विश्‍वरूपे कुटुंबाने जपली देवभाषेची ओळख

नागपूर येथील विश्‍वरूपे कुटुंबातील सर्वजण संस्कृत भाषेत संवाद करतात !

नागपूर – ‘संस्कृत ही देवभाषा आहे, महान अशा वेदपुराणांची प्राचीन भाषा आहे’, असे आपण अभिमानाने सांगतो; पण शिकणे आणि शिकवण्यापुरते सोडले, तर या भाषेत संवाद साधणारे शोधूनही सापडणार नाही. यासाठी ‘ती संवादाची भाषा नाही’, असे म्हटले जाते; पण ‘संस्कृत ही संवादाची भाषा होऊ शकते’, ही गोष्ट येथील तात्या टोपेनगर येथे रहाणारे प्रा. अच्युत विश्‍वरूपे यांच्या कुटुंबाने सिद्ध केली आहे. त्यांची २ मुले, सुना, २ नातवंडे आपापसात केवळ संस्कृतमध्येच संवाद साधतात. विश्‍वरूपे कुटुंबातील सर्वांना संस्कृतचा लळा लागला आहे. ते आपसात इतके सहज बोलतात की, ‘संस्कृत बोलणारे कुटुंब’ अशी त्यांची ख्याती झाली आहे.

१. सध्या कुटुंबात सर्रासपणे इंग्रजीत बोलण्याची टूम (फॅड) आहे; पण जर कुणी संस्कृतमध्ये बोलत असेल, तर त्याला ‘वेडेपणा’ समजला जातो. ‘इतर भाषिक लोक त्यांच्या भाषेत बोलतात, तेव्हा आपण संस्कृतमध्ये बोललो, तर काय वेगळेपणा ?’, अशी भूमिका प्रा. विश्‍वरूपे मांडतात.

२. आरंभी त्यांना संस्कृत भाषा येत नव्हती. त्या वेळी सीताबर्डी येथे संस्कृत प्रचारिणीद्वारे संस्कृतचे वर्ग घेणारे के.रा. जोशी यांच्याकडे त्यांनी संस्कृत शिकवण्याचा आग्रह धरला.

३. ‘आपण अपुरे पडतो’ ही भावना आल्यानंतर त्यांनी संस्कृतमध्ये एम्.ए. केले. दोन्ही मुलांशी घरी, बाहेर फिरायला जातांना ते संस्कृतमधूनच संवाद साधायचे. त्यांच्या या प्रयत्नात पत्नी सौ. नंदा यांनी मोलाची साथ दिली.

४. अधिवक्ता मल्हार आणि शशांक ही त्यांची दोन्ही मुले पित्याकडून मिळालेल्या संस्कारांमुळे अतिशय सहजपणे संस्कृतमध्ये संवाद साधतात. बालपणापासून हे घडत असल्याने मुलांना ‘आपण वेगळ्या भाषेत बोलतो’, असे वाटलेच नाही. अधिवक्ता मल्हार सांगतात की, मराठी ही मातृभाषा, तर संस्कृत ही आमची पितृभाषा आहे. वडिलांची ही भाषिक देण पुढेही समर्थपणे चालवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

 

सुना आणि नातवंडे यांनीही संस्कृतचा वसा स्वीकारला !

त्यांचा मुलगा अधिवक्ता मल्हार आणि त्याची पत्नी सौ. शिल्पा, तसेच दुसरा मुलगा शशांक अन् त्याची पत्नी सौ. सुवर्णा या दोघींनीही या कुटुंबाचे हे वेगळेपण प्रेमाने स्वीकारले आणि त्याही संस्कृत भाषेच्या रंगात रंगल्या. एका सुनेने विवाहानंतर संस्कृतमध्ये एम्ए केले. प्रा. विश्‍वरूपे मुलांप्रमाणे नातवंडांसमवेतही ते संस्कृत बोलू लागले. त्यामुळे अधिवक्ता विक्रांत, पिनाक आणि डॉ. ऐश्‍वर्या ही तिन्ही नातवंडे संस्कृतमध्ये अतिशय सहज संवाद साधतात.

 

अनेकांनी ‘वेडा’ म्हणूनही विश्‍वरूपे कुटुंबाने संस्कृतप्रेम सोडले नाही !

एकदा प्रा. विश्‍वरूपे यांची नात ऐश्‍वर्या हिने शाळेत मानेचे दुखणे ‘मम ग्रीवाय: पीडा भवति’, असे संस्कृतमध्ये शिक्षिकेला सांगितले. त्या वेळी शिक्षिकेला ती काय बोलत आहे, हे न समजल्याने त्यांनी घरी दूरभाष करून ‘काय झाले’, असे विचारले होते. कुटुंबात, समाजात, प्रवासात असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. मुले आणि नातू यांंचे अनेकदा कौतुकही झाले. प्राध्यापकांचा या निश्‍चयासाठी सन्मानही झाला; पण अनेकांनी त्यांना ‘वेडा’ही म्हटले; मात्र प्रा. विश्‍वरूपे आणि त्यांच्या कुटुंबाने संस्कृतप्रेम सोडले नाही !

 

संस्कृतचा मृत भाषा म्हणून अवमान करणार्‍या
प्राध्यापकाचे वक्तव्य खोटे ठरवण्यासाठी संस्कृतमधून
संवाद साधून ती प्रचलित करण्याचा निर्धार करणारे प्रा. विश्‍वरूपे !

प्रा. अच्युत विश्‍वरूपे हिस्लॉप महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक होते. वर्ष १९६५ मध्ये त्यांच्या एका सहकार्‍याने त्यांना ‘संस्कृत ही मृत भाषा आहे’, असे म्हटले. त्यावर आक्षेप घेत, हे वक्तव्य खोटे ठरवण्यासाठी त्यांनी स्वत:पासून संस्कृतमध्ये संवाद साधण्याचा निर्धार केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात