(म्हणे) ‘सनातन संस्थेचे समर्थक बांदिवडेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी !’

  • ‘रिपब्लिक भारत’ या हिंदी वृत्तवाहिनीकडून बांदिवडेकर हे सनातनचे समर्थक असल्याचे सांगत काँग्रेसवर टीका

  • काँग्रेसकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी

  • सनातनची जाणीवपूर्वक अपकीर्ती करून तिला लक्ष्य करू पहाणारी सनातनद्वेषी ‘रिपब्लिक भारत’ वृत्तवाहिनी ! 
  • सनातनने पत्रकार परिषदा आणि प्रसिद्धीपत्रके यांद्वारे अनेकदा स्पष्ट केले आहे की, हिंदुत्वनिष्ठ श्री. वैभव राऊत हे सनातनचे साधक नाहीत. नालासोपारा येथील ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी उत्स्फूर्तपणे श्री. राऊत यांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढला होता. त्यात भंडारी समाजाचे अध्यक्ष या नात्याने बांदिवडेकर सहभागी झाले होते. तसेच सनातन संस्थाही त्यात सहभागी झाली होती. असे असतांना बांदिवडेकर यांना ‘सनातनचे समर्थक’ म्हणणे हा खोडासळपणा आहे. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली ‘रिपब्लिक भारत’ जाणीवपूर्वक सनातनची अपकीर्ती करून तिला लक्ष्य करू पहात आहे !  
  • ‘रिपब्लिक भारत’ वृत्तवाहिनीने सनातन संस्थेचे काँग्रेसशी अशा प्रकारचे संबंध जोडल्यावरून सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! अशा बातम्यांच्या माध्यमातून सनातनद्वेषाचा कंड शमवून घेणार्‍या ‘रिपब्लिक भारत’सारख्या वृत्तवाहिन्या समाजाला काय दिशा दर्शन करणार ?

मुंबई – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भंडारी समाजाचे नेते नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. ‘बांदिवडेकर हे सनातन संस्थेचे समर्थक आहेत. त्यामुळे काँग्रेस ज्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी करते, त्याच्यावर हत्यांचा आरोप करते, त्या संघटनेच्या समर्थकांना ती तिकीट देते’, अशा आशयाचे वृत्त ‘रिपब्लिक भारत’ या हिंदी वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. यासाठी त्याने भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचीही प्रतिक्रिया घेतली. त्यात डॉ. स्वामी यांनी बांदिवडेकर यांना उमेदवारी दिल्यावरून काँग्रेसवर टीका केली आहे. ‘काँग्रेस नेहमीच भाजपवर अशा संस्थांच्या बाजूने असल्याची टीका करत असते; मात्र आता काँग्रेसचा खरा तोंडवळा समोर आला आहे’, असे डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे.

‘रिपब्लिक भारत’च्या वृत्तात म्हटले आहे की,

१. सनातन संस्थेचे नाव दाभोलकर आणि अन्य लोक यांच्या हत्येच्या प्रकरणात पुढे आले असतांना काँग्रेसने तिचा विरोध केला होता. मेणबत्ती मोर्चाही काढला होता आणि आता तिच्याच समर्थकाला त्यांनी मतांसाठी उमेदवारी दिली आहे.

२. ‘काँग्रेस का हाथ सनातन संस्था के साथ’ आहे. काँग्रेस सनातनला ‘भाजपची एक शाखा’ असे म्हणत होती. तिच्या समर्थकाला आता तिकीट देण्यात आले आहे. (काँग्रेस सत्तेवर असतांना तिने सनातनच्या साधकांचा केलेला छळ पहाता ‘काँग्रेस सनातनची समर्थक आहे’, अशा आशयाचे वृत्त देणे हास्यास्पद आहे. यावरून वृत्तवाहिनीच्या पत्रकारितेचा दर्जा दिसून येतो ! – संपादक)

३. बांदिवडेकर सनातनच्या कार्यात असणारी व्यक्ती आहे. त्यांच्या बैठकांमध्ये ती सहभागी असते. काँग्रेसने संधीसाधूपणा केला आहे. आता काँग्रेसने यावर उत्तर दिले पाहिजे.

४. गौरी लंकेश, दाभोलकर यांची हत्या झाल्यावर काँग्रेसने भाजपवर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली होती आणि ‘भाजप बंदी घालत नाही’, असाही आरोप केला होता; मात्र आता काँग्रेसच या संस्थेच्या जवळच्या व्यक्तीला तिकीट देत आहे.

५. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अधिवक्ता माजिद मेमन यांची प्रतिक्रिया या वेळी घेण्यात आली. त्यांनी ‘याविषयी काँग्रेसला विचारा. मी त्यावर उत्तर देऊ शकत नाही’, असे सांगितले, तसेच ‘आम्ही अशा उमेदवारांना तिकीट दिले नसते’, असेही त्यांनी स्पष्ट केले. (‘सनातन संस्थेचे समर्थक असलेल्यांना नाही, तर हत्येचा, भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍यांना आम्ही तिकीट देतो’, असे मेमन यांना सांगायचे आहे का ? – संपादक)

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एबीपी माझा आणि झी २४ तास या सनातनद्वेषी वृत्तवाहिन्यांनी बांदिवडेकर आणि सनातन संस्था यांचा संबंध दाखवण्याचा प्रयत्न करून सनातनची अपकिर्ती केली.

 

वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ मोर्च्याचे छायाचित्र प्रसारित

हे वृत्त प्रसारित करतांना नालासोपारा प्रकरणात अटक करण्यात आलेले गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ नालासोपारा येथे काढण्यात आलेल्या मोर्च्याचे छायाचित्र दाखवण्यात येत होते. या छायाचित्रात नवीनचंद्र बांदिवडेकर उपस्थित असल्याचे दिसत होते.

 

बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी सुतराम संबंध नाही !

‘नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी सुतराम संबंध नाही. ‘त्यांचा संबंध आहे’, असे सांगण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे’, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये केले आहे.

 

माझा आणि सनातन संस्थेचा काहीही संबंध नाही ! – नवीनचंद्र बांदिवडेकर

नवीनचंद्र बांदिवडेकर

कुडाळ येथे २१ मार्चला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नवीनचंद्र बांदिवडेकर म्हणाले, ‘‘नालासोपारा प्रकरणातील संशयित आरोपी वैभव राऊतशी फक्त एक समाजबांधव म्हणून माझा संबंध आहे. हा ४ मासांपूर्वीचा विषय आहे. वैभव राऊत हा भंडारी समाजाचा आहे. मी भंडारी समाजाचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. समाजबांधव या नात्याने मी वैभव राऊतच्या सुटकेसाठी मोर्चा काढला होता. नालासोपारा येथील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्‍वास आहे. माझ्या समाजबांधवाची निर्दोष सुटका होणार आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने सोशल मीडियावर (सामाजिक प्रसारमाध्यमांतून) माझी अपकीर्ती करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. माझा आणि सनातन संस्थेचा काहीही संबंध नाही. सनातन संस्थेच्या कोणत्याही व्यासपिठावर (प्लॅटफॉर्मवर) मी गेलेलो नाही. सोशल मीडियावर अपकीर्ती करणार्‍यांनी याविषयी पुरावा द्यावा.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात