सनातनच्या साधकांचे आसुरी शक्‍तींशी चालू असलेले सूक्ष्मातील महायुद्ध !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सूक्ष्मातील कार्याचा संक्षिप्त परिचय

वातावरणात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या शक्ती कार्यरत असतात. कोणतेही शुभकार्य करतांना या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही शक्तींचा संघर्ष होत असतो. लहानशा कार्यालाही जिथे वाईट शक्ती विरोध करतात, तिथे धर्माला आलेली ग्लानी दूर करणे, राष्ट्रातील अनाचार नष्ट करणे यांसारख्या मोठ्या समष्टी कार्याला या नकारात्मक शक्तींकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होत असतो. सूक्ष्मातील जाणणारे, संत आदींना हा विरोध जाणवतो. ते या वाईट शक्तींशीच प्रामुख्याने लढतात. ‘ईश्‍वरी राज्या’च्या स्थापनेचा संकल्प करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाही या विरोधाला प्रचंड मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. सामान्य व्यक्तीला बाह्य गोष्टी दिसतात. प्रत्यक्षात स्थुलातून जे दिसते, ते विश्‍व १ टक्काच असते. ९९ टक्के विश्‍व सूक्ष्म आहे. अशा सूक्ष्म जगताविषयी जाणून घेऊन त्या स्तरावर धर्मप्रचार, राष्ट्रजागृती आणि आदर्श राष्ट्राची उभारणी यांना होणारा विरोध मोडून काढणे, हे सामान्य व्यक्तीच्या कल्पनेपलीकडचे आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरु, संत आणि साधक हे साधनेद्वारे सूक्ष्मातील युद्ध लढत आहेत. हे सूक्ष्मातील कार्य, हेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रधान कार्य आहे. ते सर्व शब्दांत मांडणे अत्यंत कठीण आहे.

 

१. सूक्ष्मातील महायुद्ध म्हणजे काय ?

अ. सूक्ष्मरूपातील असुर कोण ?

अखिल मानवजातीला त्रास देणारे भुवर्लोक आणि पाताळ यांतील भुते, मांत्रिक , राक्षस, पिशाच आदी आसुरी शक्‍ती

आ. आसुरी शक्‍तींचे कार्य काय ?

मनुष्याच्या जीवनातील ७० टक्के समस्यांना कारणीभूत होणे आणि दुर्जनांच्या माध्यमातून भूतलावर आसुरी राज्याची स्थापना करणे

इ. सनातन आसुरी शक्‍तींच्या विरोधात का लढते ?

आसुरी शक्‍तींना नष्ट केल्यानंतरच स्थूलातील दुर्जन प्रवृत्तींना नष्ट करून ईश्‍वरी राज्याची स्थापना करणे शक्य होईल.

ई. लढ्यातील साधकांच्या विजयश्रीचे कारण

ईश्‍वरावरील भक्‍तीमुळे साधकांवर होणार्‍या ईश्‍वरी कृपेमुळे या लढ्यात साधकांचा विजय निश्‍चित आहे.

साधनेच्या बळावर हा लढा देऊन व्यक्‍तीगत आणि राष्ट्रीय जीवन आनंददायी कसे करायचे, हे सनातन शिकवते !

 

२. देवासुर युद्ध म्हणजे काय ?

प्राचीन काळी ऋषीमुनी यज्ञयागादी विधी करत. त्या वेळी राक्षस त्यात विघ्ने आणत, ऋषीमुनींना जिवे मारत, गायींना मारून खात, हा इतिहास आपणाला ठाऊक आहे. असुरांनी त्रेता आणि द्वापर युगांत देवतांना, तसेच प्रभु श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या साक्षात् अवतारांनाही त्रास दिला आणि देवता अन् अवतार यांंनी असुरांशी युद्ध करून धर्मविजय मिळवला, हे आपण जाणतोच. आतापर्यंत जितकी देवासुर युद्धे झाली, त्यांत अंतिमतः जय हा देवता, अवतार आणि देवतांचा पक्ष घेऊन लढणार्‍यांचा झाला आहे, हा इतिहास आहे. सप्तलोकांतील दैवी किंवा चांगल्या आणि सप्तपाताळांतील आसुरी किंवा वाईट शक्ती यांत चालू असणार्‍या या लढ्याचे स्थुलातून प्रगटीकरण भूतलावरही दिसून येते.

 

३. कलियुगातील देवासुर लढा !

प्रत्येक युगात देवासुर लढा निरंतर चालू असतो. कलियुगातही तो चालू आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी महर्षि अरविंद यांनी सूक्ष्मातील लढा देऊन भारताच्या वायव्येकडून येणार्‍या आसुरी शक्तींचे निर्मूलन केले होते. याविषयी त्यांच्या चरित्रातही उल्लेख आहे. आजही भारतातील अनेक ज्ञात-अज्ञात संत, तसेच सनातनचे संत हे देवतांच्या पक्षातून लढत आहेत. ब्राह्मतेज म्हणजेच साधनेचे बळ असलेलेच सूक्ष्मातून युद्ध लढू शकतात. कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु श्री शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती देहली येथील एका सभेत म्हणाले होते, ‘‘प्रत्येक युगात देवासुर युद्ध होत असते. या युगात ‘सनातन संस्था’ ते युद्ध लढत आहे !’’

 

४. सनातनच्या साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास आणि त्याची कारणे !

‘सनातन संस्थे’च्या बर्‍याच साधकांना मागील १२ वर्षांपासून वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. हे त्रास मुख्यत्वे समष्टी साधना, म्हणजे धर्मप्रसार करणार्‍या साधकांना होत आहेत. असे असले, तरी त्रास होणार्‍यांपैकी काही जण तर संतपदालाही पोहोचलेले आहेत.

वातावरणातील वाईट शक्ती सनातनच्या साधकांना त्रास का देतात, असा प्रश्‍न काही जणांना पडेल.

पृथ्वीवरील सात्त्विकताच नष्ट करणे आणि दुष्प्रवृत्तींच्या माध्यमातून भूतलावर आसुरी राज्याची स्थापना करणे, हे सूक्ष्मातील वाईट शक्तींचे ध्येय आहे आणि त्यासाठी त्या प्रयत्न करत असतात. याउलट सनातनचे साधक समष्टी साधना म्हणून समाजाला साधना करण्यासाठी उद्युक्त करून पृथ्वीवरील सात्त्विकता वाढवण्यासाठी आणि भूतलावर ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजेच ‘विश्‍वकल्याणार्थ कार्यरत सात्त्विक लोकांचे राष्ट्र !’ स्थापण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ‘असुरांचे राज्य’ स्थापण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या वाईट शक्तींच्या प्रयत्नांना खीळ बसते; म्हणून त्या समष्टी साधना करणार्‍या सनातनच्या साधकांच्या कार्यात आणि सेवेत अनेक विघ्ने आणतात, तसेच साधकांचे शरीर, कपडे, मन, तसेच साधकांच्या वास्तूतील देवतांची चित्रे, वस्तू आदींवर सूक्ष्मातून आक्रमणे करतात.

४ अ. देवासुर लढ्याचे दृश्य स्वरूप !

४ अ १. देवासुर लढ्यामुळे साधकांवर होणारे परिणाम !

सूक्ष्मातील वाईट शक्ती सनातनच्या साधकांवर सूक्ष्मातून आक्रमणे करत असल्याची प्रचीती स्थुलातून उमटते. त्याची काही उदाहरणे सांगतो.

अ. साधकांची प्राणशक्ती न्यून होणे, शारीरिक कारण नसतांना विविध व्याधी होणे, मानसिक त्रास होणे

आ. देवता आणि संत यांच्या चित्रांवर डाग पडणे, ते विद्रूप होणे, ओरखडे येणे, जळणे

इ. साधकांच्या वापरातील वस्तू आपोआप तुटणे, फुटणे, त्यांवर ओरखडे येणे, त्यांना भोके पडणे

ई. लादी, भिंत इत्यादींवर रक्ताचे डाग, ओरखडे, हाताचे पंजे, कवट्यांचे आकार इत्यादी उमटणे

उ. कपड्यांवर रक्ताचे किंवा काळे डाग उमटणे, ते आपोआप जळणे किंवा फाटणे, त्यांचे रंग बदलणे

ऊ. साधकांच्या पावलांवर काळे डाग पडणे, शरिरावर व्रण उमटणे

विविध माध्यमांतून साधकांवर वाईट शक्तींची आक्रमणे होत असल्याची प्रचीती देश-विदेशातील साधकांना येत आहे.

४ अ २. देवासुर लढ्याचे पंचमहाभूतांवर होणारे परिणाम !

पंचमहाभुतांवरही देवासुर युद्धाचे होणारे परिणाम दृश्यरूपात अनुभवता येतात. याची उदाहरणे पुढीलप्रमाणे –

अ. पृथ्वीतत्त्व : भूकंप, युद्ध

आ. आपतत्त्व : पूर येणे, हिमनग वितळणे

इ. तेजतत्त्व : कडाक्याचे ऊन पडणे, ज्वालामुखी जागृत होणे

ई. वायुतत्त्व : भीषण वादळे निर्माण होणे

उ. आकाशतत्त्व : अतिशय कर्णकर्कश आणि त्रासदायक नाद उत्पन्न होणे

४ आ. धर्मसंस्थापनेचे कार्य करणार्‍या प्रत्येकालाच आसुरी शक्तींचा त्रास होणे अपरिहार्य आहे !

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करणार्‍यांवर सूक्ष्मातून आक्रमणे होणे अपरिहार्य आहे. सूक्ष्मातील लढ्यामुळे भाषण करतांना न सुचणे, अनिवार ग्लानी येणे, नैराश्य येणे, अयोग्य कृती कराव्याशा वाटते, कार्यात अडथळे येणे, यश न मिळणे इत्यादी अनुभव येतात. असे अनुभव आपल्यालाही येत असतील. साधना करणार्‍यांना स्वतःवरील सूक्ष्मातील आक्रमणांची तीव्रता कळते. साधना न करणार्‍यांना मात्र त्याविषयीचे गांभीर्य ज्ञात नसते.

 

५. देवासुर लढ्यातील संतांचे साहाय्य

स्थुलातील कार्य दिसणारे असते; पण सूक्ष्मातून चाललेल्या कार्याविषयी माहिती नसते. त्यामुळे आसुरी शक्तींच्या लढ्यात संत सूक्ष्मातून करत असलेल्या कार्याची आपणाला माहिती नसते; पण सनातनचे साधक साधना करत असल्यामुळे देवासुर युद्धात संत करत असलेल्या साहाय्याची त्यांना जाणीव आहे.

महामृत्यूयोगाचे निवारण होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना यंत्र देतांना योगतज्ञ दादाजी वैशंपायन (वर्ष २०११)

 

श्री हालसिद्धनाथांची भाकणूक सांगणारे पू. भगवान डोणे महाराज यांच्या समवेत परात्पर गुरु डॉ. आठवले (वर्ष २०१२)

अ. सनातनच्या साधकांना आणि हिंदु धर्मप्रसाराच्या कार्याला होणारा अनिष्ट शक्तींचा त्रास न्यून व्हावा, यासाठी नगर जिल्ह्यातील संत गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी देह ठेवण्यापूर्वी जप, हवन, सप्तशतीपाठ इत्यादी केले आहेत.

आ. कल्याण, जिल्हा ठाणे येथील थोर संत आणि ‘ॐ आनंदं हिमालयं’ या संप्रदायाचे संस्थापक योगतज्ञ दादाजी वैशंपायन हे माझा मृत्यूयोग टळावा, सनातनच्या साधकांचे आसुरी शक्तींपासून रक्षण व्हावे आणि ‘सनातन संस्थे’वर बंदी येऊ नये, यांसाठी गेली १० वर्षे खडतर अनुष्ठाने करत आहेत.

या दोन्ही संतांनी केलेल्या अनुष्ठानांमुळेच माझा महामृत्यूयोग आणि सनातनवरील अन्याय्य बंदी अद्यापपर्यंत टळली आहे.

इ. सोलापूर जिल्ह्यातील कासारवाडी येथील ‘श्री योगिराज वेद विज्ञान आश्रमा’चे संस्थापक गवामयी सत्री प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी (वय ८० वर्षे) यांनी प.पू. डॉक्टरांचा महामृत्यूयोग टळावा आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी, यांसाठी सोमयाग आणि आयुष्कामेष्टि यज्ञ केला अन् त्यांनी दीड वर्षे चालणारा अश्‍वमेध यज्ञ केला.

ई. साधकांचे रक्षण होण्यासाठी पुणे येथील प.पू. गणेशनाथजी महाराज (प.पू. जोशी) यांच्या माध्यमातून त्यांचे हिमालयवासी गुरु महंत योगी बृहस्पतीनाथजी महाराज यांनी सनातनच्या आश्रमात ३१ दिवस ‘दशप्रणवी गायत्री हवन’ करण्यास सांगितले. ‘सनातन संस्थे’ला आता हिमालयातील सिद्ध योग्यांचेही प्रत्यक्ष आशीर्वाद मिळण्यास आरंभ झाल्याचे हे द्योतक आहे. सनातनच्या आश्रमात जून २०१३ मध्ये झालेल्या या हवनाच्या वेळीही ‘देवासुर युद्ध चालू असते’, याचा अनुभव आम्ही घेतला. या गायत्री हवनाच्या वेळी सूक्ष्मातील चांगले आणि अनिष्ट लिंगदेह दृश्यरूपात प्रकट झाले.

सनातनवर येणार्‍या संकटांच्या निवारणार्थ जून २०१३ मध्ये केलेल्या ‘दशप्रणवी गायत्री हवना’च्या वेळी अनेक चांगले आणि त्रासदायक ऑर्ब छायाचित्रात दिसले.

या हवनाची छायाचित्रे काढली असता त्या छायाचित्रांत हवनाच्या अवतीभवती स्पष्टपणे गोलाकार लिंगदेह (ऑर्ब्स्) दिसत आहेत. त्यात चांगले आणि वाईट असे दोन्ही लिंगदेह दिसत आहेत.

या छायाचित्रात यज्ञाचे पौरोहित्य करणार्‍या पुरोहिताच्या डोक्यावर दिसणारे गोलाकार लिंगदेह चांगले आहेत, तर काही लिंगदेह त्रासदायक आहेत. काही चांगल्या लिंगदेहांच्या मध्ये ॐ दिसत आहे.

पूर्वीच्या काळी ऋषिमुनी यज्ञयाग करत असतांना चांगल्या आणि वाईट शक्ती येत असत. त्याप्रमाणे आताही यज्ञाच्या ठिकाणी सूक्ष्मातून  वाईट आणि चांगल्या शक्ती येतात. या शक्तींविषयी अधिक संशोधन आम्ही करत आहोत.

 

६. धर्मजागृतीच्या कार्यात संत स्वत:हून साहाय्य करतात, याची सनातनला आलेली प्रचीती !

आपण समजून घेत असलेल्या देवासुर लढ्यात साहाय्य करत असलेल्या संतांनी सर्व साहाय्य स्वत:हून केले आहे. हे सर्व संत किती निरपेक्ष भावाने कार्य करत आहेत, याची प्रचीती काही सूत्रांवरून आपल्याला येईल.

अ. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी आणि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे सनातनच्या साधकांची ओळख होण्याच्या पूर्वीपासून अनिष्ट शक्तींच्या निवारणासाठी कार्य करत होते.

आ. एक संत सनातनला साहाय्य करण्यासाठी नियमितपणे यज्ञ आणि अन्य विधी करत असतात; पण त्यांनी ‘मी करत असलेल्या साहाय्याला कोठेही प्रसिद्धी देऊ नका’, असे सांगितले आहे.

इ. वाईट शक्तींच्या निवारणार्थ विधी केल्यानंतर विधी करणार्‍या संतांनाही त्रास होतात, तरीही ते सातत्याने विधी करतात.

ई. संतांच्या दृष्टीने राष्ट्र आणि धर्म हे विषयसुद्धा माया असतात, तरीही ते सनातनच्या कार्याला साहाय्य करत असतात.

उ. एका देवस्थानाच्या पुजार्‍यांनी कोणतीही ओळख नसतांना एका साधिकेकडे प.पू. डॉक्टरांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि तेथील माती प.पू. डॉक्टरांना लावण्यासाठी दिली.

ऊ. हिमालयात वास्तव्य असलेल्या कानफाट्या संप्रदायाच्या गुरूंनी त्यांच्या शिष्यांना ‘सनातनचे आणि आपले कार्य एकच आहे’, असे सांगितले.

ए. काही वर्षांपूर्वी वेगवेगळ्या शहरांत रहाणार्‍या सनातनच्या दोन साधकांकडे नाथ संप्रदायातील दोन निरनिराळे साधू आले आणि त्यांनी सांगितले, ‘‘पुढे येणार्‍या आपत्काळात नाथ संप्रदाय तुम्हाला सर्वतोपरी साहाय्य करील’, असा निरोप आमच्या गुरूंनी तुम्हाला दिला आहे’, असे सांगून ते साधू निघून गेले. २०१२ मध्ये बेळगाव जिल्ह्यातील आप्पाची वाडी येथील श्री देव हालसिद्धनाथ यांनी त्यांच्या भक्तामध्ये प्रगट होऊन ‘सनातनच्या आश्रमात माझे विश्रांतीस्थान आहे. त्यांच्या कार्याला आमचे पूर्ण आशीर्वाद आहेत’, असे सांगितले आहे. अशा प्रकारे नाथ संप्रदायाचे साहाय्य होत आहे.

अनेक त्रास सहन करून, स्वखर्चाने, स्वत:हून आणि निरपेक्षपणे कार्य करणार्‍या संतांच्या या उदाहरणांवरून संतांचे मोठेपण लक्षात येते.

देवासुर युद्धातील काही ठळक सूत्रांचा उल्लेख मी येथे केला. आता काहींना प्रश्‍न पडेल की, संतांचे साहाय्य ‘सनातन संस्थे’च्या साधकांनाच का मिळते ? याचे कारण सनातनचे साधक तन-मन-धनाचा त्याग करून व्यष्टी साधना करतात आणि राष्ट्र आणि धर्म यांचे कार्यही धर्मसेवा म्हणून, समष्टी साधना म्हणून निरपेक्ष भावनेने करतात. देवासुर लढ्याचा विषय जाणून घेतल्यावर साधनेचे महत्त्व लक्षात येण्यास साहाय्य होईल.

सूक्ष्मातील लढ्याचे काही वर्षांनी स्थूल म्हणजेच दृश्य परिणाम दिसतात. आसुरी शक्तींच्या विरोधात संतांनी सूक्ष्मातील युद्ध जिंकले की, भारतातील क्षात्रतेज असलेले हिंदुत्वनिष्ठ हे लढ्यात विजय प्राप्त करतील. आपल्याला आपले धर्मकर्तव्य म्हणून या धर्मक्रांतीत सहभाग घ्यायचा आहे; कारण धर्मलढ्यातील विजयानंतर आपल्या सर्वांचा आध्यात्मिक उद्धार होईल !

 

७. वाईट शक्‍तींचा हल्ला झालेल्या वस्तूंच्या बाबतीत काय करावे ?

आपल्याकडे असलेली देवतांची चित्रे, संतांची छायाचित्रे, तसेच दैनंदिन वापरातील वस्तू इत्यादींवर वाईट शक्‍तींच्या हल्ल्यांमुळे रक्‍ताचे किंवा काळे डाग पडल्यास, वस्तू जळल्यास किंवा फाटल्यास अशा वस्तूंवर पुढील उपाय करावेत.

अ. वस्तू कमी प्रमाणात खराब झाल्यास

प्रार्थना करून वस्तूवर विभूती फुंकरावी किंवा लावावी. कापडी वस्तू विभूतीच्या पाण्याने धुवाव्यात. यानंतर ती वस्तू वापरावी.

आ. वस्तू मध्यम प्रमाणात खराब झाल्यास

त्या वस्तूभोवती देवतांची चित्रे किंवा नामजपाच्या पट्ट्या यांचे मंडल करावे आणि ते ३ ते ४ आठवडे तसेच ठेवावे. प्रतिदिन ५-६ वेळा त्या वस्तूवर विभूती फुंकरावी किंवा लावावी. नंतर ती वस्तू वापरावी.

इ. वस्तू जास्त प्रमाणात खराब झाल्यास

स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी प्रार्थना करून वस्तूचे पाण्यात वा अग्नीत विसर्जन करावे किंवा इतरांच्या प्रबोधनासाठी अशी वस्तू सनातनच्या नजीकच्या आश्रमात जमा करावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात