ठाणे येथील सनातनचे साधक प्रसन्न ढगे यांच्या निवासस्थानी जाऊन कल्याण येथील गुन्हे अन्वेषण शाखेचे विनोद पाटील आणि गुणे आका यांनी केली चौकशी

कथित विचारवंतांच्या हत्यांच्या प्रकरणी सनातनच्या
साधकांच्या मागे पोलिसांच्या चौकशीचा वाढता ससेमिरा !

राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणार्‍या सनातनच्या निरपराध साधकांची वारंवार चौकशी करून त्यांना नाहक छळणारे पोलीस कायद्याचे राज्य काय देणार ? अशी चौकशी जिहादी आतंकवाद्यांची केली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !

‘९.४.२०१९ या दिवशी ठाणे येथील सनातनचे साधक श्री. प्रसन्न ढगे यांच्या निवासस्थानी गुन्हे अन्वेषण विभागाचे (क्राईम ब्रँचचे) विनोद पाटील आणि गुणे आका यांनी त्यांच्याविषयी चौकशी केली. या वेळी निवासस्थानी श्री. ढगे नव्हते. त्यांच्या पत्नी सौ. प्राजक्ता ढगे होत्या. त्यांनी सौ. ढगे यांच्याकडे चौकशी केली. पोलिसांनी सौ. ढगे यांना त्यांचे नाव, कधीपासून ठाण्यात रहातात ?, घरात किती जण असतात ?, आदी प्रश्‍न विचारले. त्यानंतर पोलीस आणि सौ. ढगे यांच्यात झालेले संभाषण येथे देत आहोत.’

पोलीस : प्रसन्न ढगे काय करतात ?

सौ. ढगे : ते नोकरी करत होते. वर्ष २००३ मध्ये त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.

पोलीस : मग आता काय करतात ? आता त्यांचा व्यवसाय काय ? ते सेवा काय करतात ?

सौ. ढगे : व्यवसाय काही नाही. ते ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या अहवालाची सेवा करतात.

पोलीस : प्रसन्न ढगे यांचे पद काय आहे ?

सौ. ढगे : पद वगैरे काही नाही. ते फक्त सेवा म्हणूनच करतात.

(सौ. ढगे यांची चौकशी करतांना पोलीस घराचेही निरीक्षण करत होते आणि माहिती लिहून घेत होते. या वेळी पोलिसांनी सौ. ढगे यांच्याविषयी, तसेच त्यांच्या माहेरचीही माहिती विचारून घेतली. त्यानंतर पोलीस ‘आणखी काही माहिती हवी असल्यास पुन्हा येऊ’, असे सांगून निघून गेले.)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात