अग्निहोत्र : अणूयुद्धामुळे होणार्‍या प्रदूषणापासूनच्या रक्षणाचा एक मार्ग !

अग्निहोत्र
अग्निहोत्र

अग्निहोत्र म्हणजे कामधेनूच !

१२ मार्च हा विश्‍व अग्निहोत्र दिन म्हणून साजरा केला जातो. मानवजातीला मिळालेल्या अमूल्य देणगीपैकी एक म्हणजे अग्निहोत्र ! हा नित्य वैदिक यज्ञ समजला जातो. १० मिनिटांपेक्षाही अल्प कालावधीचे हे अग्निहोत्र मनुष्याला आयुष्यभरासाठीचा लाभ करून देते. या निमित्ताने नियमितपणे अग्निहोत्र करणार्‍या सौ. मीना घुले यांनी त्याविषयी दिलेली माहिती….

अग्निहोत्र म्हणजे काय ?

सूर्योदयाच्या, तसेच सूर्यास्ताच्या वेळी केली जाणारी सूर्याची उपासना म्हणजे अग्निहोत्र ! अग्निहोत्र म्हणजे कामधेनूच आहे. अग्निहोत्र करण्यासाठी वेळ सोडली, तर अन्य कशाचेच बंधन नाही. अग्निहोत्रासाठी पिरॅमिडच्या आकाराच्या पात्रात गायीच्या शेणाच्या गोवर्‍या, २ चिमूट अखंड तांदूळ आणि देशी गायीचे तूप यांच्या साहाय्याने प्रज्वलित केल्या जातात. त्यानंतर २ मंत्र म्हणून आहुती दिली जाते.

(आज मनुष्याचे जीवन अतिशय धावपळीचे आणि तणावग्रस्त झाले आहे. अशा परिस्थितीत मानवजातीच्या कल्याणासाठी ऋषिमुनींनीच अग्निहोत्राचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. आपण श्रद्धापूर्वक तो अवलंबल्यास निश्‍चितच लाभ होईल ! – संपादक)

१. व्याख्या

‘अग्निहोत्र म्हणजेच तेजाच्या आधारावर ईश्‍वराचे प्रत्यक्षरूपी सगुण आणि तत्त्वरूपी निर्गुण स्वरूप चैतन्य आकृष्ट करण्यासाठी हाती घेतलेले व्रतरूपी अनुष्ठान.

२. अग्निचे महत्त्व आणि त्याच्या साक्षीने केल्या जाणार्‍या साधनेतील परिणामांची उपयुक्‍तता

अ. अग्नी सर्व देवतांचे साकारभान आहे.

आ. अग्नीच्या साक्षीने केलेले कोणतेही कर्म जिवाला विघ्नाविना पूर्ण चैतन्याची फलप्राप्ती करून देते.

३. अग्निदेवतेचे महत्त्व आणि तिचे कार्य

अग्नी हा स्वतःच तेजोभूत असून तो जिवाच्या स्थूल आशा-आकांक्षांना स्वतःत सामावून घेणारा आहे. अग्निहोत्र-साधनेने जिवाची स्थूलदेहापासून सूक्ष्मदेहापर्यंत शुद्धी होते आणि कालांतराने त्याला अग्नीच्या साहाय्याने देवतांच्या साकारभानात लुप्त होऊन देहबुद्धीच्या पलीकडे, म्हणजेच विश्‍वाला व्यापून उरलेल्या परमात्म्याच्या अंशात विलीन होता येते.

४. अग्नी प्रज्वलित करण्यासाठी वापरण्यात येणारे इंधन, म्हणजेच
तूप, शेणाच्या गोवर्‍या, तसेच आहुती म्हणून त्यात घालण्यात येणारे तांदूळ यांचे महत्त्व

अ. तूप आणि शेणाच्या गोवर्‍या अग्नीतून उत्पन्न होणार्‍या सात्त्विक ऊर्जेला जडत्व प्राप्त करून देऊन त्यांना भूमीमंडलाकडे आकृष्ट करून घेऊन त्यांचे भूमीमंडलात आच्छादनात्मक गालिचासारखे पांघरूण अंथरण्यात अग्रेसर आहेत.

आ. तांदूळरूपी आहुतीसदृश सात्त्विक घटक हा अग्नीतून उत्पन्न होणार्‍या सात्त्विक ऊर्जेतील तेजाला धुराच्या रूपात मध्यमंडलात घनीभूत करून देणारा आहे.

खालील चित्र मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

५. अग्निहोत्र हे कर्म उपासना
म्हणून केल्याने त्या त्या देवतांच्या स्तरावर होणारे लाभ

अ. अग्निहोत्र करणे हे आकाशमंडलातील सूक्ष्म देवतांच्या तत्त्वांना जागृत करून त्यांच्या लहरी भूमीमंडलावर खेचण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.

आ. अग्निहोत्ररूपी कर्मात प्रजापतीरूपी उत्पत्तीशक्‍तीचे जागृतीकरण होत असल्याने भूमीमंडलाशी संबंधित सात्त्विक इच्छाजन्य जननधारणाक्षम बीजे योग्य काळात प्रसव पावून त्यातून सत्त्वगुणात्मक घटकाची निर्मिती करण्यास हातभार लावतात. म्हणजेच यातून प्रजापतीच्या आशीर्वादात्मक लहरींचे वायूमंडलात प्रसारण झाल्याने त्या त्या परिसरात प्रसवणारी प्रत्येक गोष्ट सात्त्विक बीजधारणेशी संबंधित घटकाची निर्मिती करते.

इ. या तेजोमंडलाच्या साहाय्याने अनेक देवता भूमीमंडलाशी संलग्न राहून अनेक भक्‍तजनांसाठी कार्य करत रहातात. या देवतांच्या निकट सान्निध्याने त्या त्या भूमीमंडलातील जिवांचा, तसेच इतर प्राणिमात्रांचा उद्धार होण्यास साहाय्यक होते.

ई. अग्निहोत्रामुळे वायूमंडलात सिद्ध (तयार) होणारे दिव्य तेजोमंडल हे पारदर्शक काचेच्या तेजोगोलासारखे असून अणूबाँबमधील अतिशय सूक्ष्म अशा संहारक किरणांनाही हे वायूमंडल भेदणे अशक्य होते. यामुळे संहारक घटकांपासूनही जिवाचे आणि त्या त्या वायूमंडलाचे रक्षण होऊ शकते.

उ. म्हणून कलियुगातील आसुरी शक्‍तींचा प्रकोप वाढलेल्या आपत्कालात आतंकवादी यंत्रणेपासून संपूर्ण देशाला, परिणामी समाजाला, परिणामी स्वतःला वाचवायचे असेल, तर अग्नीच्या साहाय्याने ब्रह्मांडमंडलातील त्या त्या देवतांच्या लहरी भूमीमंडलाकडे आकृष्ट करणार्‍या अग्निहोत्र-साधनेचा पुरस्कार केला पाहिजे.

– सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

 

अग्निहोत्राचे लाभ

जगातील अग्निहोत्राचे आचरण करणारे भिन्न वंश, भिन्न भाषा, भिन्न धर्म आणि आध्यात्मिक असे गट आहेत.

१. चैतन्यप्रदायी आणि औषधी वातावरण निर्माण होते.

२. अधिक सकस आणि स्वादिष्ट अन्नधान्य पिकणे : अग्निहोत्रामुळे वनस्पतींना वातावरणातून पोषणद्रव्ये मिळतात आणि त्या सुखावतात. अग्निहोत्राच्या भस्माचाही शेती आणि वनस्पती यांच्या वाढीवर उत्तम परिणाम होतो. परिणामतः अधिक सकस आणि स्वादिष्ट अन्नधान्य, फळे, फुले अन् भाजीपाला पिकतो.

३. प्राणीजीवनाचे पोषण : ज्याप्रमाणे अग्निहोत्र वनस्पतीचे पोषण करते, तद्वत् मनुष्य आणि समस्त प्राणीजीवन यांचेही पोषण करते.

४. अग्निहोत्राच्या वातावरणाचा बालकांवर सुपरिणाम होणे
अ. मुलांच्या मनावर उत्तम परिणाम होऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होतात.
आ. चिडचिडी, हट्टी मुले शांत आणि समंजस होतात.
इ. मुलांना अभ्यासात एकाग्रता सहज साधता येते.
ई. मतिमंद मुले त्यांच्यावर चालू असलेल्या उपचारांना अधिक उत्तम प्रतिसाद देतात.

५. अग्निहोत्राने दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण होऊन मनोविकार बरे होणे आणि मानसिक बल प्राप्त होणे : नियमाने अग्निहोत्र करणार्‍या विविध स्तरांतील स्त्री-पुरुष, बाल-वृद्ध यांमध्ये एकमुखाने अधिक समाधान, जीवनाकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्टीकोन, मनःशांती, आत्मविश्‍वास आणि अधिक कार्यप्रवणता हे गुण निर्माण होऊन वाढीस लागल्याचे अनुभवास आले. दारू आणि इतर घातक मादक पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्ती अग्निहोत्राच्या वातावरणात त्या व्यसनांपासून मुक्त होऊ शकतात; कारण त्यांच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण होते, असे आढळून आले आहे.

६. मज्जासंस्थेवर परिणाम : ज्वलनातून निघणार्‍या धुराचा मेंदू आणि मज्जासंस्था यांवर प्रभावी परिणाम होतो.

७. रोगजंतूंचे निरोधन : अग्निहोत्राच्या औषधीयुक्त वातावरणामुळे रोगकारक जंतूंच्या वाढीस प्रतिबंध होतो, असे काही संशोधकांना आढळून आले.

८. संरक्षककवच निर्माण होणे : एक प्रकारचे संरक्षककवच सभोवती असल्याची जाणीव होते.

९. अग्निहोत्रामुळे प्राणशक्ती शुद्ध होऊन त्या वातावरणातील व्यक्तींचे मन त्वरित प्रसन्न आणि आनंदी होणे अन् त्या वातावरणात ध्यानधारणा सहज साध्य होणे : प्राण आणि आपले मन एकमेकांशी घट्टपणे निगडित असून जणूकाही ती एकाच नाण्याची दोन अंगे आहेत, असेही म्हणता येईल. अग्निहोत्रामुळे प्राणशक्ती शुद्ध झाल्याचा इष्ट परिणाम त्या वातावरणात असलेल्या व्यक्तीच्या मनावर त्वरित होऊन तिला तणाव विनासायास नष्ट होऊन मन प्रसन्न आणि आनंदी झाल्याचा अनुभव येतो. त्या वातावरणात ध्यान, उपासना, मनन, चिंतन, अभ्यास करणे सहज साध्य होते.

– डॉ. श्रीकांत श्रीगजाननमहाराज राजीमवाले, शिवपुरी, अक्कलकोट.

 

अग्निहोत्र करण्याचे महत्त्व

अग्निहोत्र करतांना
अग्निहोत्र करतांना

खालील चित्र मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

 

१. `अग्निहोत्रातून निर्माण होणारा अग्नी हा रज-तम कणांना विघटित करणारा आणि वायूमंडलात दीर्घकाळ रेंगाळणारा असल्याने सातत्याने ही प्रक्रिया राबवली असता, तो मानवाच्या भोवती १० फूट अंतरावर संरक्षककवच बनवतो. हे कवच तेजविषयक गोष्टींच्या स्पर्शाला अत्यंत संवेदनशील असते. सूक्ष्मातून हे कवच तांबूस रंगाचे दिसते.

२. ज्या वेळी चांगल्या गोष्टीशी संबंधित तेज या कवचाच्या सान्निध्यात येते, त्या वेळी कवचातील तांबूस रंगाच्या तेजातील कण या तेजाला स्वतःत सामावून घेऊन आपल्या कवचाला बळकटी आणतात.

३. रज-तमात्मक तेजकण हे कर्कश स्वरूपात आघात निर्माण करणारे असल्याने ते जवळ येत असल्याचे या कवचाला आधीच कळते आणि ते आपल्यातून प्रतिक्षिप्त क्रियेच्या रूपात अनेक तेजलहरी वेगाने ऊत्सर्जित करून त्या कर्कश नादालाच नष्ट करते आणि त्यातील नाद उत्पन्न करणारे तेजकणच नष्ट करते. यामुळे त्या लहरींतील तेज हे आघात करण्यात सामर्थ्यहीन बनते. म्हणजेच बाँबमधील आघातात्मक विघातक स्वरूपात ऊत्सर्जित होणारी ऊर्जेची वलये आधीच मारली गेल्याने बाँब किरणोत्सर्ग होण्याच्या दृष्टीने निष्क्रीय बनतो. त्यामुळे तो फेकला तरी पुढे होणारी मनुष्यहानी काही प्रमाणात टळते. बाँबचा स्फोट झाला, तरी त्यातून वेगाने जाणार्‍या तेजरूपी रज-तमात्मक लहरी वायूमंडलातील सूक्ष्मतररूपी या अग्नीकवचाला धडकून त्यातच विघटित होतात आणि त्याचा सूक्ष्म-परिणामही तेथेच संपुष्ट झाल्याने वायूमंडल पुढील प्रदूषणाच्या धोक्यापासून मुक्‍त रहाते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १८.२.२००८, सायं. ६.५५)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अग्निहोत्र’

 

वायु प्रदूषणावरील ठोस उपाय – अग्निहोत्र !

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीकर हैराण झाले आहेत. प्रदूषणाच्या पातळीने उच्चांक गाठल्याने तेथील आरोग्यमंत्र्यांनी वाहने रस्त्यावर आणण्यासाठी ‘सम-विषम’ संकल्पना पुन्हा लागू करण्याचे ठरवले. ‘सफर इंडिया’ (सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग रिसर्च) या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार गेल्या ५ वर्षांतील सर्वात जास्त प्रदूषण यंदाच्या वर्षी झाले आहे. तेथील प्रदूषणाने परिसीमा गाठल्यामुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या आणि शेवटचा पर्याय म्हणून लोकांनी घराबाहेर पडू नये, अशी सूचनाही देण्यात आली होती. प्रदूषणाची समस्या इतकी गंभीर होईपर्यंत शासनाने वेळेवर उपाययोजना का काढली नाही, हा प्रश्‍नही तितकाच गंभीर आहे. राजधानी देहलीमध्ये प्रदूषण इतके आहे, तसेच ते भारतातील इतर ठिकाणीही आहे.

या घटनेनंतर मुंबई आणि पुणे यांसह अन्य राज्यांतील महत्त्वाच्या शहरांमधील वाढत्या प्रदूषणाविषयी चर्चा होऊ लागली आहे. ‘सफर इंडिया’च्या अहवालानुसार देहली पाठोपाठ प्रदूषित शहर म्हणून पुण्याचा क्रमांक लागला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असूनही पुण्याने प्रदूषणामध्ये मात्र मुंबईलाही मागे टाकले आहे. पुण्याचे तापमान अल्प झाल्यामुळे येथील प्रदूषण वाढले असल्याचे तज्ञांचे मत आहे. हवेतील वाढत्या प्रदूषकांमुळे सर्दी, खोकला आणि श्‍वसनाचे अनेक विकार यांमुळे पुणेकरही त्रस्त झाले आहेत. त्यातच पुण्यामध्ये दुचाकी वाहनांची संख्याही अधिक असल्याने प्रदूषणात भर पडत आहे. एकेकाळी शुद्ध हवा आणि पाणी यांसाठी ओळखले जाणार्‍या पुण्याची ओळख प्रदूषित शहर म्हणून व्हावी, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

प्रदूषणाचे नानाविध दुष्परिणाम शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दिले जातात; मात्र त्यावरील ठोस उपाय आचरला जात नाही. पृथ्वीचे संतुलन बिघडण्यामध्ये प्रदूषण हा महत्त्वाचा घटक आहे; त्याचसमवेत प्रदूषणामुळे मानवी शरीर आणि मन यांचे संतुलन बिघडते. शारीरिक विकारांमुळे मनुष्य निराश होत असल्याने सकारात्मक विचार ग्रहण करण्याची क्षमता अल्प होते. परिणामी अयोग्य विचारांमुळे अयोग्य कृतीही नकळत केली जाते. वेद आणि पुराण यांमध्ये मनुष्याने सकारात्मक राहून आनंदी कसे व्हावे, याची अनेक गुपिते लिहून ठेवलेली आहेत. मनुष्याचे मन सकारत्मक होण्यासाठी त्याच्या आजूबाजूचा परिसरही सकारात्मक, स्वच्छ आणि सुंदर असावा लागतो. परिसर स्वच्छ होण्यासाठी हवा स्वच्छ असावी लागते आणि हवा स्वच्छ होण्यासाठी नियमित अग्निहोत्र करणे, हा उपाय आहे.

अग्निहोत्राचा परिणाम स्वरूप भौतिकरित्या वायूशुद्धता होऊन मानवी मनाची शुद्धी होते. मन शुद्ध असल्यावर आपोआपच त्याचा विचार-आचार यांवर प्रभाव पडून अंतिमत: मनुष्य आनंदी होतो. अग्निहोत्रात वापरल्या जाणार्‍या सामग्रीमुळे हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण अल्प होते, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये याविषयी अभ्यास होऊन तेथेही प्रदूषणावर उपाय म्हणून अग्निहोत्राचा अवलंब केला जात आहे. यावरून वैदिक परंपरेचे महत्त्व लक्षात येते. वायूशुद्धतेच्या बाह्य उपायांसह साधना म्हणजेच धर्माचरण करणेही तितकेच आवश्यक ठरते. हिंदु संस्कृतीचे महत्त्व जाणून शासन त्यातील अशा काही धार्मिक कृतींना उजाळा देईल, तेव्हा देशाची खर्‍या विकासाकडे वाटचाल चालू होईल.

– कु. ऋतुजा शिंदे, पुणे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात