प्रयागराज येथे वसंतपंचमीच्या शुभदिनी संतांचे त्रिवेणी संगमावर तिसरे राजयोगी स्नान !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

२ कोटी भाविकांनी संतांसमवेत केले स्नान !

राजयोगी स्नानाच्या वेळी गंगानदीत दुग्धाभिषेक करतांना स्वामी अवेशानंदगिरी महाराज

प्रयागराज (कुंभनगरी) – आजच्या वसंतपंचमीच्या दिवशी कुंभमहापर्वातील तिसर्‍या आणि अंतिम राजयोगी स्नानाचे पर्व पूर्ण झाले. १३ आखाड्यांतील संत, महंत, नागा साधू यांनी उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात त्रिवेणी संगमावर राजयोगी स्नान केले. १० फेब्रुवारीला २ कोटी भाविक ‘हर हर गंगे’, ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत संतांच्या समवेत गंगानदीत डुबकी मारून धन्य झाले. त्रिवेणी संगमासह ८ किलोमीटर परिसरातील ४१ घाटांवर भाविकांनी स्नान केले. या राजयोगी स्नानासाठी प्रशासनाने सर्वत्र मोठी व्यवस्था केली होती.

१. ९ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून वसंतपंचमीला प्रारंभ झाल्याने या दिवशी ६० लक्ष भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले. बरेच भाविक आदल्या रात्री मुक्कामाला होते.

२. कुंभमेळा परिसरात एटीएस्, एन्एस्जीचे कमांडो, स्थानिक पोलीस, राज्य राखीव दलाचे पोलीस यांचा बंदोबस्त होता. कुंभमेळ्यात ५५ सहस्र पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती, तसेच ५ लक्ष ५ सहस्र वाहनांसाठी ९५ वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली होती.

३. सुरक्षेची उपाययोजना म्हणून घाट स्थळांच्या परिसरात श्‍वानपथक तैनात होते. आखाड्यांचे साधू येण्यापूर्वी सर्व परिसर श्‍वानपथकाद्वारे पिंजून काढला जात होता. त्याचप्रमाणे ड्रोनच्या साहाय्यानेही स्नान घाटांवरील सुरक्षेवर लक्ष ठेवण्यात येत होते.

४. काही संवेदनशील आखाड्यांच्या साधूंना कमांडोंच्या संरक्षणामध्ये त्रिवेणी संगमापर्यंत नेण्यात येत होते. महाराष्ट्रातील रायगड येथील प.पू. आबानंदगिरी महाराज यांनीही राजयोगी स्नान केले.

५. सर्व घाट परिसरामध्ये शासनाच्या प्रतिनिधींकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जात होती. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शेकडो नागा साधू मोठ्या संख्येने स्नान घाटावर येत होते आणि तितक्याच तत्परतेने सर्व साधू आणि संत स्नान करून जात होते. आजच्या स्नानासाठी काही विदेशी संतदेखील उपस्थित होते.

६. त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी काही पोलिसांनी संतांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले.

७. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना  वसंतपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी, ‘देशातील सर्व भाविकांना नवीन उत्साह, नवीन ऊर्जा आणि नवीन स्फूर्ती यांचे प्रतीक असणार्‍या वसंतपंचमीच्या पुष्कळ शुभेच्छा. विद्येची देवता माता सरस्वती सर्वांना ज्ञान तथा सद्बुद्धी देऊ दे, अशी मी प्रार्थना करतो’, असे ट्वीट केले.

कुंभनगरीतील शास्त्री पुलावर ‘सनातन संस्थे’चा असा फलक झळकत होता.

क्षणचित्रे…

१. शेकडो भाविकांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरीत लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना आवर्जून भेट दिली.

२. सनातन संस्थेच्या वतीने भुमा निकेतन येथे लावण्यात आलेल्या फॅक्ट प्रदर्शनालाही भाविकांनी भेट दिली. आपल्याच देशात आपल्या बांधवांना धमार्र्ंधांनी हाकलून लावण्यासह वाढते लव्ह जिहाद, धर्मांतर या संकटांचेे वास्तववादी प्रदर्शन पाहून हिंदु भाविक हेलावून गेले. त्याचप्रमाणे अनेकांनी राष्ट्र आणि धर्म जागृती कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

३. कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ४ फिरती ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती.

त्रिवेणी संगमावर इतर संप्रदाय, आखाडा यांचे संत येत असतांना

त्रिवेणी संगमावर पहाटे सर्वप्रथम श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि श्री पंचायती अटल आखाडा यांचे संत, महंत आणि नागा साधू यांनी राजयोगी स्नान केले. त्यानंतर श्री पंचायती निरंजनी आखाडा, तपोनिधी श्री पंचायती आनंद आखाडा, श्री पंच दशनाम जुना आखाडा, श्री पंच दशनाम आवाहन आखाडा, श्री शंभू पंच अग्नि आखाडा यांतील संत, महंत आणि साधू यांनी राजयोगी स्नान केले. जुना आखाड्याचे पीठाधीश्‍वर महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंदगिरी महाराज, स्वामी आनंदगिरी महाराज, स्वामी उमाकांत नंदगिरी महाराज आदी संत आणि महंत यांनी राजयोगी स्नान केले. 

 

श्री पंच दशनाम जुना आखाड्याकडून शोभायात्रेत शस्त्रप्रदर्शनास प्रतिबंध !

वसंतपंचमीच्या दिवशी राजयोगी स्नानाच्या वेळी नागा साधूंनी शोभयात्रेत तलवार, भाला असे अस्त्र-शस्त्र यांचे प्रदर्शन केले नाही. ९ फेब्रुवारी या दिवशी श्री पंच दशनाम जुना आखाड्याने राजयोगी स्नानाच्या वेळी शस्त्रप्रदर्शनाला प्रतिबंध केला होता. ‘नागा साधूंनी शांततेने शोभायात्रेत सहभागी व्हावे, कुणीही शस्त्र प्रदर्शन करू नये’, असे कुंभमेळ्यात उद्घोषणा करून सांगण्यात आले होते. कुणी हातात काठी जरी घेतल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी आखाड्याकडून देण्यात आली होती. त्यामुळे आजच्या राजयोगी स्नानाच्या वेळी नागा साधूंच्या हातात कोणतेही शस्त्र नव्हते.

 

महर्षि भरद्वाज यांच्या प्रतिमेवर संतांकडून जलाभिषेक !

पंचकोशी परिक्रमेच्या शेवटच्या दिवशी संतांची शोभायात्रा !

प्रयागराज (कुंभनगरी) – प्रयागराज येथील ३ दिवसीय ‘पंचकोशी परिक्रमे’च्या शेवटच्या म्हणजे १० फेब्रुवारी या दिवशी महर्षि भरद्वाज यांच्या प्रतिमेवर संतांनी अभिषेक केला. सकाळीच संत आणि भाविक त्रिवेणी संगमावर पोेचले होते. तेथे पंचकोशी परिक्रमेचे नेतृत्व करणारे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री आणि जुना आखाड्याचे मुख्य संरक्षक महंत हरिगिरी महाराज यांच्यासमवेत संतांनी मंत्रोच्चार करून विधीवत् गंगापूजन केले. त्यानंतर एका मोठ्या कलशात गंगेचे जल घेऊन शोभायात्रा काढण्यात आली.

प्रयागराज, वेणी माधव, अक्षयवट यांचा जयजयकार करत संत आणि भाविक हे महर्षि भरद्वाज आश्रमात पोचले. या शोभायात्रेचे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांनी स्वागत केले. महर्षि भरद्वाज आश्रम येथे शोभायात्रा आल्यानंतर संतांनी महर्षि  भरद्वाज यांच्या प्रतिमेवर वैदिक मंत्रोच्चारात जलाभिषेक करून विधीवत् पूजन केले.

कुंभमेळ्यात गंगानदीत स्नान करणार्‍या महिलांची छायाचित्रे
प्रसिद्ध करू नका ! – अलाहाबाद उच्च न्यायालयाचा प्रसारमाध्यमांना आदेश

  • गंगानदीत स्नान करणार्‍या स्त्रियांची छायाचित्रे केवळ प्रसिद्ध करण्यावरच नव्हे, तर ती काढण्यावरच बंदी हवी ! 
  • जे न्यायालयाला सांगावे लागले, ते राज्यातील भाजप सरकारच्या का लक्षात आले नाही ?

प्रयागराज – कुंभमेळ्यात गंगानदीत स्नान करणार्‍या महिलांची छायाचित्रे प्रसिद्ध करू नयेत, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना दिला आहे. या  आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याची चेतावणीही न्यायालयाने दिली आहे. स्नान घाटाच्या १०० मीटरपर्यंतच्या परिसरात छायाचित्रे काढण्यावरही न्यायालयाने बंदी घातली आहे. असीम कुमार नावाच्या एका व्यक्तीने यासंबंधीची याचिका प्रविष्ट केली होती. (कोट्यवधी हिंदूंपैकी आणि त्यांच्या अनेक संघटनांपैकी एका हिंदूलाच अशी याचिका प्रविष्ट करावीशी वाटली, हे लज्जास्पद ! – संपादक) याचिकेवरील पुढील सुनावणी ५ एप्रिलला होणार आहे. (तोपर्यंत कुंभमेळा संपलेला असणार ! अशा याचिकांवरील सुनावणी तात्काळ कशी होईल, हे पहायला हवे ! – संपादक) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात