खरे साधू ओळखण्यासाठी आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून कार्य करतो ! – अभय वर्तक, सनातन संस्था

कुंभमेळा प्रयागराज २०१९

‘फेसबूक’ या सामाजिक संकेतस्थळावरून थेट प्रक्षेपणाद्वारे कार्यक्रम

(डावीकडून) हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर रामभूषणदास महाराज, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि श्री. अभय वर्तक

 

कोणतीही अपेक्षा न करता साधना आणि सेवा करणारे खरे
साधू असतात ! – श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर रामभूषणदास महाराज, वृंदावन

प्रयागराज (कुंभनगरी), १४ फेब्रुवारी (वार्ता.) : कुंभमध्ये येऊन विकारांना सोडले, तरच आपण समाजाचे कल्याण करू शकतो. वेशभूषेवरून कोणी साधू होत नाही. चरस आणि गांजा ओढल्यामुळे कोणतीही साधना होत नाही. व्यसनमुक्त आणि मन निर्मळ असेल, तर साधना होते. व्यसन केले, तर भगवंताची प्राप्ती होणार नाही. कोणतीही अपेक्षा न ठेवता साधना, सेवा करणारे खरे साधू असतात. व्यवसाय म्हणून येथे पैसे मिळवून नंतर त्या पैशाचा व्यसनासाठी वापर करणार्‍यांना कोणी साधू म्हणू शकत नाही. गृहस्थाश्रमात राहूनही आपण साधना करू शकतो, असे मार्गदर्शन वृंदावन येथील श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर रामभूषणदास महाराज यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समिती उत्तरप्रदेशच्या वतीने कुंभनगरीतील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक संकेतस्थळावरील ‘फेसबूक लाईव्ह’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘पाखंडी आणि ढोंगी साधू-संतांना कसे ओळखावे ?’ असा कार्यक्रमाचा विषय होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी केले.

 

पाखंडाचे खंडण करणे म्हणजे धर्माचे रक्षण करणे होय ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘खरे साधू हे मान-अवमान यांच्या पलीकडे गेलेले असतात. सध्या समाजातील काही साधू महिलांशी अश्‍लील वर्तन करतात, तर काही साधू राजकारण्यांची मखलाशी (चाटूगिरी) करतात, काही सर्वधर्मसमभाव सांगतात; मात्र अन्य संप्रदाय त्यांना आपले वाटत नाहीत, अशी स्थिती आहे. भक्तांना धर्मशिक्षण दिले, तरच खरे आणि खोटे साधू कोण हे कळेल. पाखंडाचे खंडण करणे म्हणजे धर्माचे रक्षण करणे आहे.’’

 

खरे साधू ओळखण्यासाठी आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून कार्य करतो ! – अभय वर्तक

सनातन संस्थेचे धर्मप्रसारक श्री. अभय वर्तक म्हणाले, ‘‘खरे साधू कसे ओळखावे, यासाठी आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून कार्य करत आहोत. कुंभमेळ्यात संतांनी भोंदू साधूंविषयी जागृती केली पाहिजे. इतकेच नव्हेे, तर ‘अपप्रकार करणार्‍या साधूंची आखाडा परिषदेकडे तक्रार करावी’, असे आवाहन आखाडा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. येथे कुंभमध्ये भोंदू साधूंनी फसवून अनेक भाविकांना लुटले आहे. भाविकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘पाखंडी साधू, संत तथा महाराज’ हा ग्रंथ प्रकाशित करून त्याचे कुंभमेळ्यात वितरण केले आहे.’’

१४ सहस्र लोकांनी ‘फेसबूक’वरून कार्यक्रमाचा लाभ घेतला !

१४ सहस्र लोकांनी ‘फेसबूक’ या सामाजिक संकेतस्थळाच्या थेट प्रक्षेपणाद्वारे या कार्यक्रमाचा लाभ घेतला, तर २५० हून अधिक लोकांनी त्याची लिंक इतरांना पाठवली !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात