संत भक्तराज महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव

७ जुलै २०१९ ते ७ जुलै २०२० या कालावधीत साजरा होणार

इंदूर (मध्यप्रदेश) – लोकांना अध्यात्ममार्गाकडे वळवण्यासाठी जवळपास ४० वर्षे अव्याहतपणे भजन आणि भंडारा या माध्यमातून नामस्मरणाचा संदेश देणारी थोर विभूती म्हणजे संत भक्तराज महाराज ! संत भक्तराज महाराज हे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु होत. ७ जुलै १९२० हा त्यांचा जन्मदिवस. ‘प.पू. सद्गुरु भक्तराज महाराज जन्मशताब्दी महोत्सव सेवा समिती’च्या वतीने ७ जुलै २०१९ ते ७ जुलै २०२० या काळात संत भक्तराज महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त ‘हरि ॐ तत्सत्’ या मंत्राचा १३ कोटी जप करणे, संत भक्तराज महाराज यांना स्वानुभूतीतून प्रगटलेल्या भजनांचा कार्यक्रम गावोगावी आयोजित करणे, संत भक्तराज महाराज यांच्या आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ श्रीगुरुचरित्र पठणापासून झाल्याने श्री गुरुचरित्राची पारायणे करणे, जन्मोत्सवाच्या निमित्ताने स्मरणिका प्रकाशित करणे आदी संकल्प करण्यात आले आहेत. इंदूर (मध्यप्रदेश) येथील भक्तवत्सलाश्रम, मोरटक्का (जिल्हा खंडवा) येथील श्री सद्गुरु सेवा सदन आणि कांदळी येथील ‘श्री रामचंद्रदेव ट्रस्ट आणि प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ या मुख्य ठिकाणांसह अन्य ठिकाणी हे कार्यक्रम पार पडतील. ७ जुलै या दिवशी श्रीक्षेत्र कांदळी येथील संत भक्तराज महाराजांच्या समाधी मंदिरात भजन आणि नामजप कार्यक्रमाद्वारे या सोहळ्याला प्रारंभ होईल. या दिवशी सकाळी ८ वाजता संत भक्तराज महाराजांच्या समाधीवर रुद्राभिषेक, सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत सामुदायिक ‘हरि ॐ तत्सत्’ नामजप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जन्मशताब्दीच्या पावन काळात ‘संत भक्तराज महाराज यांचे परोपरीने स्मरण, वंदन आणि समर्पण करून संकल्पपूर्तीसाठी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. आर्थिक सहयोग चेक किंवा ड्राफ्टने द्यायचा झाल्यास ‘प.पू. सद्गुरु भक्तराज महाराज जन्मशताब्दी महोत्सव एवं सेवा समिती’ या नावाने पाठवावा’, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात