‘श्रीसत्यनारायण’रूपातील गुरुदर्शनाची पर्वणी लाभलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव सोहळा !

विश्‍वाच्या इतिहासातील संस्मरणीय दिन !

निर्गुण निराकार ब्रह्म विश्‍वरूपात वसलेले । 
धर्मराज्य स्थापन करण्या आज श्रीसत्यनारायण स्वरूपात साकारले ॥

रामनाथी (गोवा) – ‘पृथ्वीतलावर सर्वाधिक भाग्यवान कोण असेल, तर ते सनातनचे साधक !’ हे महर्षींचे बोल सार्थ ठरत असल्याची साधक पदोपदी अनुभूती घेत आहेत. सनातनच्या साधकांना जगत्पालक भगवान श्रीविष्णु गुरुस्वरूपात लाभले आहेत. श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून महर्षींच्या आज्ञेने साधकांना परात्पर गुरुमाऊलींचे अवताररूपात दर्शन होत आहे. परात्पर गुरुमाऊलींच्या श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्रीविष्णु या रूपांतील दर्शनाने कृतकृत्य झालेला प्रत्येक साधक जीव ‘या वर्षी गुरुमाऊलींचे कोणत्या रूपात बरे दर्शन होईल ?’, याची उत्कंठतेने वाट पहात होता. तो सोनियाचा दिन उगवला ! वैशाख शुक्ल पक्ष सप्तमी हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा सुदिन सनातनच्या साधकांसाठी भावक्षणांची अमृतपर्वणी घेऊन आला.

पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षि मयन यांनी केलेल्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सनातनच्या साधकांना ‘सत्यनारायण’ स्वरूपात दर्शन दिले. तीव्र शारीरिक त्रास होत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले ‘साधकांना आध्यात्मिक लाभ व्हावा’, या प्रीतीवत्सलतेपोटी जन्मोत्सवाला उपस्थित राहिले आणि त्यांनी हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्राच्या स्थापनेपूर्वी येणार्‍या आपत्काळात साधकांना तारणार असल्याचे आश्‍वस्त केले. कार्यक्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अर्पण केलेले ‘श्रीवत्स’ पदक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धारण केले. यानंतर ‘श्रीसत्यनारायण’ रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शंख आणि चक्र धारण केले. या वेळी दुर्लभ असे शंखचक्रधारी गुरुरूप साधकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवले ! या वेळी महर्षींनी सांगितल्यानुसार सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या दीपलक्ष्मी स्वरूपात हातांत दीप घेऊन परात्पर गुरु आठवले यांच्या अनुक्रमे उजव्या आणि डाव्या बाजूला उभ्या राहिल्या. या वेळी सनातनचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी आद्य शंकराचार्य विरचित ‘श्रीविष्णु षट्पदी स्तोत्रम्’ म्हटले. यानंतर पुरोहितांनी म्हटलेल्या वेदमंत्रांच्या घोषात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद्गुरुद्वयींना महर्षि मयन यांच्या आज्ञेनुसार ‘आत्मार्थ गणेशा’चे प्रतीक म्हणून षोडशोपचार पूजन केलेल्या चांदीच्या श्री गणेशमूर्ती प्रदान केल्या.

श्री सत्यनारायणाच्या स्तुतीनंतर सद्गुरुद्वयींनी पुष्पार्चना केली. अंतिमत: सद्गुरुद्वयींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आरती करून त्यांना शरणागतभावे वंदन केले.

या मंगलप्रसंगी पानवळ, बांदा येथील संत प.पू. दास महाराज, त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई), सनातनचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, पू. संदीप आळशी, पू. पृथ्वीराज हजारे,  पू. (कु.) रेखा काणकोणकर, पू. सदानंद (बाबा) नाईक, पू. विनय भावे यांची वंदनीय उपस्थिती होती. यासह परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांचे ज्येष्ठ बंधू ती. अनंत आठवले (ती. भाऊकाका), त्यांच्या पत्नी सौ. सुनीती आठवले आणि त्यांची नात कु. अनघा आठवले हेही या सोहळ्याला उपस्थित होते. श्री. वझेगुरुजी यांनी आर्तभावाने म्हटलेल्या ‘ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।’ या श्‍लोकाने कार्यक्रमाचा आरंभ झाला. ६३  टक्के आध्यत्मिक पातळीचे साधक श्री. विनायक शानभाग आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी कार्यक्रमात केलेल्या भावपूर्ण निवेदनामुळे साधकांनी अखंडपणे कृतज्ञता अनुभवली. सर्व साधकांच्या वतीने श्री. विनायक शानभाग यांनी केलेल्या आर्त प्रार्थनारूपी याचनेने सोहळ्याची सांगता झाली.

वैशिष्ट्यपूर्ण क्षण !

१. जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी झालेल्या लघु गणहोमाने वातावरणातील चैतन्यात प्रचंड वाढ झाली होती. जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळपासूनच श्रीगुरूंप्रती भाव निर्माण करणारी भक्तीगीते लावण्यात आली होती, तसेच यापूूर्वी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्यातील काही भावक्षणांची छायाचित्रे आणि भावपंक्ती ठिकठिकाणी लावण्यात आल्यामुळे चैतन्य वृद्धींगत झाले होेते.

२. कार्यक्रमाला आरंभ होण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अद्वितीय कार्यासंदर्भातील तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात पार पडलेले धार्मिक विधी अन् आतापर्यंत साजरे करण्यात आलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जन्मोत्सव यांसंदर्भातील ‘व्हिडिओ’ दाखवण्यात आले. त्यामुळे साधकांच्या भावस्मृतींना उजाळा मिळाला.

३. सोहळ्यात ‘जय लक्ष्मीरमणा’ ही आरती करण्यात आली. यानंतर महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांनी गायनाच्या माध्यमातून स्वरांजली अर्पण केली, तर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची दुर्ग (छत्तीसगड) येथील साधिका कु. शर्वरी कानस्कर (वय १२ वर्षे) आणि रत्नागिरी येथील ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची साधिका कु. अपाला औंधकर (वय १२ वर्षे) यांनी नृत्याद्वारे भावार्चना अर्पण केली.

 

जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीसत्यनारायणाची
वेशभूषा करण्यामागील आध्यात्मिक कारणे आणि कार्यकारणभाव !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सनातन संस्थेची स्थापना झाल्यानंतर वर्ष २०१५ पर्यंत माझा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा साधकांनी वेळोवेळी व्यक्त केली होती; पण स्थुलातील असे कार्यक्रम साजरे करून घेण्याची कधी इच्छा नव्हती. त्यामुळे साधकांची इच्छा असूनही मी कधी वाढदिवस साजरा केला नाही. ज्योतिषीय नाडीपट्टीकांमध्ये लाखो वर्षांपूर्वी विविध महर्षींनी लिहिलेल्या भविष्यानुसार आणि केलेल्या मार्गदर्शनानुसार २०१५ पासून माझा विष्णुरूपात जन्मोत्सव साजरा केला जात आहे. हे माझ्या मूळ प्रकृतीनुरूप नाही. याविषयी विचार करतांना मला काही सूत्रे लक्षात आली.

१. अध्यात्मात संतांनी सांगितल्याप्रमाणे कृती करणे महत्त्वाचे असते. तसेच अध्यात्मात स्वेच्छेपेक्षा परेच्छा श्रेष्ठ असते. त्यामुळे महर्षींचे आज्ञापालन केल्याने अध्यात्मातील नवीन काहीतरी शिकायला मिळेल, हे लक्षात आले.

२. आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांनी देवतांचे वेश परिधान केल्यानंतर त्यांच्या देहावर आणि वातावरणावर काही परिणाम होतो का, याविषयी वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करण्याची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला एक संधी मिळाली.

३. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे अनुक्रमे ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे कार्य आहे. माझे कार्य कलियुगात सात्त्विक स्थिती टिकवून ठेवण्याचे आहे, म्हणजेच एक प्रकारे विष्णूच्या कार्यातील काही अंशासारखे आहे. त्यामुळे विष्णूचे तत्त्व अंशरूपात ते त्या कार्यासाठी प्राप्त होते. त्यामुळे महर्षी ‘विष्णु अवतार’ म्हणतात ते माझ्या देहाला संबोधून नसून विष्णूच्या अंशात्मक कार्याशी संबंधित आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात