अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवस

राष्ट्र आणि धर्म विषयक प्रबोधन सत्र

२ जून या दिवशी सायंकाळच्या सत्रात विविध मान्यवरांनी राष्ट्र आणि धर्म विषयक प्रबोधन केले. या उद्बोधन सत्राचे वृत्त देत आहोत.

 

सिंधी समाज हा हिंदु धर्माचेच अंग ! – डॉ. संतश्री पू. युधिष्ठिरलाल महाराज,
नवम् पीठाधीश पू. शदाणी दरबार तीर्थ, रायपूर, छत्तीसगढ

डॉ. संतश्री पू. युधिष्ठिरलाल महाराज, नवम् पीठाधीश पू. शदाणी दरबार तीर्थ, रायपूर, छत्तीसगढ.

स्वातंत्र्यानंतर पंजाबी लोकांना पंजाब राज्य मिळाले, गुजरातींना गुजरात मिळाले, मराठ्यांना महाराष्ट्र मिळाले; पण सिंधी लोकांना कोणताही स्वतंत्र प्रांत मिळाला नाही. ते देशभरात विविध ठिकाणी विखुरले आणि तेथेच स्थायिक झाले. सिंधी स्वतःला हिंदूच मानतात. सिंधी समाज हा असा समाज आहे की, ज्यांनी विभाजन स्वीकारले; पण धर्म सोडला नाही.

अशाच प्रकारे हिंदूंमधील स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत केले, तर भारत एक दिवस विश्‍वगुरुपदी विराजमान होईल. भाजपने घोषणापत्रात कलम ३७० रहित करणे, घुसखोरांना हटवणे आणि शेजारी राष्ट्रांतील शरणार्थी हिंदूंना भारताचे नागरिकत्व देणे अशी आश्‍वासने दिली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी हिंदूंनी भाजप सरकारवर दबाव आणायला हवा.

अधिवेशन म्हणजे राष्ट्रभावना बळकट करणारा एक राष्ट्रभक्तीयज्ञ !

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्या रूपाने मला एक खंबीर साथीदार मिळाला आहे. हे अधिवेशन म्हणजे राष्ट्रभावना बळकट करणारा एक राष्ट्रभक्ती यज्ञ आहे.

 

काश्मीरमध्ये राष्ट्रीयत्व परत आणायचे असेल,
तर हिंदूंचे पुनर्वसन आवश्यक ! – श्री. राहुल कौल, पनून कश्मीर

श्री. राहुल कौल, पनून कश्मीर

‘केवळ कलम ३७० आणि ३५ अ रहित करून काश्मीर भारताशी जोडले जाईल’, असे वाटणे, हा भ्रम आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने भाजपप्रणित केंद्र सरकारला ३७० कलम रहित करण्याविषयी प्रविष्ट केलेल्या याचिकांच्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले, तेव्हा सरकारने त्या संदर्भात ठोस भूमिका घेतली नाही. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमधून आतापर्यंत ७ वेळा जे विस्थापन झाले, ते केवळ राजकीय कारणांमुळे नाही, तर धार्मिक कारणांमुळे म्हणजे जिहादी आतंकवादामुळे झाले आहे. जम्मू-काश्मीर भारताशी पूर्णपणे जोडायचे असेल, तर तेथील सांस्कृतिक, धार्मिक आणि राजनैतिक परंपरा पुनरुज्जीवित करायला हव्यात. तेथे लोकसांख्यिक समतोल (demographic balance) निर्माण करायला हवा.

‘हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी आरंभलेल्या ‘एक भारत अभियाना’अंतर्गत ‘पनून कश्मीर’ने (‘आमचे काश्मीर’ने) ‘पनून भारत’ची (आमचा भारत) परिभाषा धारण केली आहे’, असेही श्री. कौल यांनी सांगितले.

 

हिंदु धर्मच पर्यावरणरक्षक ! – श्री. अनिल धीर, भारत रक्षा मंच, ओडिशा

श्री. अनिल धीर, भारत रक्षा मंच, ओडिशा

केवळ हिंदु धर्मच निसर्गाशी जवळीक साधणारा आहे. हिंदु धर्म मुळातच पर्यावरणरक्षक आणि संवर्धक असल्याने तो विश्‍वाला भेडसावणार्‍या पर्यावरणाच्या संदर्भात मार्गदर्शन करू शकतो. ख्रिस्ती, इस्लाम या पंथांमध्ये पर्यावरणरक्षणाच्या संदर्भात काहीही सांगितलेले नाही. जिहादी आतंकवादाच्या खालोखाल पर्यावरणाची समस्या विश्‍वाला भेडसावणारी समस्या आहे. ओडिशामध्ये एप्रिलमध्ये जे विध्वंसक चक्रीवादळ आले, ते तापमानवाढीमुळेच आले. ‘समुद्राचे तापमान नेहमीपेक्षा अधिक वाढल्याने हे वादळ आलेे’, असे तज्ञ सांगतात. इतक्या वर्षांत पहिल्यांदाच तापमानात वाढ झाली. हिंदु संस्कृती नदीच्या काठावर, वनांमध्ये विकसित झाली. अन्य पंथ हे वाळवंटात निर्माण झाले. विदेशामध्ये होणार्‍या निवडणुकांमध्ये ‘पर्यावरण’ हे महत्त्वाचे सूत्र असते; मात्र ‘नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप, तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या घोषणापत्रात पर्यावरणाचे सूत्र नव्हते. ‘सध्या विकासाची भाषा बोलली जाते; पण पर्यावरणरक्षणाकडे लक्ष दिले जात नाही. सर्रासपणे पर्यावरणाचे उल्लंघन करून विकासकामांना अनुमती दिली जाते’, हे दुर्दैवी आहे.

 

घटनाबाह्य पद्धतीने घुसडलेले कलम ‘३५ (अ)’ रहित करा !
– रोहित भट, युथ फॉर पनून कश्मीर, पुणे

रोहित भट, युथ फॉर पनून कश्मीर, पुणे

कलम ३५ (अ) नुसार भारतातील कोणतीही व्यक्ती काश्मीरमध्ये भूमी खरेदी करू शकत नाही. येथे नोकरी किंवा व्यवसाय करू शकत नाही. कलम १४ नुसार कोणतीही व्यक्ती भारतात कुठेही जाऊ शकते आणि व्यवसाय करू शकते. ३५ (अ) हे कलम १४ च्या विपरीत आहे. कलम ३५ (अ) घटनाबाह्य पद्धतीने म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांमध्ये संमत करून न घेता राज्यघटनेत घुसडण्यात आले. घटनाबाह्य पद्धतीने समाविष्ट करण्यात आलेले हे कलम रहित करायला हवे.

 

चक्रवर्ती साम्राज्य बनवण्याचे सामर्थ्य केवळ भारतात !
– प्रा. कुसुमलता केडिया, अध्यक्ष, राजसूय हिंदु विद्या केंद्र, भोपाळ, मध्यप्रदेश.

प्रा. कुसुमलता केडिया, अध्यक्ष, राजसूय हिंदु विद्या केंद्र, भोपाळ, मध्यप्रदेश.

वर्ष १८४० पर्यंत भारत चक्रवर्ती साम्राज्यच होते. स्वातंत्र्यानंतर भारताला लागलेले नेहरू घराण्याचे ग्रहण सुटत चालले आहे. पुढील १५-१६ वर्षांत पाक नष्ट होईल आणि भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल. तेव्हा भारताचा होणारा राजा ‘अँग्लो इंडियन गव्हर्नन्स मॅन्युअल’ वाचून नव्हे, तर भारतातील सर्व नद्यांच्या जलाभिषेकाने सिंहासन ग्रहण करेल. अमेरिका, रशिया, युरोप या देशांमध्ये ‘चक्रवर्ती राजा’ ही संकल्पनाच नसून तेथे आतापर्यंत एकही ‘चक्रवर्ती राजा’ झालेला नाही. चक्रवर्ती साम्राज्य बनवण्याचे सामर्थ्य केवळ भारतातच आहे. सध्या चालू असलेले २१ वे शतक आणि येथून पुढील अनेक शतके भारताच्या उज्ज्वल भविष्याची आहेत, असे प्रतिपादन प्रा. कुसुमलता केडिया यांनी ‘भविष्यातील चक्रवर्ती भारत’ या विषयावर बोलतांना केले.

प्रा. केडिया पुढे म्हणाल्या की ‘‘नरेंद्र मोदी यांनी गेल्या ५ वर्षांत अमेरिका, इस्रायल, युरोपातील राष्ट्र्रे, रशिया या राष्ट्रांशी मैत्री केल्याने शत्रूराष्ट्र पाक आणि धूर्त चीन हे भारताला घाबरून आहेत. त्यांना भारताशी मैत्री केल्याविना अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही.’’