रणझुंजार अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना जामीन संमत !

पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयकडून (केंद्रीय अन्वेषण विभाग) जाणीवपूर्वक गोवले गेलेले आणि अन्याय्य पद्धतीने अटक करण्यात आलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना  पुणे येथील विशेष न्यायालयाने ५ जुलैला जामीन संमत केला. न्यायाधीश आर्.एम्. पांडे यांनी ३० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन संमत केला.

केंद्रीय अन्वेषण विभागाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना २५ मे या दिवशी अटक केली होती. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याने दिलेल्या कथित जबाबावरून अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करण्यात आली होती. ‘अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला’, असे त्या जबाबामध्ये म्हटले होते. या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर ४ जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जामीन आवेदनावर काही युक्तीवाद झाले.

त्यांच्या जामीन आवेदनावर निर्णय होणे अपेक्षित असतांनाच १९ जून या दिवशी सीबीआयने अधिवक्ता पुनाळेकर यांच्या भ्रमणसंगणकातील डेटाविषयी पुन्हा चौकशी करायची असल्याचे सांगत अधिवक्ता पुनाळेकर यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर २५ जून या दिवशी त्यांच्या जामीन आवेदनावरील युक्तीवाद चालू झाला. त्याविषयीची पुढची सुनावणी ५ जुलैला ठेवण्यात आली होती. ५ जुलै या दिवशी काही अटींवर अधिवक्ता पुनाळेकर यांना जामीन संमत करण्यात आला. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता सुभाष झा, अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्ता मधुर राय, अधिवक्ता धर्मराज चंडेल, अधिवक्ता वसंत बनसोडे, अधिवक्ता नीलेश निढाळकर, अधिवक्त्या नीता धावडे यांनी अधिवक्ता पुनाळेकर यांच्या बाजूने काम पाहिले.

अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक झाल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी या अन्याय्य अटकेच्या विरोधात आवाज उठवण्यात आला. ‘अशील आणि अधिवक्ता यांमधील संभाषणाला कायदेशीर संरक्षण असते. असे असतांना एखाद्या अधिवक्त्याला अटक होणे हा वकिली क्षेत्रावर घाला आहे’, या भावनेने अधिवक्ता पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ अनेक अधिवक्त्यांनी बार कौन्सिलमध्ये सीबीआयच्या निषेधाचे ठराव केले, स्वाक्षरी चळवळ राबवली, हिंदुत्वनिष्ठांनी ठिकठिकाणी आंदोलने केली, तसेच प्रशासकीय स्तरावर निवेदनेही देण्यात आली.

 

भ्रष्टाचार आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय
यांविरोधातील लढा चालूच ठेवू  – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

सीबीआयने अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अन्याय्य अटक केल्यानंतर अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवक्ता साहाय्यासाठी पुढे आले. त्या सर्वांचे हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने मनापासून आभार ! विविध क्षेत्रांतील भ्रष्टाचार आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय यांच्या विरोधातील हिंदु विधीज्ञ परिषदेचा लढा पुढेही असाच चालू राहील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात