगतात. कशाचेही अवडंबर न माजवता विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने चालणारे वारकरी हे भागवत धर्माचेच भोई आहेत. धर्मग्रंथांची केवळ पारायणे करण्यापेक्षा ‘एक तरी ओवी अनुभवावी’, असे संतांनी सांगितले आहे. हा पालखी सोहळा म्हणजे संतांच्या ओव्यांची आणि त्यांच्या कृपेची अनुभूती देणारा चालता-फिरता हरिपाठच म्हणावे लागेल.

 

असे असते दिंडी व्यवस्थापन !

पूर्वी दिंड्यांमध्ये वारकरी अल्प संख्येने असायचे; पण आता दिंड्यांमध्ये वारकर्‍यांची संख्या काही शेकडोंच्या घरात आहे. पूर्वी गावांमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी तितक्या सोयीसुविधा नव्हत्या; पण आता त्या उपलब्ध होत आहेत. दिंडीसमवेत साधारण २ ट्रक, १ पाण्याचा टँकर, २ टेम्पो आणि २ कार अशी वाहने असतात. ट्रकमध्ये जेवणाची सर्व सामग्री आणि रहाण्यासाठी लागणारे कापडी तंबू, तसेच ताडपत्र्या अशी सर्व व्यवस्था असते. साधारणपणे २ लाख रुपयांचा किराणा आणि साहित्य लागते; पण विविध देणगीदार आणि भाविक यांच्या देणग्यांच्या माध्यमातून सोय होते. याचे नियोजन एक मास आधीपासूनच चालू होते. दिंडीतील महिला स्वयंपाक बनवतात. तोच प्रसाद आम्ही सर्वजण ग्रहण करतो. सकाळी पालख्या निघण्यापूर्वी दिंडीतील काही जण वाहनांसह पुढच्या विसाव्याला निघतात. सलग २२ दिवस हाच दिनक्रम असतो. हरिनामाच्या गजरात सगळे श्रम आणि कष्ट दूर होतात. माऊली काहीही न्यून पडू देत नाहीत, याचा अनुभव येतो. (वरील सूत्रे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीतील १८ क्रमांकाच्या दिंडीप्रमुखांनी सांगितली. अल्पअधिक प्रमाणात सर्व दिंड्यांचे असेच नियोजन असते.)

 

वारकर्‍यांच्या निरिच्छ वृत्तीचे दर्शन झाले !

‘या वर्षी पुणे महापालिकेने प्रत्येक दिंडीला एक पखवाज भेट दिला; पण राज्यसरकारचे रेनकोट मिळणार असल्याच्या बातम्या होत्या. ते मिळाले नाहीत; पण आम्हाला कोणती अपेक्षा नाही. आम्ही वैष्णव कोणाकडूनही काही घेत नाही’, या प्रतिक्रियेतून वारकर्‍यांची निरिच्छ वृत्ती दिसून येते.

– डॉ. ज्योती काळे, सौ. सायली ढमढेरे आणि कु. शलाका सहस्रबुद्धे, पुणे

 

पालखी सोहळ्याची आध्यात्मिकता न्यून करणार्‍या गोष्टी टाळा !

वारीचा गाभा भक्तीमार्गाचा असला, तरी या पालखी सोहळ्यात आता हौशे-नवशे-गवशे यांचाही सुकाळ झाला आहे. मुक्कामाच्या ठिकाणी येणारे जत्रेचे स्वरूप सोहळ्याची आध्यात्मिकता अल्प करणारे आहे. पुण्यात पालख्या मुक्कामाला असतांना ज्या ठिकाणी जत्रा भरली होती, तेथील एका ठिकाणी तर चक्क मोठ्या आवाजात हिंदी चित्रपटांतील गाणी लावण्यात आली होती. या काही त्रुटी झाल्या, तर वारीच्या माध्यमातून ‘आनंदवनभुवनी’ असा अनुभव प्रत्येकालाच आल्यावाचून रहाणार नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात