भावी आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून, तसेच नेहमीसाठीही स्वतःच्या घरी न्यूनतम २-३ तुळशीची रोपे लावा !

वैद्य मेघराज पराडकर

हिंदु धर्म आणि आयुर्वेद यांमध्ये तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुळशीत श्रीविष्णुतत्त्व असते. ‘प्रत्येक घरात तुळस असावीच’, असे धर्मशास्त्र सांगते. तुळस असंख्य विकारांमध्ये उपयोगी पडते. आयुर्वेदानुसार कोणत्याही विकारात वात, पित्त आणि कफ या ३ दोषांपैकी एक किंवा जास्त दोष प्रभावित होतात. सामान्यपणे वात आणि कफ यांवर उष्ण, तर पित्तावर शीत (थंड) औषधाची योजना केली जाते. उष्ण आणि शीत (थंड) हे दोन्ही गुणधर्म एकाच झाडात असल्याचे ‘तुळस’ हे एक अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे. तुळशीची पाने उष्ण आणि बी थंड असते.

तुळशीचे लाभ लक्षात घेऊन भावी आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून, तसेच नेहमीसाठीही सर्वांनीच आपल्या घरी तुळशीची रोपे लावावीत. औषधासाठी तुळशीची न्यूनता भासू नये, यासाठी एकच रोप लावण्याऐवजी न्यूनतम २ – ३ तरी रोपे लावावीत. तुळशीच्या मंजिरीमध्ये तिचे बी असते. एका मंजिरीतील बियांपासूनही अनेक तुळशीची रोपे तयार होतात. पावसाळा चालू होण्यापूर्वी किंवा पहिला पाऊस पडल्यावर पेरलेले बी उगवण्याची शक्यता जास्त असते. पावसाळा चालू होत असल्याने ही लागवड शक्य तेवढ्या लवकर करावी. पाऊस चालू झाल्यावर तुळशीच्या मोठ्या रोपाखाली नैसर्गिकपणे तिचे बी पडून काही रोपे उगवतात. ही रोपे खणून काढून त्यांची पुन्हा लागवड करता येते.

आयुर्वेदानुसार ‘शुक्ला कृष्णा च तुलसी गुणैस्तुल्या प्रकीर्तिता ।’ (संदर्भ : भावप्रकाश निघंटु) म्हणजे ‘पांढर्‍या आणि काळ्या तुळशींचे गुणधर्म एकसारखेच आहेत.’ यामुळे दोनपैकी कोणत्याही तुळशीची लागवड करता येईल.

तुळशीचे सविस्तर औषधी उपयोग सनातनचा ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ यात दिले आहेत. तुळशीची लागवड कुंडी किंवा प्लास्टिकची पिशवी यांतही करता येते. ही लागवड कशी करावी आणि लावलेल्या रोपाची काळजी कशी घ्यावी, याचे सविस्तर विवेचन सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’ यात दिले आहे. साधकांनी या ग्रंथांचा अभ्यास करून आपल्या घरी तुळशीची लागवड करावी.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०१९)