अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा चतुर्थ दिवस

‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन आणि मंदिरे
सरकारीकरणापासून मुक्त करण्या’साठी पत्रकार परिषद !

डावीकडून : श्री. टी.आर. रमेश, श्री. राहुल कौल, श्री. रोहित भट आणि श्री. रमेश शिंदे

केंद्र सरकारने काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद स्वीकारल्यासच
त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया शक्य ! – पनून कश्मीर

रामनाथी (गोवा) – लक्षावधी काश्मिरी हिंदूंचे विस्थापन होऊन जवळपास 3 दशके लोटली. या दृष्टीने सर्व समाजघटकांना, विशेषतः काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये परत बोलावून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी खालील 3 सूत्रांचा अवलंब करण्यात यावा आणि देशातील सामाजिक संघर्ष टाळावा –

1. 1990 च्या दशकात लक्षावधी काश्मिरी हिंदू हे ‘धार्मिक विच्छेद’ आणि ‘वंशविच्छेद’ यांना बळी पडल्यामुळे त्यांचे निर्वासन झाले, हे आपण जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत काश्मीरमधील हिंदूंना खोर्‍यात परत बोलावून त्यांच्या पुनर्वसनाचे कार्य होऊ शकणार नाही. ‘काश्मीरमधील हिंदूंना परत बोलावून त्यांचे पुनर्वसन करणे’, या प्रश्‍नावर इतर कोणत्याही मार्गाने उपाय योजला जाऊ शकत नाही, किंबहुना ती कृती म्हणजे हिंदूंच्या दुर्दैवी वंशविच्छेदाला नाकारण्यासारखेच आहे. वंशविच्छेदाचे वास्तव मान्य न केल्यास असे प्रश्‍न देशात कधीही आणि कुठेही उभे राहू शकतात, हे विसरता कामा नये.

2. ‘हिंदूंचा वंशविच्छेद झाला आहे’, असे मानून असा वंशविच्छेद टाळण्यासाठी बंधनकारक असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करावी. तसेच काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी एका लवादाची स्थापना करावी.

3. काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमधील एक प्रदेश निवडून त्याचे ‘पनून कश्मीर’ (आमचे काश्मीर) असे नामकरण करावे. तो एक केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करून तेथे भारतीय घटनेने पारित केलेले कायदे लागू व्हावेत. असे झाले, तरच काश्मिरी हिंदूंना आधार मिळून त्यांचे कायमचे पुनर्वसन होईल’, असे वक्तव्य ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल यांनी येथे केले.

‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने येथील विद्याधिराज सभागृहात 1 जून या दिवशी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेला संबोधित करतांना श्री. कौल बोलत होते. या परिषदेला ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. रोहित भट, चेन्नई येथील ‘टेंपल वर्शिपर्स सोसायटी’चे अध्यक्ष श्री. टी.आर्. रमेश आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हेही उपस्थित होते.

या वेळी श्री. रोहित भट म्हणाले, ‘‘बंगालमध्ये आज जी स्थिती निर्माण झाली आहे, तशीच स्थिती 20 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये होती. त्यामुळे हिंदूंनी सतर्क राहून वेळीच योग्य उपाययोजना आखायला हवी, अन्यथा हिंदूंची स्थिती आणखी बिघडेल.’’

हिंदूंच्या मंदिरांचे घटनाबाह्य सरकारीकरण रहित करण्यात यावे ! – टी.आर्. रमेश

‘भारतीय राज्यघटनेतील कलम 25 नुसार देशातील ‘हिंदूंसहित’ सर्व नागरिकांना मूलभूत धार्मिक अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.तसेच घटनेच्या कलम 29(1) नुसार धार्मिक गटांच्या मूलभूत सांस्कृतिक, धार्मिक आणि प्रशासकीय अधिकारांवर कोणीही धर्माच्या आधारावर पक्षपात करू शकत नाही अथवा निर्बंध घालू शकत नाही. त्यामुळे हे धार्मिक अधिकार केवळ अल्पसंख्यांकांनाच लागू आहेत, असे मानणे चुकीचे ठरेल’, असे विचार श्री. टी.आर्. रमेश यांनी मांडले.

 

अयोध्येतील इस्लामीकरणाच्या विरोधात हिंदूंनी जागृत होणे अत्यावश्यक !

डाविकडून श्री. पी. मदन गूप्ता, आचार्य वैद्य रामप्रकाश पांडे, त्रिदंडी स्वामी चैतन्य दास भारती महाराज, श्री. चेतन गाडी आणि बोलताना श्री. टी. आर. रमेश

अयोध्या ही देवतांनी निर्मिलेली कौशलनगरी आहे. अयोध्येची एकूण भूमी शास्त्रीय परिभाषेत ८४ कोस (अंदाचे २५२ किलोमीटर) आहे. या परिसरात दशरथकुंड, सीताकुंड, सप्तसागर सरोवर यांसह अनेक कुंड आणि सरोवर यांचा समावेश होता; मात्र आज प्रत्यक्षात अयोध्यानगरी अवघी ५ किलोमीटर एवढीच शिल्लक राहिली आहे. उर्वरित भागात अनेक ठिकाणी मशीद आणि मजार उभारले गेले आहेत. सद्यःस्थितीत अयोध्येत ३४ मशिदी निर्माण झाल्या आहेत. अयोध्येत वेगाने होणार्‍या इस्लामीकरणाच्या संदर्भात हिंदूंनी जागृत होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील सद्गुरु सेवा प्रतिष्ठानचे प्रबंधक आचार्य वैद्य रामप्रकाश पांडे यांनी केले.

‘अयोध्येतील दशरथकुंड, सीताकुंड यांसह २७ कुंड लुप्त झाले आहेत. हे कुंड बुजवून अवैध बांधकाम करण्यात आले आहे. योगिनी कुंड आणि सप्तसागर सरोवर भूमाफियांना विकले गेले, तर काहींवर अतिक्रमण करण्यात आले आहे; पण सरकार आणि प्रशासन यांच्याकडून यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशा प्रकारे अयोध्येची सनातन संस्कृती नष्ट होत आहे’, असे त्यांनी सांगितले. अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी ‘मंदिररक्षण’च्या संदर्भात उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी तेलंगण येथील ऋषी जीवन समाजाचे संस्थापक श्री. पी. मदन गुप्ता, चेन्नई (तमिळनाडू) येथील टेंपल वर्शिपर्स सोसायटीचे अध्यक्ष श्री. रमेश टी.आर्., मल्लपुरम् (केरळ) येथील हिंदु ऐक्य वेदीचे जिल्हा उपाध्यक्ष त्रिदंडी स्वामी श्री चैतन्यदास भारती महाराज, हिंदु जनजागृती समितीचे तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी उपस्थित होते.

अयोध्येतील इस्लामीकरणाच्या विरोधात हिंदूंनी जागृत होणे अत्यावश्यक !
– आचार्य वैद्य रामप्रकाश पांडे, प्रबंधक, सद्गुरु सेवा प्रतिष्ठान, अयोध्या (उत्तरप्रदेश)

 

राज्य सरकारने बळकावलेल्या देवस्थानच्या भूमी परत मिळवण्यासाठी प्रयत्न आवश्यक !
– श्री. रमेश टी.आर्., अध्यक्ष, टेंपल वर्शिपर्स सोसायटी, तमिळनाडू

 

मंदिरांच्या दुर्दशेला मोगल, इंग्रज आणि भारतीय राज्यकर्ते कारणीभूत !
– पी. मदन गुप्ता, संस्थापक, ऋषि जीवन समाज, भाग्यनगर (हैदराबाद), तेलंगण

 

केरळमध्ये साम्यवाद्यांच्या हिंदुविरोधी कारवायांना पोलिसांचे समर्थन !
– त्रिदंडी स्वामी श्री चैतन्यदास भारती, उपाध्यक्ष, हिंदू ऐक्य वेदी, केरळ

 

येणार्‍या काळात सनातनचे निर्दोषत्व सिद्ध होईल ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

सनातन संस्थेने दाभोलकरांच्या ट्रस्टमधील घोटाळे बाहेर काढले, तसेच पानसरे नेतृत्व करत असलल्ेया सहकारी बँकेत माकपने अवैध ठेवी ठेवल्याचे उघड केले. यामुळेच ‘हिंदु राष्ट्र’ निर्मितीच्या कार्याला खंडित करायचे असेल, तर सनातन संस्थेची मुस्कटदाबी करा’, ही धर्मविरोधकांची मानसिकता झाली आहे. त्यानुसार सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांना ‘सॉफ्ट टार्गेट’ करून गोबेल्स नीतीप्रमाणे अन्वेषण यंत्रणांसह पुरोगामी सनातनला आतंकवादी ठरवण्याचा आटापिटा करत आहेत. डाव्यांकडून केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये अनेक हिंदुत्वनिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांची हत्या केली. त्यांची चर्चा करण्यात येत नाही; मात्र ‘देशात केवळ दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांचीच हत्या झाली असून हिंदुत्वनिष्ठ संघटना आतंकवादी आहेत’, असे भासवण्यात येत आहे. दाखल झालेल्या खटल्यांमध्ये पुरावे नसल्याने न्यायालयीन खटलेही चालवले जात नाहीत; मात्र येणार्‍या काळात सनातनचे निर्दोषत्व सिद्ध होईल.

 

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात परिसंवाद :
‘मंदिराचे सरकारीकरण योग्य आहे का ?’

मंदिरांचे सरकारीकरण थांबवण्याकरता राष्ट्रीय स्तरावर आंदोलन व्हावे ! – परिसंवादातील मान्यवरांचा सूर

डावीकडून श्री. रमेश शिंदे, श्री. अनिल धीर, श्री. चेतन राजहंस, श्री. टी.आर्. रमेश आणि सौ. रितू राठोड

‘सरकारने मंदिराचे अधिग्रहण करणे थांबवावे आणि अधिग्रहित झालेली मंदिरे स्वतंत्र करण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक व्यापक आंदोलन केले पाहिजे, तसेच आपापल्या क्षेत्रामध्ये होणार्‍या मंदिरांच्या अपप्रकारांच्या विरोधात सर्वांनी कृतीशील झाले पाहिजे’, असा सूर ‘मंदिराचे सरकारीकरण योग्य आहे का ?’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादामध्ये उमटला. अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, भारत रक्षा मंचाचे महासचिव श्री. अनिल धीर, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, चेन्नई येथील टेंपल वर्शिपर्स सोसायटीचे अध्यक्ष श्री. टी.आर्. रमेश, ‘हिंदु चार्टर’च्या सौ. रितू राठोड यांनी सहभाग घेतला. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी परिसंवादाचे निवेदन केेले.

१. सध्या भारतातील गझनींकडून मंदिरांची लूट ! – श्री. रमेश शिंदे

२. पुरातत्व विभागाला मंदिराची नाही, तर केवळ ताजमहलची काळजी आहे ! – श्री. अनिल धीर

३. हिंदूंनी त्यांच्या मुलांना धर्मशिक्षण कुठे द्यायचे ? – सौ. रितू राठोड, हिंदु चार्टर

४. मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात कायदेशीर लढा आवश्यक ! – श्री. टी.आर्. रमेश, टेंपल वर्शिपर्स सोसायटी, चेन्नई