पानवळ, डेगवे येथील श्रीराम पंचायतन मंदिरात श्रीरामनवमी सोहळ्यात सनातनचा सहभाग !

बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) – पानवळ, डेगवे येथील श्रीराम पंचायतन मंदिरात १३ एप्रिल या दिवशी श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी प.पू. दास महाराज, पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, सद्गुरु सत्यवान कदम आणि कवळे-फोंडा (गोवा) येथील पू. सुमन (मावशी) नाईक यांची वंदनीय उपस्थिती लाभली. अतिशय भावपूर्ण अन् मंगलमय वातावरणात सकाळी ९ वाजता उत्सवास प्रारंभ झाला. आरंभी श्रीराममंदिरात नित्यपूजन, अभिषेक आदी धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर कीर्तन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मसोहळा, आरती, तीर्थप्रसाद असे कार्यक्रम झाले. त्यानंतर सनातनचे साधक श्री. दैवेश रेडकर यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य, गुरुकृपायोग आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प यांविषयी माहिती दिली. त्यानंतर महाप्रसाद आणि दुपारी ३.३० वाजता पर्वरी-गोवा येथील भजनी मंडळाच्या वतीने संत भक्तराज महाराज यांची प्रासादिक भजने सादर करण्यात आली. सायंकाळी श्रीरामरक्षा स्तोत्राची आवर्तने झाली. सायंकाळी ६ वाजता आरवली, वेंगुर्ले येथील श्री. शेखर पणशीकर यांचा ‘गीतरामायण’ कार्यक्रम झाला. रात्री स्थानिक भजनी मंडळाच्या वतीने भजने सादर करण्यात आली.

आरती करतांना डावीकडून पू. सुमन (मावशी) नाईक, पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, प.पू. दास महाराज, आरती ओवाळतांना श्री. संतोष पंचपोर आणि सद्गुरु सत्यवान कदम

वैशिष्ट्यपूर्ण

१. पर्वरी (गोवा) येथील भजनी मंडळासमवेत पू. माईंनी काही भजने म्हटली. त्या वेळी उपस्थितांची भावजागृती झाली. ‘पू. माई भजन म्हणतात तेव्हा त्या तल्लीन झालेल्या असतात. त्यांचे शब्द अंत:करणाला भिडून भावजागृती होते’, असे बहुतेकांना वाटले.

२. पू. माई भजनात इतक्या तल्लीन झाल्या की, शब्दांच्याही पलीकडे गेल्या. शब्द खुंटले. त्या वेळेस लगेच प.पू. दास महाराज यांनी पुढची कडवी गाण्यास आरंभ केला. तेव्हा सर्वांनाच आश्‍चर्य वाटले; कारण आतापर्यंत प.पू. महाराजांना पंचमुखी हनुमान कवच यज्ञाच्या वेळी मारक भावातील मंत्रोच्चार म्हणतांनाच सर्वांनी पाहिले होते. त्यांनी प्रथमच भजने गायली. त्यांच्या भजनात लयबद्ध स्वर नव्हते; पण ऐकणार्‍यांना आनंदाची अनुभूती येत होती. त्यांनी तीन भजने गायली. ‘आनंद’ हेच त्यांच्या भजनाचे वैशिष्ट्य होते.

३. भजनाच्या शेवटच्या चरणात प.पू. रमेश महाराजांचे सभामंडपात आगमन झाले. त्यांनीही उत्स्फूर्तपणे भजने म्हटली. त्यांच्या भजनाने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.

४. एकाच वेळी ३ संतांची भजने आणि त्यांच्या भजनातील वैशिष्ट्ये अनुभवण्याची संधी दिल्याविषयी सर्वांनी श्रीरामरायांच्या चरणी अन् सर्व संतांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

 

धर्मद्रोह्यांनी कितीही विरोध केला, तरी परात्पर गुरु डॉ. आठवले
यांच्या संकल्पाने धर्मसंस्थापना होणारच ! – ह.भ.प. सदाशिव पाटील

धर्माला विरोध करणार्‍या पाखंड्यांचे खंडन करत धर्मपालन करा, अशी शिकवण संत तुकाराम महाराजांनी दिली आहे. याच शिकवणीनुसार सनातन संस्था धर्मसंस्थापनेचे कार्य करत आहे. ईश्‍वराने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात अवतार धारण केला असून धर्मद्रोह्यांनी कितीही विरोध केला, तरी परात्पर गुरुदेवांच्या संकल्पाने धर्मसंस्थापना होणारच आहे, असे ठाम प्रतिपादन सनातनचे साधक तथा आंदुर्ले, कुडाळ येथील कीर्तनकार ह.भ.प. सदाशिव सुरेश पाटील (वय १७ वर्षे) यांनी केले.

क्षणचित्र

सायंकाळी ७ वाजता गीतरामायण कार्यक्रम चालू असतांना अचानक ढग दाटून विजा चमकू लागल्या. रात्री ९.३० वाजता कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळेत बांदा, डेगवे, वाफोली अशा सर्व भागांत जोरदार पाऊस पडला होता; पण श्रीराम पंचायतन मंदिराच्या ठिकाणी जराही पाऊस पडला नाही. उपस्थितांनी या वेळी श्रीरामाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात