महर्षि मयन यांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी रामेश्‍वरम् येथे केलेले परिहार (उपाय) आणि त्या वेळी आलेल्या अनुभूती

 

१. महर्षि मयन यांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.)
अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील रामेश्‍वरम् येथे विशेष पूजा करणे

‘११.१.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील रामेश्‍वरम् येथे विशेष पूजा केली. महर्षि मयन यांनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले, ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, साधकांचे शारीरिक त्रास न्यून व्हावेत आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी भूमी मिळण्यातील अडथळे दूर व्हावेत’, यासाठी सद्गुुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी रामेश्‍वरम् येथील ‘रामनाथस्वामी’ मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करावी.’ मयन महर्षींनी सांगितल्यानुसार सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ देवळात पूजा-अर्चा करण्यासाठी गेल्या होत्या.

 

२. रामेश्‍वरम् येथील ‘रामनाथस्वामी’ मंदिर आणि त्याचा इतिहास !

२ अ. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण असल्याने त्याच्या वधामुळे श्रीरामाला ब्रह्महत्येचे पातक
लागणे आणि त्याच्या परिमार्जनासाठी श्रीराम अन् सीता यांनी वाळूचे शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा करणे

‘रामस्य ईश्‍वरः रामेश्‍वरः ।’, म्हणजे ‘रामाचा ईश्‍वर, तो रामेश्‍वर.’ भगवान श्रीरामाने ज्या ईश्‍वराचे (शिवाचे) पूजन केले, असा भगवंत म्हणजे रामेश्‍वर ! रामेश्‍वर हे दैवत रामेश्‍वरम् येथील रामनाथस्वामी मंदिराची अधिष्ठात्री देवता आहे. श्रीराम हा भगवान श्रीविष्णूचा सातवा अवतार होता. लंकाधिपती रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. त्याचा वध केल्यामुळे श्रीरामाला ब्रह्महत्येचे पातक लागले. लंकेतून सीतेला सोडवून अयोध्येला परत जातांना श्रीरामाने रामेश्‍वरम् येथे विश्राम घेतला. ‘ब्रह्महत्येच्या पातकाचे परिमार्जन होण्यासाठी श्रीराम आणि सीता यांनी येथे एकत्रितपणे शिवलिंग स्थापून त्याचे पूजन करावे’, असे वसिष्ठ ऋषि आणि विश्‍वामित्र ऋषि यांनी श्रीरामाला सांगितले. त्याप्रमाणे श्रीराम आणि सीता यांनी येथे वाळूचे शिवलिंग स्थापले अन् त्याची विधीवत पूजा केली.

२ आ. रामेश्‍वरम् हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असणे आणि
या मंदिरात आद्य शंकराचार्यांनी पूजा केलेले ‘चंद्रमौळीश्‍वर’ नावाचे स्फटिक लिंग असणे

रामेश्‍वरम् हे १२ ज्यातिर्लिंगांपैकी एक आहे. येथे शिवाला ‘रामनाथ’ या नावाने संबोधले जाते आणि येथील देवीचे नाव ‘पर्वतवर्धिनी’ आहे. रामेश्‍वरम्चे पूर्वीचे नाव ‘सेतूपुरी’ किंवा ‘सेतूबंध रामेश्‍वरम्’ असे आहे. या मंदिरात २ सहस्र ६०० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांनी पूजा केलेले ‘चंद्रमौळीश्‍वर’ नावाचे स्फटिक लिंगही आहे. प्रत्येक दिवशी पहाटे ५ ते सकाळी ६ या वेळेत मंदिराच्या गाभार्‍यात या स्फटिक लिंगावर अभिषेक करण्यात येतो. या वेळी उपस्थित भक्तांना या स्फटिकाच्या शिवलिंगाचे दर्शन घेता येते.

 

३. रामेश्‍वरम् येथील कोटिलिंग स्वामी मठात महामृत्युंजय यागाच्या
वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी
होमाचा संकल्प करणे आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांनी यज्ञकर्म पूर्ण करणे

रामेश्‍वरम् येथील ज्योतिष शास्त्री रविचंद्रन् शर्मा यांनी रामेश्‍वरम् मंदिराच्या जवळ असलेल्या कोटिलिंग स्वामींच्या मठात महामृत्युंजय होम आयोजित केला होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी होमाचा संकल्प केला. होम चालू करण्यापूर्वी १२ वेदब्राह्मणांनी विष्णुसहस्रनामाचे शास्त्रोक्त पठण केले. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक सर्वश्री विनायक शानभाग, दिवाकर आगावणे, स्नेहल राऊत आणि सत्यकाम कणगलेकर यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची अनुज्ञा घेऊन यज्ञकर्म पूर्ण केले. या वेळी पुढील महामृत्युंजय मंत्राची आवर्तने म्हणून तुपात भिजवलेल्या जवाची (न सोललेल्या भाताची) आहुती दिली.

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

अर्थ : ‘परमेश्‍वर’ हा ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तिघांचाही ‘अंबक’ म्हणजे पिता आहे. या परमेश्‍वराची कीर्ती सर्वत्र पसरली आहे. तो संपूर्ण जगताचे आदिकारण आहे. तो अष्टसिद्धींचा दाता आहे. त्या परमेश्‍वराची आम्ही आराधना करतो. ‘हे परमेश्‍वरा, ज्याप्रमाणे काकडी देठापासून अलगद विलग होते, त्याप्रमाणे मृत्यू किंवा संसार यांपासून तू मला सोडव आणि मला सायुज्य मुक्ती दे.’

 

४. धनुष्यकोडी येथे जाऊन रामसेतूचे दर्शन घेणे, त्या वेळी सद्गुरु (सौ.)
अंजली गाडगीळ यांच्या पायांखालील वाळूतून खेकडा बाहेर येऊन समुद्रात
निघून जाणे आणि कर्क, म्हणजेच खेकड्याच्या रूपात श्रीरामचंद्राचे दर्शन होणे

दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळी रामेश्‍वरम् येथून २५ कि.मी. अंतरावरील धनुष्यकोडी येथे पोचलो. येथून श्रीरामाने वानरसेनेच्या साहाय्याने लंकेला जाण्यासाठी सेतू बांधला होता. आजही आपल्याला त्या सेतूचे दर्शन होते. आम्ही सेतूचे मनोभावे दर्शन घेतले. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ प्रार्थना करत असतांना त्यांच्या पायाखालील वाळूतून एक सोनसळी पिवळ्या रंगाचा खेकडा बाहेर आला. आश्‍चर्य म्हणजे आम्ही येथे येतांना आणि त्या भूखंडावर फिरतांना कुठेही खेकडे दिसले नाहीत; मात्र सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ प्रार्थना करतांना आम्हाला हा खेकडा दिसला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ज्योतिष विभागातील साधिका सौ. प्राजक्ता जोशी यांनी सांगितले, ‘‘श्रीरामचंद्राची रास कर्क आहे.’’ या दिवशी कर्क म्हणजेच खेकड्याच्या रूपात आम्हाला श्रीरामचंद्राचे दर्शन झाले. या वेळी लक्षात आले, ‘खेकडा वाळूवर गतीने जात असतांनाही त्याच्या पायांचे ठसे वाळूवर उमटत नव्हते. तो एक दैवी जीव होता आणि केवळ आम्हाला दर्शन देण्यासाठीच आला होता.’

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

 

५. रामेश्‍वरम् येथे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना
हरि आणि हर यांचे एकाच वेळी दर्शन झाल्याची आलेली अनुभूती

५ अ. रामेश्‍वरम् येथे अग्निहोत्र चालू असतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना कोदंडधारी
श्रीरामाचे दर्शन होणे, श्रीरामाचे मुख शिवासारखे दिसणे, श्रीरामाच्या धनुष्यातून एक बाण सुटल्यावर त्यातून
अनेक बाण सुटणे आणि ‘देवीची शक्ती श्रीरामाच्या बाणांतून असुरांच्या नाशासाठी प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे

१२.१.२०१९ या दिवशी आम्ही रामेश्‍वरम् येथे अग्निहोत्र केले. त्या वेळी सद्गुरु काकूंना कोदंडधारी श्रीरामाचे दर्शन झाले. रामाचे मुख शिवासारखे दिसत होते. त्याच्या जटांच्या जागी सद्गुरु काकूंना नाग दिसत होते. श्रीरामाच्या धनुष्यातून एक बाण सुटल्यावर त्यातून अनेक बाण सुटत होते. त्या वेळी सद्गुरु काकूंना ‘सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके…’ हा देवीचा मंत्र ऐकू येत होता. त्या वेळी ‘देवीची शक्ती श्रीरामाच्या बाणांतून वाईट शक्तींच्या नाशासाठी प्रक्षेपित होत आहे’, असे सद्गुरु काकूंना जाणवले. त्या वेळी सद्गुरु काकूंना हरि आणि हर यांचे एकाच वेळी दर्शन झाले.

रामेश्‍वरम् येथे शिवलिंगाची स्थापना करून राम रावणवधासाठी लंकेत गेला. रावणाचा वध करायच्या वेळी बाण सोडतांना रामाच्या बाणावर देवी विराजमान झाली आणि रामाने रावणाच्या नाभीत बाण मारून त्याचा वध केला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हाला या समष्टीसाठीच्या यज्ञात सहभागी होता आले. यासाठी आम्ही भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’

– श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०१९)

‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रार्थना करतांना खेकडा दिसणे’ आणि
‘त्यांना हरि अन् हर यांचे एकाच वेळी दर्शन होणे’ या अनुभूतींच्या संदर्भातील ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण

१. ‘१२.१.२०१९ या दिवशी धनुष्यकोडी येथे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रार्थना करतांना एक खेकडा दिसला. सद्गुरु काकूंनी या खेकड्याचे छायाचित्र मला पाठवले होते. या खेकड्याचा रंग पिवळा चैतन्ययुक्त दिसत होता. ‘त्याच्या रूपात प्रभु श्रीरामचंद्र सद्गुरु काकूंना भेटण्यासाठी आले’, असे मला जाणवले. सद्गुरु काकूंची रास मेष आहे (महर्षींनी सद्गुरु काकूंची रास वृषभ असल्याचे सांगितले आहे.) आणि त्या दिवशी मीन रास होती, तसेच सद्गुरु काकूंच्या व्ययस्थानात, म्हणजे मोक्ष स्थानात चंद्र ग्रह होता आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. सद्गुरु काकूंचा होणारा सर्व आध्यात्मिक प्रवास हा केवळ त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी नसून सर्व साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी होत असल्याचे यावरून लक्षात येते.

२. चंद्र ग्रहाची देवता भगवान शिव असल्याने सद्गुरु काकूंना प्रभु श्रीरामाचे दर्शन शिवाच्या रूपात झाले.’

– सौ. प्राजक्ता जोशी, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, ज्योतिष विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०१९)

 

प्रभु श्रीरामचंद्राने सेतू बांधण्यासाठी वापरलेल्या दगडाविषयीचे ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण

१. प्रभु श्रीरामचंद्राची रास कर्क असून ती जलतत्त्वाची रास असणे, प्रभु श्रीरामचंद्राने सेतू
बांधण्यासाठी वापरलेला दगड ईश्‍वरी कार्याला आशीर्वाद म्हणून लाभलेला जलदेवतेचा प्रसाद असणे
आणि ‘पृथ्वीवर लवकरच रामराज्य येईल’, असेच जणू ईश्‍वराला या अनुभूतीतून सूचित करायचे असणे

‘१२.१.२०१९ या दिवशी दुपारी साडेचार वाजता मीन रास होती. मीन रास ही जलतत्त्वाची रास आहे. प्रभु श्रीरामचंद्राची रास कर्क आहे. कर्क रास ही जलतत्त्वाची रास आहे. (‘मीन’ आणि ‘कर्क’ या दोन्ही राशी जलतत्त्वाच्या आहेत.’ – संकलक) प्रभु श्रीरामचंद्राने सेतू बांधण्यासाठी वापरलेला दगड ईश्‍वरी कार्याला आशीर्वाद म्हणून लाभलेला जलदेवतेचा प्रसाद आहे, तसेच तो दगड पूर्णतः गोलाकार असून त्यावर अनेक छोटे-छोटे गोल दिसत असून हा दगड जड असल्याने त्याला पृथ्वीतत्त्वाचे द्योतक मानले आहे. ‘पृथ्वीवर लवकरच रामराज्य येईल’, असेच जणू ईश्‍वराला या अनुभूतीतून सूचित करायचे आहे’, असे वाटते.

२. प्रभु श्रीरामचंद्राची रास कर्क होती आणि दगड सापडला,
त्या दिवशीची रास मीन होती. या दोन्ही राशी ब्राह्मण वर्णाच्या आहेत.’

– सौ. प्राजक्ता जोशी, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, ज्योतिष विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात