कोलकाता (बंगाल) येथील शास्त्र धर्म प्रचार सभेच्या ‘ट्रुथ’ साप्ताहिकाचे संपादक डॉ. शिवनारायण सेन (वय ७३ वर्षे) संतपदी विराजमान !

एखाद्या नियतकालिकाचे संपादक संत झाल्याची दुर्मिळ घटना !

डॉ. शिवनारायण सेन

विद्याधिराज सभागृह – कोलकाता (बंगाल) येथील शास्त्र धर्म प्रचार सभेच्या ‘ट्रुथ’ पाक्षिकाचे संपादक तथा हिंदु धर्माचे गाढे अभ्यासक डॉ. शिवनारायण सेन (वय ७३ वर्षे) यांनी ७१ टक्के पातळी गाठली असून ते संतपदी विराजमान झाले असल्याची आनंदवार्ता १ जून या दिवशी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात देण्यात आली.

 

धर्मशास्त्रांचा अभ्यास आणि विलक्षण नम्रता असलेले डॉ. शिवनारायण सेन !

‘शास्त्र धर्म प्रचारसभे’चे महासचिव डॉ. शिवनारायण सेन हे शासनात मोठ्या पदावर असतांना हिंदु धर्मातील आचारधर्माचे पालन सर्वत्र होईल, याची काळजी घेत होते. कलियुगात सनातन धर्माच्या परंपरेनुसार आचारधर्म पाळणे किती कठीण आहे, याची थोडी कल्पना आपल्या सर्वांना आहे. धर्मशास्त्रांचा अभ्यास असूनही त्यांच्यामध्ये विलक्षण नम्रता आहे. त्यांच्या मुखमंडलावर सतत भावावस्था असते. ते शब्दांच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी जागृती करता करता आता ते शब्दांच्या पलीकडे, म्हणजे अध्यात्माच्या उच्च अवस्थेला गेले आहेत. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांकडे पाहून आनंदाची अनुभूती येते. ते भाषण करतांना, विशेषतः नास्तिकांच्या विरुद्ध बोलतांना त्यांच्यातील क्षात्रतेजाचे दर्शन घडते. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज असलेले असे डॉ. शिवनारायण सेन यांच्यामध्ये गुरुभक्ती आणि हरिभक्ती यांचाही अपूर्व संगम आहे. ते खर्‍या अर्थाने भगवद्भक्त आहेत. अधिवेशनात त्यांच्या भाषणामध्ये सर्वांना चैतन्याची अनुभूती आली, हे त्यांचे संतत्व सिद्ध करते. डॉ. शिवनारायण सेन यांचा आध्यात्मिक स्तर ७१ टक्के झाला असून ते संतपदी विराजमान झाले आहेत, हे सांगतांना मला विशेष आनंद होत आहे. ‘त्यांची पुढील आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होवो’, अशी मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

पू. (डॉ.) शिवनारायण सेन हे धर्मशिक्षण आणि धर्मजागृती यांसाठी अविरत
कार्यरत आहेत ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘पूू. (डॉ.) शिवनारायण सेन हे धर्मशिक्षण आणि धर्मजागृती यांसाठी अविरत कार्यरत आहेत. त्यांनी सनातन धर्मावर होणार्‍या आरोपांचे खंडण करणारे अनेक ग्रंथ लिहिले आहेत. हे ग्रंथ मार्गदर्शक आहेत. या ग्रंथांच्या माध्यमातून धर्मविरोधी विचारांचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य मिळते. अशी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. पू. (डॉ.) सेन हे विद्वान असूनही त्यांच्यामधील प्रेमभाव, आदर आणि नम्रता या गुणांमुळे ते सर्वांमध्ये मिसळतात. भक्तीच्या जोडीला ज्ञानयोगाच्या मार्गाने साधना करणे कठीण असते; पण या दोन्ही माध्यमांतून ते वर्तमानात आवश्यक असलेले कार्य करत आहेत. ‘पूू. (डॉ.) शिवनारायण सेन हे स्वयंप्रकाशित आहेत. त्यांना आता मन राहिलेले नाही, म्हणजे त्यांचा मनोलय झाला आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे.’’

 

पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांचे ज्ञानशक्ती प्रगट करण्याचे कार्य
अतुलनीय ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

पू. (डॉ.) शिवनारायण सेन (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना पू. नीलेश सिंगबाळ

पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘‘एकेकाळी ज्ञानशक्तीच्या जोरावर भारत विश्‍वगुरुपदी विराजमान होता. त्यानंतरच्या काळात ही ज्ञानशक्ती धर्मद्रोह्यांनी नष्ट केली. हिंदूंना धर्मशास्त्रापासून वंचित केले. एखादी गोष्ट नष्ट करणे सोपे असते; पण ती पुन्हा निर्माण करणे किंवा तिची पुनर्स्थापना करणे फार कठीण असते. त्यासाठी कठोर साधना आणि तत्त्वनिष्ठा असावी लागते. ही ज्ञानशक्ती प्रगट करण्याचे अतुलनीय कार्य ज्ञानी पुरुष करत असतात. पू. (डॉ.) सेन यांचे कार्य असेच आहे. बंगालसारख्या प्रतिकूल वातावरणात राहून असे कार्य करणे, ही मोठी साधना आहे. आम्ही जेव्हा कोलकाता येथे ‘शास्त्र धर्म प्रचार सभे’च्या कार्यालयात जातो, तेव्हा पू. (डॉ.) सेन नेहमी ग्रंथलिखाणात व्यस्त असतात, तरीही ते आम्हाला वेळ देतात. कतरास (झारखंड) येथे होणार्‍या सनातनच्या गुरुपौर्णिमा सोहळ्यालाही ते आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन करतात.’’

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी डॉ. सेन या रत्नाला ओळखले ! – डॉ. कौशिक चंद्र
मल्लिक, उप-संपादक, ‘ट्रुथ’ साप्ताहिक, शास्त्र धर्म प्रचार सभा (पू. सेन यांचे भाचे)

‘एक संतच दुसर्‍या संतांविषयी काही सांगू शकतात. रत्नाचे मूल्य रत्नपारख्याला समजते. तसे पू. शिवनारायण सेन कोण आहेत, ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांना समजले. पू. शिवनारायण सेन यांच्याविषयी मी काही सांगण्याची माझी पात्रता नाही; पण आज्ञा म्हणून सांगत आहे. पू. शिवनारायण सेन हे मामा लागतात. माझ्या जन्मापासून मी त्यांना पहात आहे. ते जे बोलतात, तेच करतात. त्याचे जीवन आदर्शवत् आहे. त्यांच्यात षड्विधा शरणागती पाहिली आहे. त्यांचा सन्मान झाल्याविषयी मला आनंद होत आहे. देवाची विशेष कृपा साधूंच्या माध्यमातून आपल्यावर होत असते. परात्पर गुरु डॉ. आठवले हे ईश्‍वराप्रमाणे अद्भुत कार्य करत आहे. महापुरुषाच्या चरणांखालील रजकणाच्या अभिषेकाने देवाजवळ जाण्याची मती होते. सर्वजण यशस्वी होतात; परंतु ज्यांना ईश्‍वर आपला म्हणून स्वीकारतो, तो कधी खाली येत नाही.’ मनोगत व्यक्त करतांना डॉ. कौशिक यांचा भाव जागृत झाला होता.

 

पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘‘मी या सन्मानासाठी पात्र नाही. ईश्‍वर जेव्हा त्याचा झेंडा कोणाच्या हातामध्ये देतो, तेव्हा तो सदर झेंडा फडकावण्याची शक्तीही देतो. ‘ज्यांनी मला संत बनवले, त्यांनीच माझ्याकडून पुढील कार्यही करून घ्यावे’, अशी मी प्रार्थना करतो. ‘विज्ञानाच्या पुढेही ईश्‍वराची शक्ती आहे’, हे धर्माचे कार्य करणार्‍यांनी जाणणे आवश्यक आहे. जीवनात सत्य सर्वांत मोठी शक्ती आहे. सत्य हेच शास्त्र आहे आणि शास्त्र हाच धर्म आहे. सत्य हेच शिव आहे आणि सत्याचा आश्रय घेतला, तर भगवंताची कृपा निश्‍चितपणे होते. आपल्याला भगवंताचे दास व्हायचे आहे. त्याची भक्ती करायची आहे. आज हिंदु धर्मावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यामुळे हिंदूसंघटनासाठी आपण कटीबद्ध झाले पाहिजे. ‘शास्त्र धर्म प्रचार सभे’च्या कार्याला थोर संतांचे आशीर्वाद लाभले आहेत.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात