हरिद्वार आणि धारवाड येथे ‘सनातन प्रभात’च्या ‘अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप’मधील अनुक्रमे हिंदी पाक्षिक आणि कन्नड साप्ताहिक यांचे प्रकाशन

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन प्रभात
संस्मरणीय कार्य करील ! – महामंडलेश्‍वर श्री कैलाशानंद ब्रह्मचारी महाराज

डावीकडून महंत मुक्तानंद बापूजी महाराज आणि महामंडलेश्‍वर श्री कैलाशानंद महाराज

हरिद्वार (उत्तराखंड) – सनातन प्रभात गेल्या २० वर्षांपासून अखंड धर्मसेवा करत आहे. संतांच्या वचनानुसार चालणार्‍या सनातन प्रभातला सर्व संतांचे आशीर्वाद आहेत. राष्ट्र आणि धर्म यांवर आलेले संकट दूर करण्यासाठी सनातन प्रभात दिशा देत आहे. गंगानदीच्या किनारी आध्यात्मिक वातावरणात सनातन प्रभात अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे प्रकाशन झाल्याने ते नक्कीच लोकप्रिय होईल. येणार्‍या काळात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन प्रभात निश्‍चित संस्मरणीय कार्य करील. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विज्ञानाची मर्यादा लक्षात आली. आता ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अलौकीक कार्य करत आहेत, हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार येथील श्री सिद्धपीठ दक्षिण काली मंदिराचे पीठाधीश्‍वर महामंडलेश्‍वर श्री कैलाशानंद ब्रह्मचारी महाराज यांनी काढले.

त्यांच्या हस्ते १९ एप्रिलला म्हणजेच श्री हनुमान जयंतीच्या दिनी सनातन प्रभातच्या ‘अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप’मधील हिंदी पाक्षिकाच्या विभागाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पंचअग्नि आखाड्याचे महंत मुक्तानंद बापूजी महाराज, राष्ट्रीय परशुराम परिषदेचे सचिव श्री. निर्मल वेद आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके, तसेच सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात