अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा समारोपीय दिवस

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातून हिंदुत्वनिष्ठांनी उघड केली हिंदुत्वावरील संकटे !

‘इसिस’च्या आतंकवाद्यांना ‘एम्.आय.एम्’च्या ओवैसीकडून
उघड साहाय्य ! – भाजप आमदार टी. राजा सिंह, भाग्यनगर

भाजप आमदार टी. राजा सिंह, भाग्यनगर

रामनाथी (गोवा) : भाग्यनगर (हैद्राबाद) येथे वर्ष २००२ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत अनेक निरपराधी बळी पडले. या प्रकरणात अटक केलेल्या आतंकवाद्यांना ‘एम्आयएम्’च्या ओवैसींनी साहाय्य केले. यानंतर १ जून २०१८ मध्ये ‘इसिस’च्या १२ आतंकवाद्यांना ‘एन्आयए’ने (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने) अटक करून त्यांनी मला आणि श्री भाग्यलक्ष्मी मंदिराला लक्ष्य करून आक्रमण करण्याचा कट उधळला. त्या वेळी ‘एन्आयएने पकडलेल्या या सर्व आतंकवाद्यांना आम्ही साहाय्य करू’, असे औवेसी यांनी घोषित केले. अशा प्रकारे ओवैसी उघडपणे आतंकवाद्यांचे समर्थन करत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत हिंदूंचे प्रभावी संघटन आम्ही उभे केले. पूर्वी तेलंगण राज्यात उघडपणे गोमातेची हत्या केली जात होती. आमचे कार्य चालू झाल्यामुळे बकरी ईदच्या पूर्वी पोलीस प्रशासन स्वत:हून कार्यरत होते आणि सीमेवरच गस्त घालणे, गोतस्करांना कह्यात घेणे, अशा कृती करते. ही हिंदूंच्या संघटनाची शक्ती असून ‘इतिहासाने आपल्याला लक्षात ठेवावे, असे हिंदुत्वाचे कार्य करा, असे आवाहन तेलंगण येथील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. ते ४ जून या दिवशी ‘हिंदुत्वाचे कार्य करतांना झालेला विरोध आणि त्याला केलेला प्रतिकार’ या विषयावर बोलत होते.

या वेळी सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता किरण बेट्टादापूर, मध्यप्रदेश येथील अखिल भारत हिंदु महासभेचे प्रदेश महामंत्री श्री. जितेंद्र सिंह ठाकूर, प्रतापगड (उत्तरप्रदेश) येथील श्री. प्रकाश सिंह, वाराणसी येथील ‘इंडिया विथ विज्डम ग्रुप’चे संयोजक श्री. अनुराग पांडे, हिंदु महासभेचे कार्यालयमंत्री श्री. वीरेश त्यागी, उद्योगपती परिषदेेचे मार्गदर्शक पू. प्रदीप खेमका, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र आणि गुजरात समन्वयक श्री. मनोज खाडये आणि समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

टी. राजासिंह यांच्या मार्गदर्शनातील उद्बोधक सूत्रे

१. वर्ष २०१९ मध्ये तेलंगणमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा मी एकमेव उमेदवार निवडून आलो. ईश्‍वराच्या आशीर्वादामुळे मी निवडणूक जिंकलो. जो धर्मकार्य करतो, त्याच्या पाठीशी ईश्‍वराचा आशीर्वाद असतोच. ‘जो धर्माचे कार्य करतो, त्याचे स्वतः धर्म रक्षण करतो’, हे मी अनुभवतो.

२. गाय वाचली, तरच देश वाचेल. पूर्वी आम्ही अतिशय खडतर परिस्थितीत गोरक्षणाचे कार्य केले आहे. गोरक्षण करतांना वाहनांचा पाठलाग करण्यासाठी जातांना आमच्या गाड्यांत पेट्रोल भरण्यासाठी पैसेही नसायचे. पेट्रोल व्यय व्हायला नको’; म्हणून उतारांवरून आम्ही गाड्या बंद करून चालवायचो. गोरक्षणाचे कार्य करतांना अनेकदा धर्मांधांकडून आमच्यावर प्राणघातक आक्रमणे झाली. त्यांचा प्रतिकार करायला आम्हाला जमायचे नाही. हे लक्षात आल्यावर आम्हीही प्रशिक्षण घेऊन सक्षम झालो. प्राण हातावर घेऊन प्रभावीपणे गोरक्षणाचे कार्य करत आहोत. आता अशी स्थिती आहे की, ईदच्या वेळी गोहत्या होऊ नये; म्हणून पोलीस-प्रशासन स्वतःच प्रयत्न करते. तेलंगणमध्ये विविध राज्यांतून जे प्रमुख महामार्ग येतात, त्या ठिकाणी तपासणीनाकी उभी करून तेथून वाहनांमधून अवैधरित्या गोवंशियांची वाहतूक करणार्‍यांवर कारवाई केली जाते.

३. १०० कोटी असूनही आज हिंदू असुरक्षित आहेत. त्यासाठीच हिंदु रा?ष्ट्राची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर उद्या कपाळावर टिळा लावणे, मंदिरात जाणे यांसारख्या कृती करणेही अवघड होईल.

टी. राजासिंह यांच्याप्रमाणे किती आमदार साधना करण्याचे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करण्याचे आवाहन करतात ?

हिंदु राष्ट्राचे कार्य करायला मिळणे’, हे महद्भाग्य ! – टी. राजासिंह

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय ठेवून हिंदु जनजागृती समिती कार्यरत आहे. ‘वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल,’ ही गुरुवाणी आहे. प्रत्यकाने हिंदु राष्ट्राचाच विचार ठेवून प्रयत्न करायला हवेत. धर्माचे कार्य करणार्‍यांनाच इतिहास लक्षात ठेवतो. धर्मरक्षणाचे कार्य करणारे महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांची नावे आजही लक्षात आहेत. आपण पुष्कळ भाग्यवान आहोत की, नियतीने आपल्या कपाळावर ‘तू धर्मकार्य करायचेे आहेस’, असे लिहिले आहे. हिंदु राष्ट्रासाठी कार्य करायला मिळणे, हे महद्भाग्य आहे. आपण या अधिवेशनाला प्रत्यक्ष भगवंताच्या माध्यमातून उपस्थित राहू शकलो आहोत. जो धर्माचे काम करतो, त्याचे रक्षण धर्म करतो. भक्तीमध्ये शक्ती आहे. साधना करा आणि ईश्‍वराला हाक मारा. तो तुमच्या रक्षणासाठी धावून येईल.

 

मंदिरांची लूट थांबण्यासाठी मंदिरांना शासनाच्या कह्यातून
मुक्त करणे अत्यावश्यक ! – अधिवक्ता किरण बेट्टादापूर, सर्वोच्च न्यायालय

अधिवक्ता किरण बेट्टादापूर, सर्वोच्च न्यायालय

भारत स्वतंत्र झाला; मात्र हिंदूंना धार्मिक स्वातंत्र्य मिळाले नाही. मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार हा गंभीर विषय आहे. देशातील साडेचार लक्ष मंदिरे सरकारच्या कह्यात असून त्यात किती प्रमाणात भ्रष्टाचार असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. कोळसा घोटाळा जर १ लक्ष ८० सहस्र कोटी रुपयांचा असेल, तर मंदिरांतील भ्रष्टाचार त्याही पेक्षा कितीतरी अधिक पटींनी असणार आहे. ‘मंदिरांतील घोटाळा’ हा सर्वांत मोठा घोटाळा आहे. ‘केवळ कर्नाटक राज्याचा विचार केल्यास कर्नाटक सरकार ३५ सहस्र मंदिरांपासून १० सहस्र कोटी रुपये गोळा करते; मात्र त्यातील बहुतांश खर्च हा चर्च, पूरनिधी अशाप्रकारच्या हिंदूंशी संबंध नसलेल्या गोष्टींसाठी खर्च करते. गीतेतील ‘यदा यदा ही धर्मस्य…’ या श्‍लोकातून प्रेरणा घेऊन स्वत:पासूनच धर्मकार्यासाठी प्रारंभ केला पाहिजे.’

अधिवक्ता किरण बेट्टादापूर यांनी मांडलेली अन्य उद्बोधक सूत्रे

१. केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिर आणि आदिकेशव पेरूमल मंदिर त्रावणकोर राजांकडून चालवले जायचे. वर्ष १९५९-६० मध्ये तमिळनाडू सरकारने मंदिरांचे व्यवस्थापन पहाण्यास आरंभ केला आणि मंदिराची संपत्ती मोजली. तेव्हा दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात धन अर्पण केल्याचे लक्षात आले. या मंदिरातील २ सहस्र कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्याकडून हडप केली गेली. एका मंदिरातील एवढी संपत्ती लुटली जात असेल, तर भारतभरातील साडेचार लाख मंदिरांतून आतापर्यंत किती संपत्ती लुटली गेली असेल, याची कल्पना येते.

२. तमिळनाडूमधील ५ लाख एकर भूमी मंदिरांची आहे. ती ‘लीज’वर देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या भूमीचे बाजारमूल्य १० सहस्र कोटी रुपये प्रतिवर्षी मिळाले असते, तेथे आता केवळ २०० ते ३०० कोटी रुपये मिळत आहेत.

३. वर्ष १९५९ मध्ये सी.पी. रामस्वामी अय्यर कमिशनने २ वर्षे अध्ययन करून, तसेच देशभरातील ३ सहस्र साधूसंतांशी चर्चा करून ‘मंदिरे आणि धार्मिक संस्था यांचे व्यवस्थापन कसे असावे’, याचा एक सविस्तर अहवाल सादर केला होता; मात्र या अहवालात करण्यात आलेल्या एकाही सूचनेवरून कारवाई करण्यात आली नाही.

४. युरोपमध्ये ‘सेक्युलर’ हा शब्द ‘धार्मिक गोष्टींमधून सरकारचा हस्तक्षेप वगळणे’ या दृष्टीने वापरला जातो; मात्र भारत सरकार अन्य धर्मियांच्या लाभासाठी हिंदु धर्मामध्ये हस्तक्षेप करत आहेत. ‘हिंदु मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये’, यासाठी आम्ही न्यायालयात याचिका केली आहे. मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होेत नाहीत, तोपर्यंत आपण स्वतंत्र नाहीत. भारत स्वतंत्र झाला असला, तरी सनातन धर्माच्या दृष्टीने आपण पूर्ण स्वतंत्र नाही. त्यासाठी संपूर्ण ‘स्वराज्या’ची आवश्यकता आहे.

५. भगवद्गीतेत ‘धर्माच्या संस्थापनेसाठी ईश्‍वर अवतार घेतो’, असे म्हटले आहे. ईश्‍वराने धर्माच्या संस्थापनेसाठी येण्यापेक्षा आपणच स्वत:तील देवत्व जागृत करून लढायला हवे.

 

मध्यप्रदेश येथे हिंदूसंघटनाचे कार्य करणारे हिंदु जनजागृती समितीचे योगेश व्हनमारे !

मध्यप्रदेशमध्ये हिंदूसंघटनाचे कार्य करणारे हिंदु जनजागृती समितीचे योगेश व्हनमारे यांचे १५ डिसेंबर २०१८ ला आकस्मिक निधन झाले. मध्यप्रदेशमध्ये कार्य करतांना त्यांनी तेथे हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या संघटनांशी जवळीक साधून त्यांच्यातही संघटितभाव निर्माण केला होता. योगेश व्हनमारे यांनी मध्यप्रदेशमध्ये केलेल्या कार्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी दिली. या वेळी योगेश व्हनमारे यांचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला मुलगा कु. देवदत्त व्हनमारे (वय १३ वर्षे) याची या अधिवेशनामध्ये ओळख करून देण्यात आली.

योगेश व्हनमारे यांच्याविषयी जितेंद्र ठाकूर यांनी काढलेले कौतुकोद्वार !

जितेंद्र ठाकूर

१. हिंदुत्वनिष्ठ संघटनांतील कार्यकर्त्यांमध्ये कौशल्यविकास करणे : सनातनच्या कार्याच्या प्रसार करण्यासाठी योगेश व्हनमारे जेव्हा मध्यप्रदेशात आले, तेव्हा ते पुष्कळ साधे होते. एवढे साधे रहाणीमान असणारी व्यक्ती हिंदूसंघटनाचे मोठे कार्य करेल, असे तेव्हा वाटले नव्हते. योगेश व्हनमारे यांनी मध्यप्रदेशातील संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्या गुणांची न्यूनता होती, ते गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला.

२. धर्मकार्यासाठी समर्पण करणारा मित्र : योगेशजी माझ्या कुुटुंबातील सदस्याप्रमाणे आणि मला मोठ्या भावाप्रमाणे होेते. त्यांच्या निधनानंतर २-३ दिवस माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते. आपले अनेक प्रकारचे मित्र असतात; पण धर्मकार्यासाठी समर्पण करणारा हा निराळा मित्र होता.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा : योगेश व्हनमारे यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आणि श्रद्धा होती. साधनेचे प्रयत्न करतांना त्यांना पाहिल्यावर ते संत असल्याप्रमाणे वाटायचे. एकदा एका सभेत बोलतांना व्यासपिठावरच त्यांच्या डोळ्यांतूून अश्रू वाहू लागले. त्याविषयी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘हे कार्य परात्पर गुरु डॉक्टरच करवून घेत आहेत.’’

४. धर्मकार्यासाठी कुटुंबाचे समर्पण : योगेश व्हनमारे यांंची पत्नीही धर्मकार्य करत होती. स्वत:सह कुटुंबालाही धर्मकार्यासाठी समर्पित करणे सामान्य व्यक्तीसाठी अशक्यच आहे.

 

 

काँग्रेसची स्थापना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी नाही, तर इंग्रजांची ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती राबवण्यासाठी ! – अनुराग पांडे, संयोजक, इंडिया विथ विज्डम, वाराणसी (उत्तरप्रदेश)

इतिहासाचा अभ्यास केला, तर असे लक्षात येते की, महंमद अली जीना आणि नेहरू यांची कार्यशैली एकच होती. ही कार्यशैली होती, भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याची ! हिंदूंचे अस्तित्व संपवण्यासाठी इंग्रजांनी काँग्रेसच्या माध्यमातून हिंदु संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ‘वर्ष १८८५ मध्ये ए.ओ. ह्युम यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात काँग्रेसची स्थापना केली’, असे सांगितले जाते. ते चुकीचे आहे. ‘फोडा आणि झोडा’ हे इंग्रजांचे धोरण राबवण्यासाठी त्यांनी काँग्रेसची स्थापना केली आणि जातीपातीचे राजकारण करून वर्ष १९४७ मध्ये भारताचे विभाजन केले. काँग्रेसच्या या धोरणांमुळेच राष्ट्रभक्त लोक काँग्रेसपासून दूर गेले.

 

हिंदुत्वाचे नाव घेणारे राजकीय पक्ष धर्माचे प्रत्यक्ष कार्य करतांना मात्र
डरपोकपणा दाखवतात ! – जितेंद्र सिंह ठाकूर, अखिल भारत हिंदु महासभा, मध्यप्रदेश

हिंदुत्वाचे नाव घेणारे राजकीय पक्ष धर्माचे प्रत्यक्ष कार्य करतांना मात्र डरपोकपणा दाखवतात, हा अनुभव आहे. संध्या लंडनमध्ये असलेली धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेतील मूळ मूर्ती परत आणून ठेवण्याचे भाजपने आश्‍वासन दिले होते; पण अद्याप ते पूर्ण झाले नाही. भाजपच्या कार्यकाळात भोजशाळेत सरस्वतीपूजन करणार्‍या हिंदूंवर लाठीमार करण्यात आला; मात्र नमाज पढायला मोकळीक दिली गेली. त्यांच्याच काळात लव्ह जिहाद, गोहत्या यांचे प्रमाण वाढले; पण आम्ही या अधिवेशनाच्या निमित्ताने असा विश्‍वास देतो की, मध्यप्रदेशमध्ये कोणतेही धर्मविरोधी कार्य झाले, तरी त्याला विरोध करू.

मोदी यांनी नथुराम गोडसे यांच्याविषयी अध्ययन केले नाही का ?

वर्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी साध्वी प्रज्ञासिंह यांनी ‘नथुराम गोडसे हे देशभक्त होते’, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावर भाजपने साध्वी प्रज्ञासिंह यांनी क्षमा मागायला लावली होती. पंतप्रधान मोदी यांनी ‘मी साध्वी प्रज्ञासिंह यांना कधीही मनापासून क्षमा करू शकणार नाही’, असे वक्तव्य केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर श्री. जितेंद्र सिंह ठाकूर म्हणाले, ‘‘नथुराम गोडसे हे कोणी हत्यारे नाही, तर महान देशभक्त होते. त्यांनी कोणत्या परिस्थितीत गांधीवध केला, हे जनता आता जाणून घेत आहे आणि जागृत होत आहे; मात्र मोदी, भाजप आणि मोठी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी त्याचे अध्ययन केले नाही, हे दिसून येते.’’

सनातन संस्थाच हिंदु राष्ट्र आणू शकेल, याचा विश्‍वास वाटतो !

सनातन संस्था राष्ट्रभक्तांचा योग्य इतिहास आणि माहिती सादर करत आहे. सनातन संस्थाच हिंदु राष्ट्र आणू शकेल, याचा विश्‍वास वाटतो. या कार्यात जे काही सहकार्य सनातन संस्थेला करावे लागेल, ते सर्व आम्ही करू.

 

स्वसंरक्षणाच्या पद्धती नष्ट होत चालल्या आहेत ! – श्री. प्रकाश सिंह, प्रतापगढ (उत्तरप्रदेश)

आगामी युद्धकाळात स्वतःचे रक्षण करता येण्यासाठी स्वसंरक्षणाच्या पद्धती ठाऊक असणे आवश्यक आहे; पण लाठी चालवणे, शस्त्रास्त्र चालवणे हे प्रकार गावागावांमधून लुप्त होत चालले आहेत. व्यक्तींवर चांगले संस्कार असतील, तर या पद्धती आणि शस्त्र यांचा दुरुपयोग होऊ शकत नाही. स्वसंरक्षणासाठी सरकारसंमत शस्त्र बाळगले, तर लोकांकडून आक्षेप घेतले जातात; मात्र व्यक्तीला कमजोर करणारे भ्रमणभाष बाळगले, तर कोणी बोलत नाही. हिंदुत्वाची भावना अल्प झाल्याने, आज धर्मावर संकट आले आहे.

 

पाकिस्तानातून भारतात येणार्‍या शरणार्थी हिंदूंसाठी
हिंदु महासभा कटीबद्ध ! – श्री. वीरेश त्यागी, कार्यालय मंत्री, हिंदु महासभा

हिंदु महासभेचे कार्यालयमंत्री श्री. वीरेश त्यागी यांनी महासभेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर केल्या जाणार्‍या कार्याविषयी अवगत केले. ते म्हणाले, ‘‘उत्तर भारतात होणार्‍या कावड यात्रेत येणार्‍या हिंदूंना लागणार्‍या सर्व सेवा पुरवण्याचे काम हिंदु महासभा करत आहेत. येणार्‍या काळात ‘ज्या हिंदूंना अमरनाथ यात्रेला जाण्याची इच्छा आहे’, त्यांना नोंदणी करणे, आदी लागणारे सर्व सहकार्य हिंदु महासभा करेल. पाकिस्तानातून भारतात येणार्‍या शरणार्थी हिंदूंना जीवनावश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी हिंदु महासभा पुढाकार घेते. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात येणार्‍या हिंदूंसाठी व्हिसाचे शुल्क ५०० रुपयांवरून एकदम अडीच सहस्र रुपये करण्यात आले. यावर आंदोलन केल्यावर ते पूर्ववत करण्यात आले.’’

 

श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक आणि नेपाळचे माजी राजगुरु
डॉ. माधव भट्टराय यांच्या ‘व्हिडिओ’च्या माध्यमातून अधिवेशनाला शुभेच्छा !

या वेळी श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांना गोव्यात प्रवेश करण्यास गोवा सरकारने अन्याय्य बंदी घातल्याने आणि नेपाळचे माजी राजगुरु डॉ. माधव भट्टराय हे अधिवेशनकाळात विदेशात असल्याने अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांनी अधिवेशनासाठी दिलेला संदेश ‘व्हिडिओ’च्या माध्यमातून दाखवण्यात आला.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी युवकांना घडवण्याचा ऐतिहासिक संकल्प करा !
– प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

गेल्या ७ वर्षांपासून चालू असलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनात संख्यात्मक, गुणात्मक आणि वैचारिक विकास होत असल्याने हिंदूंंमध्ये संघटितभाव, विश्‍वास आणि शक्ती निर्माण होत आहे. परात्पर गुुरु डॉ. आठवले यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे. ‘आपापल्या क्षेत्रात जाऊन त्याप्रमाणे आचरण करणे’, हे आपले कर्तव्य आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे. हिंदु राष्ट्रासाठीची सिद्धता करायची आहे. हिंदु राष्ट्र निश्‍चितच येईल; पण त्यासाठी परिश्रम करणे, हे आपले कर्तव्य आहे. या कार्यासाठी युवकांना सिद्ध करण्याचा ऐतिहासिक संकल्प या अधिवेशनात करावा. या कार्यात ईश्‍वर आपल्या समवेत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांना मोठा विजय मिळाला. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी प्रज्ञासिंह यांचा विजय होणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचा विजय हा संत, हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांचा विजय आहे. ‘जिहादी आतंकवाद’ हा एकमेव आतंकवाद जगात आहे. याविषयी समाजात जागृती करणे आवश्यक आहे. या आव्हानाला आपल्याला सामोरे जायचे आहे.

‘पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतात मुसलमानांची संख्या वाढून वर्ष २०५० मध्ये तो ‘इस्लामी देश’ म्हणून घोषित होईल’, अशी चेतावणी दिली आहे. या चेतावणीकडे हिंदूंनी गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. मुसलमानांच्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आणि त्यांच्यातील बहुपत्नीत्व कायदा रहित करण्याची मागणी मोदी सरकारकडे करायला हवी.’

गोवा शासनाने बंदी घातल्याने मी अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनास उपस्थित राहू शकलो नाही. गोवा राज्यावर भाजपचे राज्य असतांनाही एका हिंदु संघटनेवर एका रात्रीत प्रवेशबंदी घातली जाणे, हे दुर्दैवी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा हा अवमान आहे.

भारत आणि नेपाळ येथे निश्‍चितच हिंदु राष्ट्र स्थापन होईल ! – डॉ. माधव भट्टराय, माजी राजगुरु, नेपाळ

‘हे अधिवेशन यशस्वी होवो’, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो. अधिवेशनाला उपस्थित नसलो, तरी मी मनाने गोवा येथील सनातन आश्रमातच आहे. ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त जे ठराव संमत होतील, त्याला माझा पाठिंबा आहे आणि ते कृतीत आणण्यासाठी कार्यरत राहीन. सनातन हिंदु धर्म हा प्राचीन आणि वैज्ञानिक धर्म आहे. या धर्माचे मूल्य जगभरात पोचवण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत.

नेपाळमधील ९० ते ९५ टक्के लोक हिंदु आहेत; मात्र काही निधर्मीवाद्यांनी नेपाळला धर्मनिरपेक्ष घोषित केले आहे. ‘नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत आणि ते करूनच दाखवू’, हा आमचा विश्‍वास आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि धर्मप्रेमी यांच्यामुळे हे निश्‍चितच होईल. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात मी समवेत आहे आणि सदैव कार्यरत राहीन.’’

 

हिंदु राष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र-संपर्क अभियान’ !
– मनोज खाडये, पश्‍चिम महाराष्ट्र आणि गुजरात समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

भारतभरात अनेक हिंदु राष्ट्रप्रेमी व्यक्ती अन् संघटना कार्यरत आहेत. अशांना शोधून त्यांच्याशी संपर्क करण्याच्या दृष्टीने ‘हिंदु जनजागृती समिती’ने गेल्या वर्षी जानेवारीपासून आजपर्यंत ‘हिंदु राष्ट्र-संपर्क अभियान’ राबवले. संघटनेच्या पलीकडे जाऊन अंतिम ध्येय, म्हणजे हिंदु राष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे अभियान पुढील वर्षभर आणि भारतभर राबवण्याचे नियोजनात आहे.

 

आगामी काळात उद्योगपतींचे संघटन अधिक प्रभावी बनवायचे आहे !
– पू. प्रदीप खेमका, मार्गदर्शक, उद्योगपती परिषद

गोवा येथील सप्तम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ‘उद्योगपती परिषदे’ची परिषदेची स्थापना झाली. ‘उद्योगपती परिषदेकडून समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्याग करण्याची सिद्धता असलेले देशभरातील व्यावसायिक, व्यापारी आणि उद्योगपती यांचे कृतीशील संघटन करण्यात येत आहे. आगामी काळात उद्योगपती अभियान अधिक शक्तीशाली बनवायचे आहे. याकरता समाजात उद्योगपती संपर्क अभियान राबवून हे संघटन अधिक शक्तीशाली करायचे आहे. कालमहिम्यानुसार वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. पुढील ४ वर्षांच्या या संधीकाळात आपण हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात तन-मन-धनाने सहभागी झालो आणि धर्मसंस्थापनेसाठी कार्य केले, तर आपली साधना होईल.

 

धर्मकार्य करतांना प्रशंसकांचे अडथळे आल्यास साधनेचे चिंतन वाढवा !
– पू. महंत श्रीरामज्ञानीदासजी महाराज, अध्यक्ष, महात्यागी सेवा संस्थान, गोंदिया

अष्टम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या समारोपाच्या शुभवेळी तेवढेच सतर्क रहाणे आवश्यक आहे. धर्माची स्थापना करतांना आसुरी शक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अडथळे आणतात. सर्वांनी किमान नामजप केल्यास वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र पहाण्याची संधी आपल्याला मिळेल. धर्मकार्य करतांना प्रशंसकांचे अडथळे आल्यावर त्यात अडकून पडल्यास हिंदु राष्ट्राच्या सूत्रापासून आपण दूर जाऊ. असे अडथळे आल्यावर भजन आणि चिंतन वाढवा. यामुळे आपल्याला बळ मिळेल.

एकत्र येऊन हिंदु राष्ट्र आणण्याची केवळ चर्चा न करता संघटन करणे आवश्यक आहे. आपण गोव्याच्या पवित्र तपोभूमीत असल्याने आपल्या मनात पवित्र विचार येत आहेत. येथून आपापल्या क्षेत्रात गेल्यावर त्याच ध्येयाने कार्यरत रहायचे आहे. हनुमानसारखे संघटक बना. लक्ष्य समोर ठेवून त्या दिशेने मार्गक्रमण करत रहा. सद्गुरु आपल्या समवेत आहेत आणि हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नियोजनही आहे. आपल्याला केवळ कृतीशील रहायचे आहे.

हिंदु राष्ट्र अधिवेशनाप्रमाणे एकोप्याचे वातावरण भारतभरात निर्माण व्हावे !

मी कुंभमेळ्यात १ मास २० दिवस होतो. तेथे गेल्यावर जसे अन्य कशाची जाणीव नसते, तसे अधिवेशनात आल्यावर ‘कोणता दिवस आहे’, याची जाणीव नव्हती. अधिवेशनात निर्माण झालेले वातावरण पूर्ण भारतभरात निर्माण व्हावे. ज्यांनी या अधिवेशनाचे आयोजन केले, त्या संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. या कार्यात मी तन-मन-धनाने तुमच्या समवेत आहे. केवळ पुस्तकात वाचलेला एकमेकांप्रतीचा प्रेमभाव मी येथे प्रत्यक्षात अनुभवला.

 

लोकसंख्या नियंत्रण कायदा केला नाही, तर वर्ष २०२९ नंतर हिंदु पंतप्रधान होईल कि नाही,
हे सांगता येत नाही ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, पुणे

या देशात कायदे केवळ हिंदूंसाठी आहेत. भारतात अल्पसंख्यांकांच्या लोकसंख्या वाढीचे प्रमाण हिंदूंहून अधिक आहे. सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू केला नाही, तर भविष्यात हिंदूंची लोकसंख्या घटेल. या वेळी बहुमताने केंद्र सरकार सत्तेत आले; परंतु वर्ष २०२९ नंतर हिंदु पंतप्रधान होईल कि नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना करावीच लागेल, असे प्रतिपादन हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांनी केले. ते अष्टम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे समारोपीय भाषण करतांना बोलत होते.

ते पुढे म्हणाले,

१. ‘‘मागील ५ वर्षांत काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू स्थायिक होऊ शकले नाहीत.

२. येणार्‍या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रयत्न अन् परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प यांमुळे हिंदु राष्ट्र येणारच आहे.

३. नववधूला जसे तिच्या माहेरी जाण्याची ओढ असते, तशी आम्हालाही गोव्याच्या रामनाथी आश्रमात येण्याची ओढ असते.

४. हिंदु राष्ट्र अधिवेशन हाही एक लहान कुंभमेळाच आहे.

५. सर्वधर्मसमभाव हे ढोंग आहे. येणार्‍या काळात हिंदु राष्ट्राची स्थापना करायची, असा संकल्प घेऊनच येथून जायचे आहे.’’
भाजपचे तेलंगण येथील आमदार टी. राजासिंह यांच्याविषयी ह.भ.प. श्याम महाराज राठोड म्हणाले, ‘‘आमदार श्री. टी. राजासिंह हे स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शृृंखलेतील आहेत.’’

 

हिंदु राष्ट्रासाठी लढणार्‍या सक्षम हिंदूंचे संघटन आवश्यक !
– भाजप आमदार, टी. राजासिंह, तेलंगण

भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी १२ लाख धर्मांधांना प्रशिक्षण देऊन त्यांची एक सेना सिद्ध करण्याचे प्रयत्न चालू असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांच्याकडून हिंदूंवर प्रहार झाला, तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी हिंदूंनीही सक्षम व्हावे. त्यासाठी धर्मासाठी त्याग करण्याची भावना निर्माण व्हायला हवी. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आता वेळ अल्प आहे. साधनेचे बळ वाढवायला हवे; कारण भक्तीमध्ये शक्ती आहे.

श्री. टी. राजासिंह यांचा धर्माभिमान दर्शवणारी अन्य प्रेरणादायी वक्तव्ये

१. ‘धर्मवीर संभाजी महाराजांप्रमाणे धर्मरक्षणासाठी मला मरण यावे’, अशी माझी इच्छा आहे.
२. त्यागाची भावना हिंदूंमध्ये निर्माण व्हायला हवी.
३. खर्‍या साधूसंतांचे दर्शन आणि मार्गदर्शन मिळणे दुर्मिळ आहे. या अधिवेशनामध्ये साधूसंतांकडून आपल्याला अमृत मिळत आहे. हे अमृत आपापल्या राज्यांतही वाटा. (अमृत म्हणजे ‘धर्मज्ञान’, ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ असे म्हणायचे आहे.)