भारतात दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण, त्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फल !

 

१. खंडग्रास चंद्रग्रहण

‘भारतात १६.७.२०१९ (आषाढ पौर्णिमा) आणि १७.७.२०१९ या २ दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी आली, तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचे तेज न्यून होते. त्या वेळी चंद्र तांबूस आणि भुरकट रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या सावलीत चंद्र काही प्रमाणात आला, तर खंडग्रास चंद्रग्रहण होते.

 

२. भारतात सर्वत्र दिसणार्‍या खंडग्रास चंद्रग्रहणाच्या वेळा

‘हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड, युरोप, आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका, रशियाचा दक्षिण प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर आणि अटलांटिक महासागर या प्रदेशात दिसणार आहे. भारतात सर्वत्र ‘खंडग्रास ग्रहण’ दिसेल. हे ग्रहण १६.७.२०१९ ला मध्यरात्री १.३२ पासून १७.७.२०१९ ला पहाटे ४.३० पर्यंत आहे.’ (संदर्भ : दाते पंचांग)

२ अ. संपूर्ण भारतातील चंद्रग्रहणाच्या वेळा

२ अ १. स्पर्श (आरंभ) : १६.७.२०१९ ला मध्यरात्री १.३२

२ अ २. मध्य : १६.७.२०१९ ला रात्री ३.०१

२ अ ३. मोक्ष (शेवट) : १७.७.२०१९ ला पहाटे ४.३०

२ आ. ग्रहणपर्व (टीप १) (ग्रहण आरंभापासून शेवटपर्यंतचा एकूण कालावधी)

२ घंटे ५८ मिनिटे’

टीप १ : पर्व म्हणजे पर्वणी किंवा पुण्यकाल होय. ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे. ‘या काळात ईश्‍वरी अनुसंधानात राहिल्यास आध्यात्मिक लाभ होतो’, असे शास्त्रात सांगितले आहे.

सौ. प्राजक्ता जोशी

२ इ. ग्रहणाचे वेध लागणे

२ इ १. अर्थ : ग्रहणापूर्वी चंद्र पृथ्वीच्या छायेत येऊ लागतो. त्यामुळे त्याचा प्रकाश हळूहळू न्यून होण्यास आरंभ होतो. यालाच ‘ग्रहणाचे वेध लागले’, असे म्हणतात.

२ इ २. कालावधी : ‘हे चंद्रग्रहण रात्रीच्या तिसर्‍या प्रहरात (टीप २) असल्याने ३ प्रहर आधी, म्हणजे १६.७.२०१९ या दिवशी दुपारी ४ वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत, म्हणजे १७.७.२०१९ च्या पहाटे ४.३० पर्यंत वेध पाळावेत.’ (संदर्भ : दाते पंचांग)

टीप २ : एक प्रहर ३ घंट्यांचा असतो. दिवसाचे ४ आणि रात्रीचे ४ प्रहर मिळून एका दिवसात एकूण ८ प्रहर असतात.

 

३. चंद्रग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम

‘वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य आणि श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन निषेध आहे; म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत; मात्र आवश्यक असल्यास पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग आणि विश्रांती घेणे, ही कर्मे करता येतील. ग्रहणकाळात मात्र ही कर्मे निषिद्ध आहेत. बालके, अशक्त आणि रुग्णाईत व्यक्ती, तसेच गर्भवती स्त्रिया यांनी १६.७.२०१९ या दिवशी रात्री ८.४० पासून ग्रहणाचे वेध पाळावेत.’ (संदर्भ : दाते पंचांग)

३ अ. आरोग्याच्या दृष्टीने वेधनियम पाळण्याचे महत्त्व !

३ अ १. शारीरिक आणि भौतिक स्तर

वेधकाळात जीवाणू वाढत असल्याने अन्न लवकर खराब होते. या काळात रोगप्रतिकार शक्ती न्यून असते. ज्याप्रमाणे रात्रीचे अन्न दुसर्‍या दिवशी शिळे होते, त्याप्रमाणे ग्रहणापूर्वीचे अन्न ग्रहणानंतर शिळे मानण्यात येते. त्यामुळे ते अन्न टाकून द्यावे. केवळ दूध आणि पाणी यांना हा नियम लागू नाही. ग्रहणापूर्वीचे दूध आणि पाणी ग्रहण संपल्यावरही वापरू शकतो.

३ अ २. मानसिक स्तर

वेधकाळात मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. ‘काही व्यक्तींना निराशा येणे, ताण वाढणे इत्यादी मानसिक त्रास होतात’, असे मानसोपचार तज्ञ सांगतात.

ग्रहणकालात केलेल्या साधनेचे फळ सहस्रो पटींनी अधिक प्रमाणात मिळते. यासाठी ग्रहणकाळात साधनेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. वेधारंभापासून ग्रहण संपेपर्यंत नामजप, स्तोत्रपठण, ध्यानधारणा इत्यादी धार्मिक कार्यांत मन गुंतवल्यास त्याचा लाभ होतो.

 

४. ग्रहणकालातील वर्ज्यावर्ज्य कृती

४ अ. वर्ज्य कृती

‘ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, मल-मूत्रविसर्जन, अभ्यंग (संपूर्ण शरिराला कोमट तेल लावून ते शरिरात जिरेपर्यंत मर्दन करणे), भोजन, खाणे-पिणे आणि कामविषयाचे सेवन ही कर्मे करू नयेत.

४ आ. कोणती कर्मे करावीत ?

१. ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे.

२. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम आणि दान करावे.

३. पूर्वी काही कारणाने खंडित झालेल्या मंत्राच्या पुरःश्‍चरणाचा आरंभ या कालावधीत केल्यास त्याचे फळ अनंत पटींनी मिळते.

४. ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे.

एखाद्या व्यक्तीला अशौच असल्यास ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान आणि दान करण्यापुरती तिला शुद्धी असते.

 

५. ग्रहणाचे राशीपरत्वे फल

५ अ. शुभ फल :  कर्क, तुला, कुंभ आणि मीन

५ आ. अशुभ फल : वृषभ, कन्या, धनु आणि मकर

५ इ. मिश्र फल : मेष, मिथुन, सिंह आणि वृश्‍चिक

ज्या राशींना अशुभ फल आहे, त्या व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहू नये.’

(संदर्भ : दाते पंचांग)

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, ज्योतिष विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात