साध्वी प्रज्ञासिंह आणि स्वामी असीमानंद यांचा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही ! – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

नवी देहली – साध्वी प्रज्ञासिंह आणि स्वामी असीमानंद यांचा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही. साध्वी प्रज्ञासिंह आणि स्वामी असीमानंद हे कटकारस्थाने करण्यासाठी एकत्र जमत होते, हे खोटे आहे आणि दोन न्यायालयांनी हे स्पष्ट केले आहे, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले. वर्ष २००७ मध्ये अजमेर स्फोटाच्या प्रकरणात या आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सनातन संस्थेच्या विरोधात भूमिका घेतली होती; मग साध्वी प्रज्ञासिंह यांना निर्दोषत्व का बहाल करायचे?’, असा प्रश्‍न शहा यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले.

शहा यांना विचारण्यात आले, ‘वर्ष २०१९ मध्ये भाजप परत हिंदुत्वाकडे वळला आहे. तुम्ही साध्वी प्रज्ञासिंह यांना भोपाळमधून उमेदवारी दिली आहे.’

यावर शहा म्हणाले की,

१. यात आक्षेप काय असू शकतो, हेच कळत नाही. साध्वी प्रज्ञासिंह या देशाच्या नागरिक नाहीत का ? त्या निवडणूक लढवण्यास पात्र नाहीत का ? काँग्रेसने हिंदु आतंकवादाच्या नावाखाली सगळ्या देशाला अपकीर्त केले आहे. काँग्रेसने चुकीचे चित्र निर्माण केले. साधू आणि साध्वी यांना खोट्या प्रकरणात अडकवले.

२. समझौता एक्सप्रेस प्रकरणात न्यायालयाने सगळ्यांना निर्दोष मुक्त केले. ‘त्यांच्या विरोधात कुठलाही पुरावा नाही’, असे न्यायालयानेच म्हटले आहे. मग अडचण काय आहे ?

३. ‘या प्रकरणातील जे खरे आरोपी आहेत, ते कसे सुटले ?’, याची विचारणा केली जायला हवी. सीबीआयसारख्या संस्थांनी ज्यांना अटक केली होती ते कुठे आहेत ? हा देशासाठी महत्त्वाचा प्रश्‍न नाही का ? ‘त्या आक्रमणात लष्कर-ए-तोयबाचा हात होता’, असे अमेरिकी संस्थांनीही सांगितले आहे. भारतीय यंत्रणांचेही तेच म्हणणे आहे. हिंदु आतंकवाद, भगवा आतंकवाद या खोट्या संकल्पना रुजवण्यासाठी खोटे खटले प्रविष्ट करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात