शल्यचिकित्सा शास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ‘सुश्रुत’ यांचा ‘पशूवैद्यक’ असा उल्लेख !

प्राचार्य डॉ. श्याम भुतडा यांची पाठ्यपुस्तक मंडळाकडे तक्रार

  • पाठ्यपुस्तक मंडळाचा भोंगळ कारभार आणि अज्ञान उघड ! 
  • जेव्हा विश्‍वातील अन्य संस्कृतीतील लोक जंगलातील मानवाप्रमाणे रहात होते, तेव्हा भारतात सर्वश्रेष्ठतम सनातन वेदसंस्कृती विकसित होऊन लोक समृद्ध आणि सुखी जीवन जगत होते. ‘सुश्रुत’ यांची शल्यचिकित्सा हा याच प्राचीन सनातन हिंदु संस्कृतीचा एक अत्यंत अभिमानास्पद वारसा आहे. असे असतांना त्यांचा उल्लेख पशूवैद्यक म्हणून करून पाठ्यपुस्तक मंडळाने त्यांचा अवमानच केला आहे. 
  • मेकॉलेप्रणीत पाश्‍चात्त्य शिक्षणपद्धतीचा पगडा असलेले असे पाठ्यपुस्तक मंडळ पुस्तकांमधून भावी पिढीला प्राचीन हिंदु संस्कृतीचे महत्त्व काय सांगणार ? 
  • हिंदूंनो, तुमचा धर्म आणि संस्कृती यांची अस्मिता जपणारे शिक्षण पुढील पिढीपर्यंत पोचवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे, हे लक्षात घ्या !

वर्धा – सहावीच्या बालभारतीच्या पुस्तकात शल्यचिकित्सा शास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ‘सुश्रुत’ यांचा उल्लेख चक्क ‘पशूवैद्यक’ असा करून राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने एक प्रकारे त्यांचा अवमानच केला आहे आणि स्वतःचे अज्ञानही उघड केले आहे. (‘सुश्रुतां’विषयी असा अयोग्य उल्लेख करणार्‍या पाठ्यपुस्तक मंडळाने त्याची वैचारिक दिवाळखोरीच दाखवून दिली आहे. पाठ्यपुस्तकात वारंवार होणार्‍या विविध चुका आणि पाठ्यपुस्तक मंडळाचा भोंगळ कारभार यांमुळे पाठ्यपुस्तक मंडळाची विश्‍वासार्हता अल्प होत आहे ! – संपादक) पाठ्यपुस्तकात सुश्रुताविषयी चुकीची माहिती असल्याचे निदर्शनास आल्यावर येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम भुतडा यांनी पाठ्यपुस्तक मंडळाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. राजीव कुमार यांच्याशी संपर्क साधला. पृथ्वीवरील पहिले ‘सर्जन’ म्हणून ओळख असणार्‍या सुश्रुत यांचा ‘पशुवैद्यक’ असा उल्लेख केल्याविषयी निषेध नोंदवत त्यांनी हा भाग वगळण्याची मागणी त्यांच्याकडे केली. (पाठ्यपुस्तकात सुश्रुतांविषयी चुकीची माहिती दिल्यानंतर त्याविषयी त्वरित तक्रार करणारे प्राचार्य डॉ. श्याम भुतडा यांचे अभिनंदन ! – संपादक)

विशेष म्हणजे ही चुकीची माहिती वर्ष २०१६ पासून विद्यार्थ्यांना दिली जात आहे.

१. राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता सहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आयुर्वेदाविषयी माहिती देतांना ही घोडचूक केल्याचे निदर्शनास आल्यावर येथील डॉ. श्याम भुतडा यांनी ८ जूनला तक्रार प्रविष्ट केली, तर पाठ्यपुस्तक मंडळाच्या या कृतीच्या विरोधात आयुर्वेद क्षेत्रातून निषेधाचे सूर उमटत आहेत.

२. सहावीच्या बालभारतीच्या पुस्तकात गुरु शालिहोत्र शिष्य सुश्रुतास पशूवैद्यकीय धडे देत असल्याचा पाठ आहे.

३. त्यात ‘सुश्रुत हे पशूवैद्यकशास्त्राचे गुणी विद्यार्थी होते’, असा उल्लेख आहे. अश्‍वावर शस्त्रक्रियेच्या वेळी दक्षता घेण्याविषयी मार्गदर्शन करतांना सुश्रुत सांगतात, ‘चांगल्या पशूवैद्यकाकडे सिंहाची छाती आणि आईचे ममत्व असणे आवश्यक आहे.’ यासमवेत सुश्रुत यांनी पशूंच्या शस्त्रक्रियेविषयी ग्रंथ लिहिल्याचा उल्लेख या पाठात आहे.

४. सुश्रुत यांचा ‘पशूवैद्यक’ असा उल्लेख करणे, ही गोष्ट अत्यंत अवमानकारक असल्याची प्रतिक्रिया आयुर्वेद क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

५. वस्तूतः ‘सुश्रुत’ हे एक महान शल्यचिकित्सक होते. प्राचीन आयुर्वेदशास्त्रात त्यांचे महत्त्व आणि योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी शस्त्रक्रियेसाठी शोधलेली उपकरणे काही प्रमाणात फेरपालट करून आजही उपयोगात आणली जातात.

६. मानवी अवयवांवरील शस्त्रक्रियेसाठी त्याचे मार्गदर्शन मोलाचे समजले जाते. युद्धात घायाळ झालेल्या सैनिकांवर उपचार करतांना सुश्रुत यांचे ज्ञान कामी येत असे, असा संदर्भ इतिहासात आहे.

सहावीच्या पुस्तकातील सुश्रुतांविषयीचा चुकीचा उल्लेख त्वरित वगळणार आहे, अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. राजीव कुमार यांनी डॉ. भुतडा यांना दिली. (इतरांनी तक्रार केल्यानंतर जागे होणारे असे शैक्षणिक सल्लागार पाठ्यपुस्तक मंडळाचा कारभार कसा करत असतील, याची कल्पना येते ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात