देवभाषा संस्कृतची महती जाणून तिचे संवर्धन करणारा जर्मन देश !

संस्कृत भाषेला ‘देवभाषा’ आणि ‘सर्व भाषांची जननी’ असे म्हटले जाते. श्रेष्ठ संस्कृती आणि परंपरा असलेल्या भारतात संस्कृत भाषेची स्थिती दयनीय आहे. स्वातंत्र्यानंतर आलेल्या कुठल्याही राजसत्तेने या भाषेला प्राधान्य देऊन तिच्या विकासासाठी प्रयत्न केले नाहीत. याउलट विदेशांमध्ये या भाषेचे महत्त्व लक्षात आल्याने अधिकाधिक विदेशी लोक ही भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. जर्मनी या देशामध्ये संस्कृत भाषेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात असून तेथील १४ विद्यापिठांमध्ये संस्कृत भाषा शिकवली जात आहे. संस्कृती, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा स्रोत असलेल्या या संस्कृत भाषेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची आवश्यकता आहे.

 

१. संस्कृत भाषेला जर्मनीमध्ये वाढता प्रतिसाद !

जर्मनी येथे विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे १४ विद्यापिठांमध्ये देवभाषा संस्कृत शिकवली जात आहे. ‘संस्कृत भाषा आणि तिची संपन्न परंपरा आणि संस्कृती शेवटी जर्मन लोकांच्या अधिकारात जाणार का ?’, असा प्रश्‍न उपस्थित होतो. ‘सध्या संस्कृत आणि ‘सिनोलॉजी’ या अभ्यासक्रमांना जर्मनीत असलेली मागणी पाहून भविष्यकाळात असे होईल’, असे वाटते. संस्कृत भाषेची उपयुक्तता आणि या भाषेला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन दक्षिण आशियामधील हेडेलबर्ग विद्यापिठाला स्वित्झर्लण्ड, इटली आणि भारत या देशांमध्ये संस्कृतमधून संभाषणवर्ग घेण्यासाठी उन्हाळी शिकवणीवर्ग चालू करावे लागले. विद्यापिठातील ‘क्लासिकल इंडोलॉजी’ विभागाचे प्रमुख डॉ. एक्सेल मिशेल्स म्हणाले, ‘‘१५ वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही विद्यापिठात हा विषय चालू केला, तेव्हा काही वर्षांतच आम्हाला तो बंद करावा लागेल’, असे वाटले होते; परंतु तसे न होता आम्हाला या अभ्यासक्रमाचा विस्तार युरोपीयन देशांत करावा लागला.’’

हेडेलबर्ग विद्यापिठाच्या संस्कृत संभाषणासंदर्भातील अभ्यासक्रमाचा जगभरातील विद्यार्थी लाभ घेत आहेत. जर्मनीमध्ये प्रमुख १४ विद्यापिठांमध्ये संस्कृत, तसेच ‘क्लासिकल आणि मॉडर्न इंडोलॉजी’ हे अभ्यासक्रम शिकवले जातात. या तुलनेत इंग्लंडमध्ये अशी चारच विद्यापिठे आहेत. प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्यात हा अभ्यासक्रम घेतला जातो आणि अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी जगभरातून अर्ज मागवले जातात. डॉ. मिशेल्स म्हणाले, ‘‘आतापर्यंत ३४ देशांतील २५४ विद्यार्थी या अभ्यासक्रमात सहभागी झाले आहेत. प्रतिवर्षी आम्हाला कित्येक अर्ज परत पाठवावे लागतात.’’ जर्मनी शिवाय अमेरिका, इटली, ब्रिटन आणि युरोपमधून विद्यार्थी येथे येतात.

 

२. इतिहास, विज्ञान, संस्कृती यांचा उगम
जाणून घेण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे संस्कृत भाषा !

संस्कृत भाषेला धर्म किंवा एखादी राजकीय विचारसरणी यांच्याशी जोडणे हा केवळ मूर्खपणा असून समृद्ध संस्कृत भाषेच्या मूळ परंपरेसाठी हानीकारक आहे. बौद्ध धर्मातील महत्त्वाचे विचारही संस्कृत भाषेत आहेत. तत्त्वज्ञान, इतिहास, विज्ञान, भाषा आणि संस्कृती यांचा उगम याविषयी अजून अधिक चांगल्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी संस्कृतच्या मूळ साहित्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे; कारण त्यामध्ये प्राचीन काळातील काही विचार आणि संशोधन यांची माहिती आहे.

 

३. संस्कृत भाषेला प्राधान्य न दिल्यास भारतीय संस्कृतीला धोका !

हेडेलबर्ग विद्यापिठात संस्कृत भाषेचे शिक्षण घेणारी फ्रान्सिस्का लुनारी ही वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी सांगते, ‘‘मला मानसशास्त्राचा अभ्यास करण्याची इच्छा आहे. त्यामुळे साहित्य, संस्कृती आणि समाज यांतून मानवी विचारांचा उगम कसा झाला, हे ठाऊक असणे आवश्यक आहे. ‘ओरिएन्टल सायकीएट्री’चे (प्राच्य मनोविज्ञानाचे) जनक गिरींद्र शेखर बोस यांच्या कामाविषयी जाणून घेण्यासाठी मला बंगाली भाषाही शिकायची आहे. संस्कृत शिकणे ही पहिली पायरी आहे.’’ ‘मॉडर्न इंडोलॉजी’ विभागाचे प्रमुख डॉ. हान्स हार्डर म्हणाले, ‘‘इंग्रजी भाषेच्या वर्चस्वामुळे बंगाली किंवा संस्कृत यांचे आस्तित्व धोक्यात येऊ शकते. हिंदी आणि बंगाली या प्रमुख भाषा इंग्रजीच्या प्रभावाला बळी पडून त्यांची स्थिती खालावली, तर जागतिक सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग लुप्त होत जाईल. सध्या अधिकाधिक कुटुंबामध्ये मुलांना त्यांच्या स्वतःच्या भाषा शिकवल्या जात नाहीत.’’

 

४. संस्कृत भाषा संस्कृतीचे तत्त्वज्ञान आणि
विज्ञान यांनी समृद्ध असल्याचे विदेशी भाषातज्ञांचे प्रतिपादन !

डॉ. मिशेल्स म्हणतात, ‘‘इथेनो इंडोलॉजी’ या विषयाचा अभ्यास केल्यावर प्राचीन विषयांचा आताच्या विषयांशी संबंध जोडू शकतो. चाणाक्य यांचे अर्थशास्त्र वाचले, तर राजकारण आणि अर्थकारण यांच्या विकासाविषयी अधिक चांगली माहिती मिळू शकते.’’ या सहा महिन्यांत संस्थेकडून ‘प्राचीन उपनिषदांमध्ये दिलेले मानवी शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र’ या आनंद मिश्रा यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित अभ्यासक्रम ठेवला गेला आहे. आनंद मिश्रा हे आय.आय.टी.मधून गणित विषयाचे पदवीधर असून ते ‘व्याकरणाच्या दृष्टीकोनातून संस्कृत भाषा संगणकासाठी वापरणे अधिक योग्य आहे’, या विषयावर अभ्यास करत आहेत. आनंद मिश्रा म्हणतात, ‘‘पाणिनी यांच्या संस्कृत भाषेतील व्याकरणाचा अभ्यास केल्यावर संगणकीय भाषा म्हणून वापरण्यास ती सर्वांत योग्य आहे, याची मला जाणीव झाली.’’ डॉ. मिशेल्स यांनी म्हटले आहे, ‘‘राजकारण किंवा धार्मिक वाद करण्यापेक्षा भारतियांनी त्यांची परंपरा राखून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण एखादे जुने चित्र किंवा शिल्प जपून ठेवत नाही का ? ही तर जिवंत भाषा आणि श्रेष्ठ अशी सांस्कृतिक परंपरा आहे. याकडे आपण लक्ष दिले नाही, तर संस्कृत भाषा हंपी संस्कृती, अजंठा येथील कलाकृती आणि कोणार्क मंदिराप्रमाणे दुर्लक्षिली जाईल. संस्कृती, तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांनी समृद्ध असलेली ही भाषा हळूहळू दूर्मिळ होऊ शकते. याउलट ‘इंडस संस्कृती’ यांसारख्या विषयावर संस्कृतमधूनच संशोधन होऊ शकते.’’

 

५. संस्कृत भाषेला प्राधान्य देऊन ‘संस्कृत तज्ञ’ घडवणारा जर्मनी !

जगासाठी जर्मनी हे संस्कृत विषयातील तज्ञ लोकांचे आगर आहे; कारण हॉवर्ड, कॅलिफोर्निया (बर्कले) आणि इंग्लंड येथील विद्यापिठांमधील संस्कृत विषयाचे बहुतांश तज्ञ जर्मन आहेत. याविषयी डॉ. मिशेल्स म्हणतात, ‘‘आम्ही भारताकडे राज्य करण्याच्या दृष्टीने पाहिले नाही. केवळ भारताशी प्रेमाचे संबंध ठेवले.’’

जर्मनीमधील भारतियांना संबोधन करतांना भारताचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते, ‘‘काही दशकांपूर्वी जर्मन रेडिओवरून संस्कृतमधून बातम्या सांगितल्या जात असत. त्या वेळी भारतात अशाप्रकारे संस्कृतमधून बातम्या दिल्या जात नसत; कारण ‘त्यामुळे सर्वधर्मसमभावाला बाधा येईल’, अशी समजूत होती. भाषेमुळे सर्वधर्मसमभावाला काही बाधा येत नाही. भारतातील सर्वधर्मसमभावाला भाषेमुळे बाधा येईल, एवढा तो दुबळा नाही. आपल्याला आत्मविश्‍वास पाहिजे.’’

 

६. भारतात संस्कृत भाषेचा विकास
होण्यासाठी कोणताही पुढाकार न घेणारे भारत शासन !

भारतातील शिक्षणतज्ञांना वाटते की, ‘संस्कृत विषयाचे अधिक ज्ञान मिळण्यासाठी हा विषय शाळेतून विद्यार्थ्यांना शिकवला गेला पाहिजे. देहली विद्यापिठातील संस्कृत विभागाचे प्रमुख प्रो. रमेश भारद्वाज म्हणतात, ‘‘भारतीय जीवनाचा संस्कृत हा अविभाज्य भाग आहे. भाषेशिवाय समाज आपली ओळख विसरतो. राजा राममोहन रॉय ते मोहनदास गांधीपर्यंत सर्वांना संस्कृत भाषेविषयी अतिशय आदर आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ संस्कृत साहित्यावर आधारित आहे.’’ ‘संस्कृत भाषेचा समाजात प्रसार करण्यासाठी शासनाने काहीही पुढाकार घेतलेला नाही’, असे इतिहासतज्ञांना वाटते. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या केंद्रातील आणि राज्यातील सरकार यांनी या भाषेला कोणताही आधार दिला नाही. संस्कृती, धर्म आणि तत्त्वज्ञान यासाठी आपला देश प्रसिद्ध आहे. धार्मिक भावना आणि संस्कृत हे आपण वेगळे करू शकत नाही.’’ हल्लीच ‘मानव संसाधन विकास खात्याने’ जर्मनीसह केंद्रीय विद्यालयामध्ये तिसरी भाषा म्हणून जर्मन भाषा घेतली जावी’, अशा प्रकारचा करार केला आहे; परंतु यामुळे तीन भाषांविषयीच्या सूत्राला बाधा येत आहे’, याची जाणीव केंद्रीय विद्यालयाच्या संघटना किंवा खात्याला नाही. ‘तीन भाषांच्या सूत्रानुसार शाळांमधून हिंदी, इंग्रजी आणि आधुनिक भारतीय भाषा शिकवावी’, असे आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये संस्कृत भाषा तिसरी भाषा म्हणून लोकप्रिय आहे. याविषयी संस्कृत विभागाचे प्रमुख म्हणतात, ‘‘भारतातील केवळ ५ किंवा ६ टक्के लोकांना इंग्रजी भाषा कळत असल्याने सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यात यावे’, असे आम्हाला वाटते. बर्‍याच ठिकाणी स्थानिक भाषेतच व्यवहार केला जातो. संस्कृतचे योग्य ज्ञान नसेल, तर कोणतीही इतर भाषा नीट समजू शकत नाही.’’

(संदर्भ : www.dailymail.co.uk)