पुणे येथील ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियानाच्या वेळी मद्यपी टोळक्याकडून सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे वयस्कर कार्यकर्ते यांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की

पुणे – धूलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच २१ मार्चला हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवण्यात आले. या अंतर्गत समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक, ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी यांनी खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी केली होती. या माध्यमातून रंगाने माखलेल्या युवकांना पाण्यात उतरण्यास प्रतिबंध करण्यात येत होता. त्याचा राग येऊन २१ मार्चला दुपारी ४.४५ च्या सुमारास ४-५ हुल्लडबाज आणि मद्यपी लोकांनी हातात प्रबोधनात्मक फलक धरलेल्या सनातन संस्थेच्या साधकाला शिवीगाळ केली, तसेच समितीच्या एका वयस्कर कार्यकर्त्याला धक्काबुक्कीही केली. साधक आणि कार्यकर्ते थांबलेल्या ठिकाणी चारचाकी ‘स्कॉर्पिओ’ गाडीतून मद्यपी आले. ‘तुम्ही सनातनचे लोक बॉम्ब फोडता’ वगैरे म्हणत त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या सनातनच्या साधकाला शिवीगाळ केली. त्यांचे साथीदार त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होते; पण कोणतेही भान नसल्याने उद्दाम टवाळखोरांनी एका वयस्कर कार्यकर्त्याला धक्कीबुक्कीही केली. अन्य एका कार्यकर्त्याचा भ्रमणभाष हिसकावून घेऊन तो आपटला. यामध्ये भ्रमणभाषची ‘स्क्रीन’ खराब झाली. त्या टवाळखोरांनी तेथे उभे असलेल्या एका महिला साधिकेची छायाचित्रे काढून चित्रीकरणही केले. ‘आम्ही एका राजकीय नेत्याची माणसे आहोत’, अशी बडबडही ते लोक करत होते. जवळ असलेला मोठा दगड उचलून तो साधकांवर भिरकावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. हा प्रकार चालू असतांनाच याची माहिती पोलिसांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हुल्लडबाज लोकांना कह्यात घेतले. पोलिसांनी कह्यात घेतल्यानंतरही या त्यातील एका युवकाने एका स्थानिक नेत्याचे नाव सांगत ‘आम्ही तुला बघून घेऊ’, अशी धमकी साधकाला दिली, तसेच पोलीस गाडीत घालून घेऊन जात असतांनाही खिडकीतून हात हलवून उद्दामपणा दाखवला. हुल्लडबाजांना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात