
नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे, चिरणे, तळणे, तसेच भूमी उकरणे, नांगरणे यांसारख्या कृती करणे निषिद्ध आहे; मात्र वर्षातील इतर दिवशी या कृती करण्यास बंधने नाहीत. नागपंचमीच्या दिवशी निषिद्ध कृती न करण्यामागील शास्त्र आणि त्या कृती केल्याने होणारी हानी याविषयीचे विवेचन लेखातून केले आहे.
१. नागदेवतेची वैशिष्ट्ये आणि कार्य
अ. नाग हा इच्छेचा प्रवर्तक आहे. इच्छेचा प्रवर्तक, म्हणजेच इच्छेला गती देणारा किंवा सकाम इच्छेची पूर्तता करणारा.
आ. नागदेवता ही इच्छेशी संबंधित कनिष्ठ देवता आहे.
२. नागपंचमीचे आध्यात्मिकदृष्ट्या असलेले महत्त्व
अ. नागपंचमीच्या दिवशी संबंधित तत्त्वाच्या देवताजन्य इच्छालहरी भूमीवर अवतरलेल्या असल्याने वायूमंडलात नागदेवताजन्य तत्त्वाचे प्रमाण जास्त असते.
आ. या दिवशी भूमीलगत इच्छाजन्य देवतास्वरूप लहरी घनीभूत होण्याचे प्रमाण जास्त असते.
३. नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे आणि तळणे या क्रिया निषिद्ध असण्याचे कारण
कापणे, चिरणे आणि तळणे, या प्रक्रियांतून रज-तमाशी संबंधित इच्छालहरी, म्हणजेच देवताजन्य इच्छालहरींच्या कार्याला अवरोध करणार्या लहरी वायूमंडलात ऊत्सर्जित होण्याचे प्रमाण जास्त असल्याने या दिवशी नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो. या कारणास्तव नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते; म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे, तळणे, तसेच भूमी उकरणे, नांगरणे, या कृती निषिद्ध मानल्या आहेत.
४. इतर दिवशी मात्र कापणे, चिरणे, तळणे, या कृतीतून पाप लागण्याचे प्रमाण अल्प असणे
इतर दिवशी अशा देवताजन्य इच्छालहरींचा वास भूमीलगत नसल्याने अशा कृती केल्यास समष्टी पाप लागण्याचे प्रमाण अल्प असते. यातूनच वायूमंडलातील त्या त्या दिवशी असणार्या देवतांच्या कार्यरत लहरींना आधारभूत मानूनच त्या त्या दिवशी ते ते सण आणि उत्सव साजरे करण्याची पद्धत हिंदु धर्मात असल्याचे लक्षात येते आणि त्याचे महत्त्व कळते.
५. पूर्वीच्या काळी कंदमुळे भाजून, तसेच उकडून खाण्याने पातक लागण्याचे प्रमाण अल्प असणे
पूर्वीच्या काळी कंदमुळे भाजून, तसेच ती उकडून खाण्याची पद्धत होती. या प्रक्रियेत कापणे, चिरणे, तसेच तळणे या कृती होत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याकडून पातक घडण्याची शक्यताही न्यून होती.
६. कलियुगात प्रत्येक कृती नामासहित करण्याचे महत्त्व
कलियुगात जुन्या परंपरा पाळणे कठीण असल्याने प्रत्येक कृतीतून निर्माण होणारे पाप नष्ट होण्यासाठी ती कृती साधनेच्या स्तरावर, म्हणजेच नामासहित करणे आवश्यक आहे, यावरून कलियुगातील नामसाधनेचे महत्त्व लक्षात येते.
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, आषाढ कृष्ण ३, कलियुग वर्ष ५१११ (१०.७.२००९))
७. नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे, तळणे यांसारख्या निषिद्ध कृती केल्यास होणारे परिणाम
अ. कापणे किंवा चिरणे
१. ‘नागपंचमीच्या दिवशी वायूमंडलात चैतन्य आणि शक्ती कणांच्या रूपात अस्तित्वात असणे
२. नागपंचमीच्या दिवशी कापण्याची (किंवा चिरण्याची) कृती केल्यामुळे सुरीच्या (किंवा विळीच्या) घर्षणातून तमोगुणी लहरी निर्माण होणे
अ. कापण्यात (किंवा चिरण्यात) येणार्या वस्तूभोवती तमोगुणी वलय निर्माण होऊन त्यातून तमोगुणी वलयांचे वातावरणात प्रक्षेपण होणे
आ. वातावरणात काळसर तमोगुणी कण पसरणे
३. नागपंचमीच्या दिवशी वातावरणात कार्यरत पवित्रके असणे आणि कापणे (किंवा चिरणे) ही तमोगुणी कृती केल्यामुळे वातावरणात काळसर ढग निर्माण होऊन वातावरण दूषित होणे
कापणे, तळणे, चिरणे यांसारख्या कृतींतून रज-तमप्रधान स्पंदनांची निर्मिती होते आणि त्याचा व्यक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी या कृती करू नयेत.’
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा, आषाढ कृ. १, कलियुग वर्ष ५१११ (८.७.२००९)
खुप महत्वपूर्ण अशी माहिती मिळाली आणि कलियुगात नाम साधनेचे महत्त्व ही समजले खुप खुप धन्यवाद..