ग्रहणकालात असणार्‍या संधीकालातील गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास त्रास न होता लाभच होईल !

‘या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे १६.७.२०१९ या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. ग्रहणकालात गुरुपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास त्रास न होता लाभच होईल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक ठिकाणी गुरुपूजनाचे कार्यक्रम होतात. ‘ग्रहण पाहू नये’, या भीतीने बर्‍याचदा समाजातील व्यक्ती, विशेषतः लहान मुले आणि गर्भवती स्त्रिया घराबाहेर पडत नाहीत. १६.७.२०१९ ला मध्यरात्री १.३२ पासून पहाटे ४.३० पर्यंत खंडग्रास चंद्रग्रहण आहे. याचाच अर्थ १६.७.२०१९ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजनाचा कार्यक्रम संपेपर्यंत ग्रहण नसल्याने ते चुकून पाहिले जाण्याचा प्रश्‍नच उरत नाही. १६.७.२०१९ या दिवशी दुपारी ४ पासून ग्रहणमोक्षापर्यंत, म्हणजे १७.७.२०१९ च्या पहाटे ४.३० पर्यंत ग्रहण पाळावे. बाल, रुग्णाईत, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया यांनी १६.७.२०१९ च्या रात्री ८.४० पासून ग्रहणमोक्षापर्यंत ग्रहण पाळावे.

ग्रहणकाल हा संधीकाल असल्याने वेधारंभापासून ग्रहण संपेपर्यंत नामजप, सेवा, गुरुपूजन केल्यास सहस्र पटींनी लाभ होईल. या काळात भोजन निषेध असल्याने अन्नपदार्थ खाऊ नयेत. पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग, ही कर्मे करता येतील. गुरुपौर्णिमेच्या रात्री ग्रहण असणे, म्हणजे संधीकालात असणारी गुरुपौर्णिमा होय. या दिवशी गुरूंना केली जाणारी प्रार्थना, कृतज्ञता, सेवा, दान, श्रवण, चिंतन यांचा अनंत पटींनी लाभ होणार आहे. सध्या आपत्काळ असल्याने मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. समर्पित भावाने गुरुऋण फेडण्याची ही अनमोल पर्वणी आहे. याचा सर्वांनी लाभ करून घ्यावा.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, तथा ज्योतिष  विभाग प्रमुख, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (३०.६.२०१९)