सनातन संस्थेने धर्मजागृतीचा लावलेला हा वटवृक्ष भविष्यात कल्पवृक्ष बनेल ! – आचार्य महामंडलेश्‍वर श्री स्वामी राधाप्रसाद देव जू महाराज, वृंदावन, उत्तरप्रदेश

आचार्य महामंडलेश्‍वर श्री स्वामी राधाप्रसाद देव जू महाराज (डावीकडे) यांना धर्मशिक्षण फलक प्रदर्शन दाखवतांना श्री. सुनील घनवट

प्रयागराज (कुंभनगरी) – या प्रदर्शनातून मला साक्षात् श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे दर्शन झाले आहे. सनातन संस्थेने धर्मजागृतीचा लावलेला हा वटवृक्ष भविष्यात कल्पवृक्ष बनेल, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या वृंदावन येथील श्री स्वामी हरिदास पीठाधीश्‍वर आचार्य महामंडलेश्‍वर श्री स्वामी राधाप्रसाद देव जू महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी त्यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट हेही या प्रसंगी उपस्थित होते.

आचार्य महामंडलेश्‍वर श्री स्वामी राधाप्रसाद देव जू महाराज पुढे म्हणाले की, जे कार्य आम्ही करायला पाहिजे, ते कार्य सनातन संस्था करत आहे. या प्रदर्शनातून भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन घडवण्यात आले आहे. महामंडलेश्‍वर, पीठाधीश्‍वर आणि भागवताचार्य यांना मी निवेदन (विनंती) करतो की, त्यांनी त्यांची छायाचित्रे लावणे बंद करून हे प्रदर्शन लावले पाहिजे. प्रथम आपण सुधारले, तर देश सुधारणार आहे. मी तन, मन, धनाने आपल्याला समर्पित आहे. माझी जेथे आवश्यकता आहे, तेथे मी तुमच्या समवेत असेन.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात