साधकांसह सर्व हिंदुत्वनिष्ठांचे त्रास दूर व्हावेत, यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सौरयाग संपन्न

सौरयागाच्या पूर्णाहुतीच्या वेळी १. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि २. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ. सोबत पुरोहित डावीकडून श्री. सिद्धेश करंदीकर, श्री. दामोदर वझे, श्री. अमर जोशी आणि श्री. ओंकार पाध्ये

रामनाथी (गोवा) – सृष्टीच्या नियमनाचे कार्य करणार्‍या श्री सूर्यनारायणाची कृपा होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि या कार्यात सहभागी असलेल्या साधकांसह सर्व हिंदुत्वनिष्ठांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, तसेच सर्वांचे आयुष्यवर्धन व्हावे, असा संकल्प करून महर्षि भृगु यांच्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात १० फेब्रुवारी २०१९ या दिवशी संतांच्या वंदनीय उपस्थितीत अन् भावपूर्ण वातावरणात सौरयाग संपन्न झाला.

भृगु महर्षींनी हिंदु पंचांगानुसार प्रत्येक मासाच्या पहिल्या रविवारी हा याग करण्यास सांगितले होते. त्यानुसार २१ ऑक्टोबर २०१८ या दिवशी आश्रमात सौरयाग करण्यात आला होता. तेव्हापासून हिंदु पंचांगानुसार (मराठी) प्रत्येक मासाच्या पहिल्या रविवारी हा याग करण्यात येत आहे. माघ मासातील पहिल्या रविवारी म्हणजे १० फेब्रुवारी या दिवशी झालेल्या या यागाचा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते संकल्प करण्यात आला. त्यानंतर श्री गणेशपूजन, आचार्यवरण, सूर्यनारायणाचे आवाहन आणि पूजन करण्यात आले. सूर्यदेवतेची स्तुती आणि कार्य यांचे वर्णन असलेल्या सौरसूक्ताचे या वेळी पठण करण्यात आले. त्यानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अष्टदिक्पालांची पूजा केली. ८ दिशांच्या (४ मुख्य आणि ४ उपदिशा यांच्या) इंद्र, अग्नि, यम, निऋति, वरुण, वायु, सोम आणि ईशान या देवतांचे पूजन करण्यात आले. पूर्णाहुतीने यागाची सांगता झाली. सनातनचे साधक-पुरोहित श्री. दामोदर वझे यांच्या मार्गदर्शनाखाली हा याग करण्यात आला.

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी साधकांनी केलेली प्रार्थना !

‘हे गुरुदेवा, तुम्हीच सूर्यनारायण आहात. आम्ही सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन घेतो, तेव्हा आम्हाला तुमचेच दर्शन होते. सूर्य विश्‍वाला ऊर्जा देतो, तसे तुम्ही सांगितलेली साधना करण्यासाठी या यज्ञाच्या माध्यमातून आम्हाला ऊर्जा द्या. यागाच्या माध्यमातून तुमचे संरक्षककवच आम्हाला लाभू दे !’, अशी प्रार्थना श्री. विनायक शानभाग यांनी सर्व साधकांच्या वतीने या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी केली.

 

पृथ्वीवरील जीवसृष्टीचे नियमन करणारे श्री सूर्यनारायण !

नवग्रहांत सूर्य ही प्रमुख देेवता आहे. जसे श्रीविष्णु ब्रह्मांडाचे नियमन करतात, तसे सूर्य पृथ्वीचे नियमन करतो; म्हणून सूर्याला सूर्यनारायण असेही म्हणतात. तसेच शरीरातील उर्जेचे नियमनही सूर्यनारायण करतो. सौरयाग म्हणजे श्री सूर्यनारायणाची उपासना होय. श्‍वसनरोग, नेत्ररोग, हृदयरोग आदी शारीरिक व्याधी (रोग) दूर होऊन आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, तसेच सूर्यनारायणाची कृपा व्हावी, यासाठी हा याग केला जातो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात