रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीला लक्षकुंकूमार्चन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

रामनाथी (गोवा) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पू. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून मयन महर्षि यांनी केलेल्या आज्ञेने श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीला लक्षकुंकूमार्चन करण्यात आले. या विधींतर्गत ८ मे या दिवशी श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीचे स्फटिकाच्या श्रीयंत्रावर आवाहन करून तिचे षोडषोपचार पूजन करण्यात आले, तर ९ मे या दिवशी श्री ललितासहस्रनामाचे पठण करत लक्षकुंकूमार्चन करण्यात आले.

श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीचे आवाहन करण्यात आलेल्या श्रीयंत्रावर कुंकूमार्चन करतांना उजवीकडे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, शेजारी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, साधकांचे त्रास दूर व्हावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यांसाठी श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीचे आर्ततेने स्मरण करून स्फटिकाच्या श्रीयंत्रावर १ लक्ष वेळा कुंकूमार्चन केले. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, सनातनचे पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर, श्री. अमर जोशी, श्री. ईशान जोशी, श्री. मंदार मणेरीकर, श्री. ओंकार पाध्ये यांच्यासह सनातनच्या साधकांनी या वेळी ललिता सहस्रनामाचे पठण केले.

परात्पर गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आतापर्यंत भृगु महर्षींच्या आज्ञेने सौरयाग, मयन महर्षींच्या आज्ञेने महाराजमातंगी याग आणि श्री सत्यनारायण पूजा आदी धार्मिक विधी करण्यात आले आहेत. प्रतिदिन होत असलेल्या धार्मिक विधींमुळे आश्रमातील चैतन्य वृद्धींगत होत आहे.

 

लक्षकुंकूमार्चन विधी म्हणजे काय ?

ब्रह्मांडपुराणात अगस्त्य ॠषि आणि हयग्रीव रुपात असलेले भगवान श्रीविष्णु यांच्यात झालेल्या संवादामध्ये ‘ललितासहस्रनामाचा महिमा’ सांगण्यात आला आहे. ‘लक्षकुंकूमार्चन म्हणजे ‘एक लक्ष वेळा ललितादेवीचे नामोच्चारण करत श्रीयंत्रावर कुंकू वाहणे.’ एक लाख वेळा श्री ललितादेवीचे नामोच्चारण होण्यासाठी ललितासहस्रनामाच्या १०० आवृत्या करतात. यालाच ‘लक्षार्चना’ असेही म्हणतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात