हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साधकांना ऊर्जा देण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या त्यांच्या पादुकांचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात आगमन आणि प्रतिष्ठापना !

श्री महालक्ष्मीदेवीचा आशीर्वादस्वरूप
लाभलेल्या ‘श्रीं’ बीजमंत्रांकित पदकाचीही झाली प्रतिष्ठापना !

श्री गुरुपादुकांचे पूजन करतांना पू. उमेश शेणै (डावीकडे)आणि मंत्र म्हणतांना वेदमूर्ती श्री. सिद्धेश करंदीकर

देवद (पनवेल) – हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साधकांना अखंड चैतन्यस्रोत पुरवणार्‍या, साधनेसाठी वरदानस्वरूप लाभलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भृगु महर्षींच्या आज्ञेने हस्तस्पर्श केलेल्या पादुकांचे येथील सनातनच्या आश्रमात फाल्गुन शुक्ल पक्ष दशमी (१६ मार्च) या शुभदिनी आगमन झाले. आगमनानंतर सायंकाळी ७ वाजता गुरुपादुकांचे षोडशोपचार पूजन करून आश्रमातील ध्यानमंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी भृगु महर्षींनी सनातनच्या साधकांना आशीर्वादस्वरूपात दिलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या ‘श्रीं’ बीजमंत्रांकित पदकाचीही प्रतिष्ठापना करण्यात आली.

गुरुपादुकांच्या आगमनप्रसंगी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पादुका हातात घेतलेले पू. उमेश शेणै यांचे कुंकूमतिलक लावून स्वागत केले, तर पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी पादुकांचे औक्षण केले. पू. उमेश शेणै यांना श्री गुरुपादुका आणि ‘श्रीं’ बीजमंत्रांकित पदकाचे पूजन अन् प्रतिष्ठापना करण्याचे सौभाग्य लाभले. सनातनच्या साधक पुरोहित पाठशाळेतील श्री. सिद्धेश करंदीकर यांनी या पूजाविधीचे पौरोहित्य केले. या वेळी आश्रमातील सनातनचे संत उपस्थित होते.

‘रामनाथी (गोवा) येथील आश्रमात गुरुपादुका पूजन सोहळा झाल्यानंतर सनातनच्या सर्वत्रच्या साधकांना श्रीगुरूंच्या निर्गुण चैतन्याचा लाभ व्हावा, यासाठी पादुकांची सर्वत्रच्या आश्रमांत प्रतिष्ठापना करण्यात यावी’, असे चेन्नई येथील श्री. सेल्वम्गुरुजी यांच्या माध्यमातून भृगु महर्षींनी सांगितले आहे. त्यानुसार देवद (पनवेल) येथील आश्रमात पादुकांचे आगमन आणि प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. साधक तेव्हापासून ज्यांची आतुरतेने वाट पहात होते, त्या श्री गुरुपादुकांचे, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याच तत्त्वाचे आश्रमात आगमन झाल्याने सर्व साधकांना अत्यानंद झाला. सर्वांनी मनोमन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या या निर्गुण रूपाला शिरसाष्टांग नमस्कार केला. गुरुपादुकांच्या दर्शनाने साधक कृतकृत्य झाले.

क्षणचित्रे

१. गुरुपादुकांच्या आगमनाच्या वेळी ध्यानमंदिरामध्ये फुलांची सजावट भावपूर्णरित्या केली होती. ‘जणू सर्व फुले श्री गुरुपादुकांच्या चरणांवर समर्पित होण्यासाठी आतुरलेली आहेत’, असे जाणवत होते.

२. श्री गुरुपादुकांच्या स्वागतासाठी साधकांनी आश्रमात आणि परिसरातही फुले अन् पणत्या यांची नाविन्यपूर्ण रचना केली होती. या पणत्यांच्या भावतेजाने आश्रमाचे प्रवेशद्वार आणि मार्गिका उजळल्या होत्या.

३. ध्यानमंदिरातील वातावरण आज नेहमीपेक्षा पुष्कळ चैतन्यदायी जाणवत होते. ‘जणू सर्व देवता श्री गुरुपादुकांचे स्वागत करण्यासाठी आश्रमात अवतरल्या आहेत’, असे जाणवत होते.

४. या वेळी वातावरणात निळसर रंगाची छटा पसरली होती.

 

श्री गुरुपादुकांचे भावपूर्ण दर्शन घेऊया !

 

आता कसा हा उपकार फेडू ।
हा देह ओवाळूनि दूर सोडू ॥

म्या एकभावे प्रणिपात केला ।
विसरू कसा मी गुरुपादुकांना ॥

– श्री गुरुपादुकाष्टक

श्री गुरुपादुकास्तुति

नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः परेभ्यः परपादुकाभ्यः ।
आचार्य-सिद्धेश्‍वर-पादुकाभ्योनमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यः ॥

(अर्थ – श्री गुरूंना नमस्कार करतो. श्री गुरूंच्या पादुकांना नमस्कार करतो. परेतील गुरूंना (परात्पर गुरूंना) नमस्कार करतो. परात्पर गुरूंच्या पादुकांना नमस्कार करतो. ईश्‍वरप्राप्ती झालेल्या आचार्यांच्या पादुकांना नमस्कार करतो. लक्ष्मीपती श्रीविष्णूच्या पादुकांना नमस्कार करतो.)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात