सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी एकरूपता दर्शवणारी तिघांचीही सामायिक वैशिष्ट्ये !

पू. संदीप आळशी

 

१. स्थुलातील वैशिष्ट्येे

१ अ. आत्यंतिक सहजता आणि मोठेपणाचा लवलेशही नसणे

‘मी काही वेळा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी सेवेनिमित्त चर्चा करण्यासाठी त्यांच्या खोलीत जातो. खोलीत जाण्यापूर्वी मी ‘मला शिष्यभावात राहूनच भावपूर्ण बोलायचे आहे’, असे मनाशी ठरवतो. प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलायला आरंभ केल्यानंतर ते इतक्या सहजतेने आणि ‘स्वतः कोणी मोठे आहेत’, असे जाणवू न देता बोलतात की, मी मनाशी ‘मला भावपूर्ण बोलायचे आहे’, हे कधी विसरून जातो, हे माझे मलाही समजत नाही. हाच अनुभव मला सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भातही येतो. यामध्ये ‘माझा शिष्यभाव अल्प पडतो’, हे कारण असले, तरी ‘या तिघांमधील आत्यंतिक सहजता आणि मोठेपणाचा लवलेशही नसणे’, हेही कारण आहे.

१ आ. स्वतःच्या मोठेपणाचे श्रेय नेहमी देव, गुरु किंवा साधक यांना देणे

स्वतःच्या मोठेपणाचा नुसता उल्लेख जरी आला, तरी तिघेही जण त्याचे श्रेय नेहमी देव, गुरु किंवा साधक यांनाच देतात.

१ इ. त्या त्या वेळी साधकाच्या साधनेसाठी आवश्यक असलेलेच बोलणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी सेवेनिमित्त चर्चा करून झाल्यानंतर ते जे बोलतात, ते मला त्या वेळी साधनेसाठी आवश्यक असेच असते. हाच अनुभव मला सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या सद्गुरुद्वयींच्या संदर्भातही येतो. ‘शिष्याचा सर्व प्रकारचा भ्रम आणि अज्ञान दूर करणे’, हे गुरूंचे कार्यच असते, याची मला प्रचीती येते.

डावीकडून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

 

२. सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

२ अ. सूक्ष्मातील कळण्याची विलक्षण क्षमता

परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरुद्वयी यांना साधकाचा तोंडवळा (चेहरा), हस्ताक्षर, बोलणे, मनातील विचार, तसेच वातावरण यांच्या संदर्भातील स्पंदने काही क्षणांत कळतात अन् त्यासंदर्भात काही अयोग्य जाणवल्यास ते त्यावर उपाययोजनाही तात्काळ योजतात.

२ आ. वाईट शक्तींची सातत्याने आक्रमणे होत असतांनाही
मुखमंडलावरील तेज आणि कार्य यांवर विशेष परिणाम न होणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी समष्टीला आध्यात्मिक दृष्टीकोनातून हिंदु राष्ट्राच्या (आदर्श अशा रामराज्याच्या) स्थापनेचा मार्ग दर्शवला आहे. यासंदर्भातील सूक्ष्मातील लढा चालू आहे. या सूक्ष्मातील आपत्काळात साधकांना वाईट शक्तींच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरुद्वयी यांनाही वाईट शक्तींच्या त्रासांचे प्रचंड तडाखे सोसावेच लागत आहेत. असे असतांनाही कोणत्याही वेळी या तिघांच्याही मुखमंडलावरील तेज प्रकर्षाने जाणवते, हे विशेष !

२ आ १. चैतन्याच्या बळावर कार्य

वाईट शक्तींच्या त्रासांमुळे परात्पर गुरु डॉक्टरांना सतत आत्यंतिक थकवा असतो आणि विविध विकार सातत्याने होत असतात. असे असतांनाही ते दिवसभरात ग्रंथ लिखाण करणे, ध्वनीचित्रीकरण-सेवा आणि कलेशी संबंधित सेवा पडताळणे, तसेच अध्यात्मप्रसारकार्याविषयी साधकांना मार्गदर्शन करणे, अशा विविध प्रकारच्या सेवा न थकता करतच असतात. वाईट शक्तींच्या त्रासांमुळे सद्गुरुद्वयींनाही थकवा, अंगदुखी यांसारखे त्रास सतत होतच असतात. असे असतांनाही त्या दिवसातील १६ – १८ घंटे (तास) न थकता अखंड सेवारत असतात.

वाईट शक्तींच्या त्रासांचे प्रचंड प्रहार झेलत असतांना कोणाकडूनही एवढे अफाट कार्य होऊच शकत नाही. यातच त्या तिघांचे अद्वितीयत्व दिसून येते. या तिघांकडून चैतन्याच्या बळावर कार्य होत असल्याचेच हे लक्षण आहे.

एका निवांत क्षणी पू. (सौ.) सुनीता खेमका (डावीकडे) आणि त्यांच्याशी हास्यविनोद करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

२ इ. बोलणे चैतन्याच्या स्तरावर असल्याने बोललेले ऐकणार्‍याच्या मनावर सदाचे कोरले जाणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी काही वर्षांपूर्वी साधना किंवा कार्य यांच्या संदर्भात बोललेले आजही मला स्पष्टपणे आठवते. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनीही मला सांगितलेली काही वाक्ये मला आजही जशीच्या तशी आठवतात. तिघांचेही बोलणे चैतन्याच्या स्तरावर असल्याने ते ऐकणार्‍याच्या मनावर खोलवर बिंबते आणि म्हणूनच ते बर्‍याच कालावधीनंतरही त्याला जसेच्या तसे आठवते.

२ ई. सहज बोलणेही संकल्पासारखे होणे

काही वेळा ते एखाद्या साधकाला एखादी कृती करण्याविषयी सहज बोलून जातात. कालांतराने त्या साधकाला कठीण वाटणारी ती कृती त्याच्याकडून अगदी सहजपणे घडते. काही वेळा त्यांनी जसे सांगितलेले असते, त्याप्रमाणेच घडते.

२ उ. सतत आनंदावस्था आणि सेवेच्या व्यतिरिक्त निर्विचार अवस्था

परात्पर गुरु डॉक्टरांना कितीही शारीरिक त्रास असले, तरी ते सतत आनंदावस्थेत असतात आणि भाव-भावना, विचार आदींच्या पलीकडील निर्गुणावस्थेत असतात. केवळ साधकांशी बोलतांना आणि सेवेच्या वेळी ते सगुणावस्थेत येतात. सद्गुरुद्वयीही देहाला कितीही पीडा झाल्या, तरी काळ-वेळ, तहान-भूक आदींची तमा न बाळगता अविश्रांत सेवारत असून नेहमी आनंदीच दिसतात. सद्गुरुद्वयीही साधकांशी बोलणे आणि सेवा यांच्या व्यतिरिक्त बहुतेक वेळा निर्विचार अवस्थेत असतात. ‘निर्विचार अवस्था असणे’, हे निर्गुणावस्थेकडे वाटचाल होत असल्याचे लक्षण आहे.

२ ऊ. देवतास्वरूप

नाडीपट्टीत भृगु महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर हे श्रीविष्णुस्वरूप आहेत. परात्पर गुरु डॉक्टर श्रीविष्णुस्वरूप असल्याच्या अनेक अनुभूती साधकांना येत असतात.

वर्ष २०१७ मध्ये गंगोत्री (उत्तराखंड) येथे काही काळ थांबल्यानंतर तेवढ्या वेळात सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांनी रस्ता स्वच्छ करणाऱ्या महिलांशी संवाद साधून त्यांनाही प्रेम दिले.

सनातनच्या रामनाथी आश्रमात संपन्न झालेल्या ‘गुरुपादुका प्रतिष्ठापना’ सोहळ्याच्या वेळी नाडीपट्टीच्या माध्यमातून भृगु महर्षींनी सांगितले, ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या तत्त्वरूपात श्री महालक्ष्मीस्वरूप आहेत. सोहळ्याच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मुखमंडलावरील लालसर आभा (जणू सूर्याचे तेज) आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मुखमंडलावरील श्‍वेत आभा (जणू चंद्राची शीतलता) सनातनच्या सर्वच साधकांनी स्पष्टपणे अनुभवली.

माझ्या अल्पबुद्धीला जे जाणवले, ते मी मांडायचा काही प्रमाणात प्रयत्न केला. गुरूंशी अनन्यभावाने एकरूप झालेल्यांची महती आपण काय वर्णन करू शकतो ? तरी यावरून ‘नाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षींनी सद्गुरुद्वयींची थोरवी का वर्णिली आहे आणि त्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ का आहेत’, हे लक्षात येते. आम्हा सनातनच्या साधकांचे भाग्य एवढे थोर आहे की, आमचे गुरु हे केवळ गुरु नसून देवस्वरूप गुरु आहेत आणि त्यांच्या उत्तराधिकारीही देवीस्वरूप गुरु आहेत ! याविषयी आम्ही साधकांनी परम कृतज्ञ असायला हवे आणि आम्हा साधकांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणेच सद्गुरुद्वयींप्रतीही भाव वाढला पाहिजे.’

– (पू.) श्री. संदीप आळशी (१९.२.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात