महंत रघुनाथ बाबा महाराज यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट

महंत रघुनाथ बाबा महाराज (बसलेले) यांचा सन्मान करतांना पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी) – सुभाषचंद्र बोस यांनी जशी ‘आझाद हिंद सेना’ सिद्ध केली होती, तशी आज संतसेना सिद्ध केली पाहिजे, असे प्रतिपादन आगरा येथील महंत रघुनाथ बाबा महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचा पुष्पहार घालून आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.

महंत रघुनाथ बाबा महाराज पुढे म्हणाले, ‘‘सनातन धर्म म्हणजेच हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर नेहरू अन् गांधी परिवार यांनी अनेक आघात केले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्‍व हिंदु परिषद यांमधील संचालकांनी धर्मयोद्धा बनण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. डॉ. आठवले यांना माझा संदेश सांगा. ‘‘ज्यांची तुम्ही आराधना करत आहात, ते भारतात प्रकट झाले असून ते दुष्टांचा संहार करणार आहेत.’’ भगवान श्रीराम यांनी जसा तारकासुराचा वध केला होता, तेच श्रीराम आपल्यामध्ये आले आहेत; परंतु ते आपल्याला दिसणार नाहीत. जसे भगवान श्रीकृष्ण रथ चालवत असतांना कोणी पाहू शकत नव्हते, कारण परब्रह्माला ओळखण्यासाठी दिव्य दृष्टी पाहिजे. आठवले यांना आम्ही प्रार्थना करतो. ते एकदा मला भेटले, तर आम्ही मिळून देशाला समृद्धशाली बनवून हिंदु राष्ट्र जागृत करू !’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात