(म्हणे) ‘सनातन संस्थेवर सरकार बंदी घालत नाही !’ – राधाकृष्ण विखे-पाटील

  • काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची पुन्हा सनातनविरोधी ओरड 
  • सैनिकांवरील आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेत्यांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार !

मुंबई – अंनिसचे तत्कालीन कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या अन्वेषणातून काहीच निष्पन्न झालेले नाही. पोलिसांना ठिकठिकाणी शस्त्रे आणि बॉम्ब यांचे साठे सापडत आहेत. त्याविषयी सरकार कोणतीही कारवाई करत नाही. यामागे सनातन संस्थेचा संबंध असल्याने या संस्थेवर बंदी घालावी, अशी मी मागणी करूनही सरकार सनातन संस्थेवर बंदी घालत नाही, असे सनातनद्वेषी विधान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी २४ फेब्रुवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. (शिखांच्या हत्याकांडाने ज्यांचे हात रंगले आहेत, अशा काँग्रेसने निरपराध सनातनवर बंदीची मागणी करणे हेच हास्यास्पद आहे. ज्या पक्षाने ५५ वर्षे राज्य करून देशाला लुटले आणि शेतकर्‍यांना देशोधडीला लावले, त्यांच्यावरच खरेतर बंदी घालून सर्वांना कारागृहात टाकणे अपेक्षित होते ! – संपादक) या वेळी विखे-पाटील यांनी ‘जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात ४२ सैनिक हुतात्मा झाले असल्यामुळे देशभर संताप आणि दुःख यांचे वातावरण आहे. त्यामुळे चहापानाचे निमंत्रण न स्वीकारता विरोधी पक्षांतील नेत्यांनी चहापानावर बहिष्कार घातला आहे’, असेही सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात