राजकीय पक्ष स्थापून सत्ता मिळवण्याच्या संदर्भात सनातन संस्थेचा दृष्टीकोन

परात्पर गुरु डॉ. आठवले

सनातन संस्थेचे वाढते कार्य आणि समाजाचा वाढता प्रतिसाद पाहून अनेक हितचिंतक, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून ‘सनातन संस्थेने आता राजकीय पक्षाची स्थापना करून हिंदु समाजाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात’, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. सनातन संस्थेने स्थापनेपासूनच याविषयीची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. तरीही पुन:पुन्हा चर्चा होत असल्याने संस्थेचा याविषयीचा दृष्टीकोन येथे पुन्हा स्पष्ट करत आहोत.

सनातन संस्था ही अध्यात्मप्रसार करणारी संघटना आहे. ‘रामराज्याप्रमाणे सात्त्विक समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने साधना करायला हवी’, या उद्देशाने सनातन संस्था मागील २० वर्षांपासून देशभरात कार्य करत आहे. हे कार्य केवळ अध्यात्मप्रसार आणि हिंदु धर्माच्या श्रेष्ठतेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने चालू आहे. स्थापनेच्या वेळी संस्था केवळ ईश्‍वरप्राप्तीसाठी साधनेचा प्रसार करत होती; मात्र कालांतराने हिंदु धर्मावर विविधांगांनी होणारे आघात लक्षात घेता धर्मरक्षणाच्या क्षेत्रातही कार्य करण्याची आवश्यकता ओळखून सनातन संस्थेने धर्मरक्षण, राष्ट्रजागृती आणि हिंदूसंघटन या क्षेत्रांत कार्य करण्यास आरंभ केला. या सर्व कार्यांचा मूळ उद्देश सर्वश्रेष्ठ अशा हिंदु धर्माचे रक्षण हा आहे; मात्र अशा प्रकारच्या कार्यांतून सनातन संस्थेला राजकीय सत्ता प्राप्त करण्याची इच्छा असल्याची चर्चा काहीजण करतात. ‘सनातन संस्था कोणताही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही किंवा निवडणुकाही लढवणार नाही. सनातन संस्थेला अपेक्षित हिंदु राष्ट्र हे निवडणुकांच्या माध्यमातून नसून सात्त्विक आणि धर्माचरणी समाजाच्या निर्मितीतून होणार आहे. सात्त्विक आणि धर्मनिष्ठ राज्यकर्ते सत्तेवर आल्यानंतर धर्मरक्षणासाठी ते दक्ष रहातील अन् जनतेला काही कृती करण्याची आवश्यकता नसेल. त्यामुळे सनातनचे साधक मूळ ध्येयानुसार ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करू शकतील’, ही सनातन संस्थेची भूमिका आहे. ईश्‍वरप्राप्तीमध्येच सर्वश्रेष्ठ आणि चिरंतन आनंद सामावला असल्यामुळे सत्ताप्राप्तीसारख्या क्षणिक सुखामध्ये सनातनचे साधक रमणार नाहीत.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले, संस्थापक, सनातन संस्था
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात